Add

Add

0
मुंबई(प्रतिनिधी):-समाजात सध्या विविध कारणांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत असून त्यामुळे हजारो कुटूंबे उघड्यावर पडत आहेत. आत्महत्येच्या पर्यायातून कोणत्याही प्रश्नाची सोडवणूक होऊ शकत नाही. त्यामुळे अशा लोकांनी आपल्या कुटूंबातील सदस्याचा देखील विचार केला पाहिजे. आजची ताण-तणावाची परिस्थिती पाहता आत्महत्या रोखण्यासाठी सामाजिक प्रबोधनाची गरज असल्याचे मत माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरद पवार यांनी काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ‘परवड’या प्रबोधनात्मक संगीत कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

      या कार्यक्रमा विषयी माहिती देताना या कार्यक्रमाचे संयोजक दिनेश परसावत म्हणाले सध्या ग्रामीण तसेच  शहरी भागातील लोकांमध्ये दारिद्र्य, मानसिक ताण- तणाव, कर्जबाजारीपणा आदी कारणांमुळे आत्मह्त्यांचे प्रमाण वाढत आहे. आपल्याकडे दुष्काळी परिस्थितीमुळे तर हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. मात्र कुटूंबप्रमुखाने आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या परिवाराची कशी वाताहत होते, समाजात जगताना त्यांना कशापध्दतीने संघर्ष करावा  लागतो  याचे भीषण वास्तव ‘परवड ’ या प्रबोधनात्मक संगीत कार्यक्रमाच्या माध्यमातून  समाजापुढे आणून लोकांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा यामागील उद्देश असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिनेश परसावत यांनी दिली.   
पुढे ते म्हणाले आज समाजात आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे लोकांचे वेळीच योग्य ते प्रबोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठी संगीत हे प्रभावी माध्यम आहे. हे जाणून आम्ही राज्यभरात आत्महत्या रोखण्यासाठी 'परवड'  या संगीत कार्यक्रमाच्या माध्यमातून मोहीम सुरु करणार असून त्याची सुरुवात आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील कार्यक्रमापासून करीत आहोत. यापुढे राज्यातील विविध भागात या कार्यक्रमाचे आयोजन करुन लोकांचे प्रबोधन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरदचंद्र पवार यांनी दिनेश परसावत यांनी समाजहिताच्या दृष्टीने सुरू केलेल्या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास आ.विद्याताई चव्हाण,माजी.आ.माणिक आंबेगावकर, परभणीचे उपमहापौर भगवान वाघमारे,परभरणीचे नगरसेवक पाशा कुरेशी,उद्योजक अरुण मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. 

Post a Comment

 
Top