Add

Add

0
https://www.pcbtoday.in/uploads/Website/BannerNews_Registration/photo1.jpg
बाळासाहेब गव्हाणे यांच्या सहकार पॅनलचा धुव्वा;
सर्व जागांवर पराभव

पिंपरी– भोसरी येथील अण्णासाहेब मगर सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष नंदकुमार लांडे यांच्या अण्णासाहेब मगर प्रगती पॅनलने सहकार पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडविला. सर्वच्या सर्व १५ जागांवर प्रगती पॅनलचे उमेदवार निवडून आले. सहकार पॅनलमधून निवडणूक रिंगणात उतरलेले शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे व माजी शहरप्रमुख विजय फुगे यांचा दारूण पराभव झाला. त्यामुळे कलाटे व फुगे यांनी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीतील पराभवाची आपली परंपरा कायम राखल्याचे मानले जाते आहे.
अण्णासाहेब मगर बँकेच्या १५  जागांसाठी रविवारी (दि. २३) मतदान झाले होते. त्यामध्ये सर्वसाधारण गटासाठी १०, महिलांसाठी दोन, अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय आणि भटक्या जाती जमातीसाठी प्रत्येक एक जागांचा समावेश आहे. या बँकेच्या निवडणुकीसाठी विद्यमानअध्यक्ष नंदकुमार लांडे यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान संचालकांचा समावेश असलेले अण्णासाहेब मगर प्रगती पॅनल आणि माजी अध्यक्ष बाळासाहेब गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल आमने सामाने उभे ठाकले होते. मतदानासाठी अवघे दोन दिवस बाकी असताना सहकार पॅनलचे सेनापती बाळासाहेब गव्हाणे यांचे नाव उमेदवारांच्या यादीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. बँकेकडून लाभ घेत असल्याने गव्हाणे यांची विकेट उडाली.
बँकेच्या निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवडसह चाकण आणि भीमा कोरेगांव येथे १३ मतदान केंद्रावर मतदान झाले. बँकेच्या एकूण सहा हजार ३७९ मतदारांपैकी चार हजार ४४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दिघी रोड येथील विरंगुळा केंद्रात सोमवारी (दि. २४) सकाळी नऊ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळासाठी प्रचंड उत्सुकता लागलेल्या या बँकेच्या मतमोजणीत प्रगती पॅनलच्या उमेदवारांनी सुरूवातीपासून आघाडी कायम ठेवली.
निवडणुकीत सर्वसाधारण गटामध्ये प्रगती पॅनलचे प्रमुख व बँकेचे विद्यमान अध्यक्ष नंदकुमार लांडे यांना २७१० मते मिळाली. याशिवाय विद्यमान उपाध्यक्ष विठ्ठल सांडभोर (२४७९), अॅड. घनःश्याम खलाटे (२३६६), चेतन आहेर (२४०७), लालचंद राठोड (२३३९), सुलोचना भोवरे (२४४७), सुनील हुलावळे (२३८४), गणेश पवळे (२३६१), विजय गवारे (२५०४), राजेश सस्ते (२४५०) तसेच इतर मागासवर्गीय गटातील मनोज बोरसे यांना २५७८ मते, महिलांसाठी राखीव गटातील सविता मोहरूत यांना २४२८ मते, सोनल लांडगे २५४९ मते, विमुक्त जाती व भटक्या जमाती गटातील शंकर मेटकरी यांना २४९० मते आणि अनुसूचित जाती व जमाती गटातील दिपक डोळस यांना २५९३ मते मिळाली.

सहकार पॅनलचे प्रमुख बाळासाहेब गव्हाणे यांचे नाव उमेदवारांच्या यादीतून वगळण्यात आल्याने सर्वसाधारण गटाच्या जागेवर या पॅनलचे नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यातील शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे यांना १७६८ मते मिळाली. याशिवाय माजी शहरप्रमुख विजय फुगे (१८२७), विलास खांदवे (१६१६), सुरेश लांडगे (१६९८), रमेश तापकीर (१६८७), संदिप शिवले (१६०२), सचिन फुगे (१६७८), सोनलकुमार गव्हाणे (१६८९), संजय घुंडरे (१५४९) मते मिळाली. इतर मागासवर्गीय गटातील प्रभाकर थोरात (१७४६), महिलांसाठी राखीव गटातील मंगल कड (१६३२) आणि विजय फुगे यांच्या पत्नी सुनंदा फुगे यांना १७६९ मते मिळाली. तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती गटातील सहकार पॅनलचे सोमनाथ गोफणे यांना १८५० आणि अनुसूचित जाती व जमाती गटातील कृष्णा डोळस यांना १७०५ मते पडली. दिनेश चंदेल यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. 

Post a Comment

 
Top