Add

Add

0
.संस्कारक्षम वयामध्ये मुलांनी समृद्ध साहित्याचे(बालसाहित्य) वाचन करणे अपेक्षित असतांना मुले टेलिव्हिजनवर तासनतास कार्टून पाहाण्यात गुंग असतात.बालगणेश,छोटा भीम,मोटू पटलू,डोरेमन अव्याहतपणे ते पहात आहेत.बालपणी पसायदान,मनाचे श्लोक ,शुभंकरोती म्हणणारी व रामायण , महाभारत , आजीच्या गोष्टी कान देऊन ऐकणारी जुनी पिढी व आताची मोबाईल गेम ,कार्टूनमध्ये व्यस्त असणारी मुले हा आधुनिकीकरणाचा प्रभाव आहे.इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल वाढला आहे.आपला मुलगा किंवा मुलगी इंग्रजी माध्यमात  शिकतात याचा बहुतेक पालकांना अभिमान असतो.मुलांचे खेळणे, बागडणे, स्वच्छंदपणे बालपण जगणे हे आजच्या यंत्राधिष्ठित काळात दुर्लभ झाले आहे.......               आजची बालपिढी मोबाईल ,कार्टूनमध्ये व्यस्त असतांना त्यांच्या हातात प्रा.विद्या सुर्वे बोरसे यांचे 'बालसाहित्य : आकलन आणि समीक्षा 'हे पुस्तक देणे आवश्‍यक आहे .लहान मुलांना जर दर्जेदार साहित्याविषयी (बालसाहित्य)माहिती दिली तर युवाजीवनात व पुढच्या आयुष्यात ते नक्कीच दर्जेदार साहित्याचे वाचक होतात...प्रा.विद्या सुर्वे बोरसे यांनी बालसाहित्य :आकलन आणि समीक्षा या समीक्षा ग्रंथातून लीलाधर हेगडे ,बाबा भांड,अनंत भावे ,माधुरी पुरंदरे ,लक्ष्मीकांत देशमुख ,स्वाती राजे,मदन हजेरी,एकनाथ आव्हाड,ग.दि.माडगूळकर, पृथ्वीराज तौर इ . बालसाहित्यिकांच्या कलाकृतींचा ओघवत्या शैलीत परिचय करून दिला आहे.मनोगतामध्ये विद्या सुर्वे म्हणतात,"उन्हाळ्याच्या सुट्टीत मी एक उपक्रम हाती घेतला होता.दररोज एक पुस्तक घ्यायचं आणि त्याच्याविषयीची माहिती साई-स्वामीला सांगायची".बालमित्रांशी त्यांनी या पुस्तकातून संवाद साधला आहे...      बालसाहित्याचे महत्व त्यांनी या अप्रतिम मुखपृष्ठ असलेल्या  व प्राजंळ निवेदनशैली  असलेल्या आटोपशीर पुस्तकातून केले आहे.त्यांनी जाणीवपूर्वक पुस्तकाला अनुक्रमनिका दिलेली नाही.फेरी पहिली,फेरी दुसरी अशा लेखातून त्या बालसाहित्य लेखकांचा व त्यांच्या साहित्याचा परिचय करून देतात...बालसाहित्याच्या कलाकृतींचा परिचय करून देतांना त्या जाणीवपूर्वक संपूर्ण पुस्तकाचे कथानक कथन करत नाहीत.कारण मुलांनी मूळ पुस्तकाचा आस्वाद घ्यावा हा त्यांचा उद्देश आहे.'गोष्ट सयाजीरावांची 'या लेखातून त्यांनी बाबा भांड यांच्या 'गोष्ट महाराजा सयाजीरावांची 'या पुस्तकाचा आस्वादक शैलीत वेध घेतला आहे.सयाजीरावांचे कार्य सोप्या शैलीत विशद करून लेखाच्या शेवटी 'ही किशोर कादंबरी मिळवून वाचू,पुस्तक आवडल्याचं काकांना कळवू आणि महाराजांचं स्वप्न साकार करण्यासाठी पहिलं पाऊल उचलू'असे बालमित्रांना आवाहन करतात.                            
