Add

Add

0
                            दुष्काळाला तोंड देण्यात आतापर्यंत समाज आणि सरकारही अपयशी
पुणे(प्रतिनिधी):-केवळ पावसावर अवलंबून शेती हे फक्त अस्मानी संकट नाही, तर सुल्तानी संकटही आहे. गेली तीन ते चार वर्षे सतत राज्यात दुष्काळ असूनही शेतकर्‍याला सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यात आणि दुष्काळाला तोंड देण्यात आतापर्यंत समाज आणि सरकार म्हणून आपण अपयशी ठरलो आहोत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जलयुक्त शिवार’ ही योजना लोकचळवळ होत असून, या योजनेमुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या नक्की थांबतील, असा विश्‍वास व्यक्त केला.
भारतीय जैन संघटना शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातर्फे दुष्काळग्रस्त एक हजार अनाथ विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, अनिल शिरोळे, अजय संचेती, आमदार जगदीश मुळीक, जैन संघटनेचे अध्यक्ष शांती
लाल मुथा यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, लहरी पावसावर अवलंबून असलेली शेती हे शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे प्रमुख कारण आहे. लोकसहभागाने आत्महत्येची समस्या सुटू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळ, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या कुटुंबांतील मुलांना शिक्षणासोबत कृषी शिक्षणही दिले पाहिजे. तसे झाल्यास त्यांच्यामध्ये शेतीबद्दल नकारात्मक भाव निर्माण होणार नाही, असा सल्ला देत, ‘मी तुमची आईच आहे, तुम्ही एकदा वर्षा बंगल्यावर जेवायला नक्की या’, असे आमंत्रण अमृता फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना दिले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सामूहिक आत्महत्या करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेल्या कुटुंबातील तीन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने घेतली आहे. त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
आत्महत्येचे उदात्तीकरण करू नका
– आत्महत्या हा संवेदनशील विषय आहे. आत्महत्या झाल्यास दुःख व्हायलाच हवे. मात्र, त्याचे उदात्तीकरण करू नका. आत्महत्येचे उदात्तीकरण करून चांगला संदेश देता येत नाही. त्याऐवजी आत्महत्याग्रस्तांना मदत कशी करता येईल, आत्महत्या कशा रोखता येतील, यावर विचार व्हावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना केली.

Post a Comment

 
Top