Add

Add

0
आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत पुणेकरांचे महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी केलेले विधान राजकीय नैराश्यातून केले आहे. माजी मुख्यमंत्र्यांच्या हास्यास्पद विधानांनी पुणेकरांची केवळ करमणूक झाली आहे, असे प्रत्युत्तर पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी दिले.
मा. गिरीश बापट म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दहा महिन्यांच्या अल्प काळात पीएमआरडीएची स्थापना केली, पुण्याच्या मेट्रोविषयी अंतिम निर्णय घेऊन हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला, बीडीपीविषयी निर्णय घेतला, वर्षानुवर्षे रेंगाळलेल्या शहराच्या विकास आराखड्याच्या कामाला गती देण्यासाठी ठाम प्रशासकीय निर्णय घेतला व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची नियमावली निश्चित केली. अशा प्रकारची अनेक वर्षे रेंगाळलेली कामे माननीय मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावली असताना पृथ्वीराज चव्हाणांनी पुण्याविषयी आकस आहे का, असे विचारणे हे त्यांच्या नैराश्याचे लक्षण आहे.
त्यांनी सांगितले की, पुणे व पिंपरी – चिंचवड या दोन्ही शहरांना स्मार्ट सिटी योजनेचा लाभ मिळावा, यासाठी त्यांचा प्रस्ताव सोबत पाठविण्यात आला व त्यांना मिळणाऱ्या निधीत जी तूट असेल ती राज्य सरकार भरून देईल, असा स्पष्ट निर्णयसुद्धा मुख्यमंत्र्यांनी घेतला. तरीही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्मार्ट सिटीविषयी गैरसमज निर्माण करणे अयोग्य आहे.
पीएमआरडीए, मेट्रो, डीपी, बीडीपी इत्यादी पुण्याच्या जिव्हाळ्याचे प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकिर्दीत वर्षानुवर्षे रेंगाळत पडले होते. प्रस्तावावर सही करताना त्यांच्या हाताला लकवा मारतो का, असा सवाल त्यांच्या मित्रपक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने जाहीरपणे केला होता. स्वतः पुण्याच्या महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात पूर्ण अपयशी ठरलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी वेगाने निर्णय घेऊन तडफेने अंमलबजावणी करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविषयी सवाल करावा, हे आश्चर्यकारक आहे, असेही मा. बापट म्हणाले.
पुण्याचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री व शहरातील भाजपाचे सर्व खासदार – आमदार काम करत असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राजकीय निराशेतून हा सवाल केला आहे. असे प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा पुणेकर जनतेने आपल्याला का नाकारले, या प्रश्नाविषयी आत्मचिंतन करावे, असा टोला मा. बापट यांनी हाणला.


Post a Comment

 
Top