Add

Add

0
पुणे महापालिकेच्या हद्दीत बावधनचा समावेश झाला असला, तरी पाणी व कचरा व्यवस्थापन हे मूलभूत प्रश्‍न अद्यापही कायम झाले आहेत. बहुतांश भागात आजही टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. रामनदीसह परिसरात झालेल्या अनेक बांधकामांमध्ये नियोजनाचा अभाव दिसत आहे. चांदणी चौकातील वाहतूक कोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी बनली असून उड्डाण पूलही अद्याप कागदावरच आहे. यामुळे गावातून शहरात आलो, तरीही अजून गावातच असल्याचे जाणवत असून प्रभागाच्या विकासाकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 
या प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसेचे नगरसेवक आहेत. नगरसेवक कोणत्याही पक्षाचे असले, तरी प्रभागाचा समतोल विकास करणे, हे त्यांचे कर्तव्य आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून (एनडीए) पूर्वी गावकऱ्यांना पाण्याचा पुरवठा होत होता. त्यानंतर बावधनचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर चांदणी चौकात बांधलेल्या पाण्याच्या टाकीद्वारे परिसराला पाणीपुरवठा होत आहे; मात्र तो कमी दाबाने व अनियमित वेळेत होत आहे. परिसरातील बहुतांश सोसायट्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. 
बावधन परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तसेच कचऱ्याचेही योग्य व्यवस्थापन होत नसल्याने तो रस्त्यांच्या कडेला साचून राहत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. रामनदी पात्रालगतच अतिक्रमणे झाली असल्याचे नागरिक सांगतात. बावधनमध्ये लहान मुलांसाठी उद्यान नाही. तसेच पालिकेचे आरोग्य केंद्रही नाही. महापालिकेच्या शाळेचे व्यवस्थापन चांगले होत नाही. मुलांना बसायला बाकही नाहीत, अशा तक्रारी नागरिकांनी बोलून दाखविल्या. 
वेदभवन परिसरात रस्ते चांगले झाले असले, तरीही चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे काम अजूनही मार्गी लागलेले नाही. अंतर्गत रस्त्यांचीही सुधारणा होणे अपेक्षित होते. अतिक्रमणांच्या विळख्यातही हा प्रभाग अडकल्याचे रहिवाशांनी सांगितले. 
उजवी व डावी भुसारी कॉलनी, कोकाटे वस्ती या भागांतील रस्ते, वीज व सांडपाण्याची समस्या सोडविली. एलईडी दिवेही प्रभागात बसविले आहेत. नागरिकांसमोर पाण्याची समस्या उद्‌भवू नये, यासाठी टॅंकरद्वारे मी पाणी उपलब्ध करून दिले. परिसरातील प्रश्‍न सोडविण्यासाठी व्हॉट्‌सऍप ग्रुप बनविला असून, त्याद्वारे मी नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे. रामनदी पात्राचे तीन वेळा स्वच्छता करण्यात आली आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप केले. ओपन जिमचीही व्यवस्था उपलब्ध केली आहे. बावधनमध्ये सध्या विरंगुळा केंद्राचे काम सुरू आहे. तसेच मराठा मंदिर संस्थेच्या मागे नव्या शाळेचे बांधकाम सुरू आहे. 
-पुष्पा कनोजिया, नगरसेवक, मनसे 
प्रभागातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी बायोगॅस प्रकल्पाची सोय केली आहे. भीमसेन जोशी उद्यानाचा विकास केला आहे. राजा शिवछत्रपती क्रीडासंकुल प्रस्तावित असून, बालोद्यानही बांधण्यात आले आहे. चांदणी चौक येथे सुमारे दोनशे वीस कोटी रुपयांचा पूलही प्रस्तावित आहे. बावधनमध्ये सिमेंटचे रस्तेही करण्यात आले आहेत. 
- शंकर ऊर्फ बंडू केमसे, नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेस 
प्रभागातील स्वच्छतागृहांचा प्रश्‍न आजही आहे. कोथरूड डेपोजवळ नेहमीच पावसाच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण होत असतो, तसेच कचऱ्याची समस्याही परिसरात अद्याप कायम आहे. काही ठिकाणी रस्ते चांगले झाले असले, तरी यापेक्षा अधिक चांगला विकास होणे अपेक्षित होते. 
- ऐश्‍वर्या घैसास, राष्ट्रवादी कॉंग्रेस. 
रस्त्यावरची अतिक्रमणे हटविण्यात अपयश आल्याने परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायम आहे. एकलव्य कॉलेज ते डावी भुसारी कॉलनीपर्यंत पंधरा मीटरच्या रस्त्याचे रुंदीकरण झाले असते, तर वाहतुकीवरील ताण कमी झाला असता. कचरा व पाणी या समस्या अद्यापही सुटल्या नाहीत. अनेक सोसायट्यांना खासगी टॅंकरद्वारे पाणी मागवावे लागत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी पुरेशा प्रमाणात सार्वजनिक स्वच्छतागृहेही होणे अपेक्षित होते. 
-राजाभाऊ गोरडे, मनसे

Post a Comment

 
Top