Add

Add

0
सोलापूर:– दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुरुल कालवा ते मंद्रूप येथील सिताबाई पाझर तलाव फिडर कालव्याद्वारे जोडण्याच्या कामासाठी शेतक-यांनी आपल्या जमिनीचे नोंदणीकृत दानपत्र जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे सुपूर्त केले. यावेळी जि. प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, प्रांताधिकारी श्रीमंत पाटोळे  यांची प्रमुख उपस्थिती होती.
      सदरच्या कामासाठी लागणारी जमीन शेतक-यांकडून दान पत्राद्वारे देण्याचे आवाहन करण्यात आले होते. कालवा खोदाईचे काम महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून करण्याचे ठरविले होते. त्यांच्या आवाहनास शेतक-यांनी प्रतिसाद दिला.

      या कामासाठी या परिसरातील 29 शेतक-यांनी 5 एकर जमिन दान करण्याचा निर्णय घेतला. या जमिनीची किंमत सुमारे 3 कोटी रुपये आहे. सदर कामासाठी पाटबंधारे विभागाने या कामाचे 5 कोटी 96 लाखाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यानुसार यामध्ये भूसंपादनासाठी 3 कोटी रुपयांचा समावेश होता. सदरच्या जमिनी दानपत्राद्वारे मिळाल्याने ती रक्कम वाचणार आहे. तसेच यासाठी लागणारी मशिनरी शासकीय वापरली जाणार आहे. यासाठीचा डिझेलचा खर्च शासनाच्या योजनेतून केला जाणार आहे. त्यामुळे अतिशय कमी खर्चात हे काम जिल्हाधिकारी यांच्या कल्पकतेतून पूर्ण होणार आहे. शेतक-यांच्या जमिनी लोकहितार्थ दान घेवून जलयुक्त शिवार योजनेतून साकारणारी राज्यातील अशा प्रकारची पहिलीच योजना साकारत आहे. 

Post a Comment

 
Top