Add

Add

0
  राष्ट्रवादी शहराध्यक्ष खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण
पुणे : -‘वैकुंठ स्मशानभूमीतील गोवर्‍या, लाकडे आणि मृतदेहांची राख थेट मैलापाणी आणि कचरा असलेल्या आंबिलओढा नाल्यात टाकली जात आहे. काही फुटांवरच हा नाला मुठा नदीत मिसळतो. यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे वैकुंठातील राख नदीपात्रात न टाकता, शास्त्रीय पद्धतीने तिची विल्हेवाट लावणे शक्य आहे. याबाबतचे निवेदन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष, खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण यांनी महापौर प्रशांत जगताप व आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे दिले आहे.  

वैकुंठ स्मशानभूमीतील राख थेट मुठा नदीच्या पात्रात टाकणे चुकीचे असून, त्यामुळे नदी प्रदूषित होत आहे. पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी झाल्यावर नातेवाईक दुसर्‍या दिवशी काही अस्थी घेऊन जातात. त्यानंतर राख गोळा करून तिची विल्हेवाट लावण्याची महापालिकेच्या कर्मचार्‍यांची जबाबदारी आहे. मात्र, ते राख चक्क नदीत फेकून देतात, हे धक्कादायक आहे. शहरातील मुठा नदीत या पूर्वी अनेक अतिक्रमणे झाली आहेत. नदीपात्रात वाहने उभी केली जातात. काहीवेळा बांधकामाचाही प्रयत्न होतो. त्यातून नदीच्या अस्तित्त्वालाच धक्का पोहोचत आहे. नदीतील जैवविविधता लयास गेली आहे. या सगळ्यांचा विचार करून नदीच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. 

  त्यामुळे वैकुंठातील राख नदीपात्रात न टाकता, शास्त्रीय पद्धतीने तिची विल्हेवाट लावणे शक्य आहे. त्यासाठी महापालिकेने वैकुंठातील राख कंटेनरमध्ये गोळा करून ती नंतर जिरविली पाहिजे. हा उपाय खर्चिक नाही. शहर एकीकडे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असताना दुसरीकडे नदीपात्रात राख टाकणे शोभत नाही. तंत्रज्ञानाचा वापर करून शहरात सुधारणा करतानाच किमान महत्त्वाच्या गोष्टींकडे प्रशासनाने लक्ष दिल्यास या शहराचे पर्यावरण राखले जाईल. त्यामुळे या विषयाबाबत महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात. 

Post a Comment

 
Top