माधुरी पुरंदरे यांच्या 'मोतिया'या कथासंग्रहातील पाच लोककथांचे त्यांनी विवेचक शैलीत रसग्रहण केले आहे  ते जिज्ञासूंनी मुळातून वाचावे.'दूरदर्शन हाजीर हो'हे लक्ष्मीकांत देशमुख यांचे बालनाट्य कसे महत्वाचे आहे  हे त्यांनी विशद केले आहे...टी.व्ही.चे फायदे तोटे हा या नाटकाचा विषय आहे.या माध्यमामुळे युवा व बालपिढी कशी  बरबाद होत आहे ही ज्वलंत समस्या या नाटकातून देशमुख यांनी प्रदर्शित केली आहे.लहानांबरोबरच पालकांनी देखील या नाटकाची संहिता वाचणे किंवा प्रयोग पहाणे आवश्यक आहे.'पुस्तकाची पेटी'या लेखातून मदन हजेरी यांच्या कथासंग्रहाचा आढावा घेतला आहे.      ग.दि.माडगूळकर यांच्या गीतांचा रसास्वाद अप्रतिम आहे.'नाच रे मोरा 'हे बालगीतांचे संपादन आहे.शीतल माडगूळकर व लीनता आंबेकर यांनी हे संपादन केलेले आहे.एका तळ्यात होती ..,गोरी गोरी पान..,एक होता चिमणा...,वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम ...इ.बालगीतांचे महत्त्व विशद केले आहे.'किशोर 'हे महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे दर्जेदार मासिक आहे...किशोर मासिकाचे महत्त्व प्रा.विद्या सुर्वे यांनी अधोरेखीत केले आहे.  पृथ्वीराज तौर यांच्या अनुवादित पुस्तकांचे बालसाहित्यातील योगदान लेखिकेने स्पष्ट केले आहे.'जपानहून आणलेल्या छोट्यांच्या मोठ्या गोष्टी', 'फर्डिनंडची गोष्ट ','बसराची ग्रंथपाल'या पुस्तकांची ओळख लेखिकेने केली आहे.डाॅ पृथ्वीराज तौर हे स्वस्त आणि मस्त पुस्तकांचे अनुवादक असून बालमित्रांनी या दर्जेदार पुस्तकांचे वाचन केले पाहिजे असे त्या म्हणतात.प्रतिमा इंगोले,राजीव तांबे ,अनिल अवचट,दिलीप प्रभावळकर आदि लेखकांच्या कलाकृतींची आस्वादक समीक्षा प्रा.विद्या सुर्वे बोरसे यांनी केली आहे....पुस्तकाच्या शेवटी त्यांनी दिलेली बालसाहित्याच्या पुस्तकांची यादी मुलांसाठी व वाचकांसाठी महत्वाची आहे....बालसाहित्य:आकलन आणि समीक्षा या समीक्षा ग्रंथाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वाचनसंस्कृतीला चालना देण्याचे कार्य या पुस्तकाने केले आहे...मराठी साहित्याविषयी,मराठी भाषेच्या अस्तित्वाविषयी तळमळीने अनेकजण बोलतात लिहितात....बोलण्याला कृतीची जोड देणे महत्वाचे असते....प्रा.विद्या सुर्वे बोरसे यांनी बालसाहित्य : आकलन आणि समीक्षा या समीक्षा ग्रंथातून बालसाहित्याचे महत्व अधोरेखित केले आहे.यापुढेही बालसाहित्यावर समीक्षा लेखन त्यांच्याकडून अपेक्षित आहे...मुलांनी (मराठी व इंग्रजी माध्यमाच्या) पुस्तक वाचणे आवश्यकच आहे त्याचबरोबर पालकांनी ,साहित्याच्या अभ्यासकांनी ,अध्यापकांनी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे.......
.प्रा.डाॅ.राजेंद्र थोरात,पुणे.

Post a Comment

 
Top