Add

Add

0
मुंबई (विशेष प्रतिनिधी) –पाकिस्तानात असलेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी झालेले कथित संभाषण आणि भोसरी जमीन गैरव्यवहार अशा एक ना अनेक आरोपांच्या चक्रव्युहात अडकलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची अखेर आज, शनिवारी राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली.
खडसेंनी त्यांच्याकडील महसूल, कृषी, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, दुग्धविकास आणि मस्त्यपालन, अल्पसंख्य.

राज्यात ऑक्टोबर 2014 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या 19 महिन्यात मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढवलेले खडसे हे भाजपाचे पहिले मंत्री ठरले आहेत. खडसेंचा राजीनामा घेऊन भाजपने पक्ष आणि सरकारची प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. गेले महिनाभर खडसे यांच्यावर विविध आरोपांचा सिलसिला सुरू होता. पुण्यातील भोसरी येथील अल्प किमतीत लाटण्यात आलेली एमआयडीसीची जमीन, अंडरव्लर्ड डॉन दाऊद इब्राहिमशी फोनवरून झालेले कथित संभाषण, निकटवर्तीयामार्फत भूखंड वितरणासाठी मागितली गेलेली 30 कोटींची कथित लाच, जावयाची आलिशान कार बेकायदा असल्याचा आरोप आणि सिंचन कंत्राटातून मिळालेल्या कथित पैशातून संत मुक्ताई कारखान्याची करण्यात आलेली खरेदी अशा एक ना दोन आरोपांनी खडसेंना विरोधकांनी पूर्णपणे घेरले होते. या आरोपांवरून राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर बनले होते. मात्र, खडसे स्वतःहून खूर्ची सोडायला तयार नव्हते. आपल्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत, अशीच भूमिका त्यांनी घेतली होती.
मात्र, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या सूचनेवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज एकनाथ खडसे यांना फोन केला. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटून मंत्रीपदावरून पायउतार होण्यास सांगण्यात आले. तुमच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे पक्ष आणि सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होत आहे. आता अधिक बदनामी होऊ नये म्हणून राजीनामा द्या, असे गडकरींनी खडसेंना सांगितल्याचे समजते. त्यानुसार एकनाथ खडसे यांनी आज सकाळी सव्वाअकरा वाजता `वर्षा’वर जाऊन फडणवीस यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यावेळी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित होते.
भाजपमधील वजनदार नेते अशी ओळख असलेले एकनाथ खडसे हे विविध घोटाळ्यांच्या आरोपांमुळे वादात सापडले होते. खडसेंची एकामागोएक प्रकरणे बाहेर येऊ लागल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आम आदमी पक्ष तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती तर दमानिया यांनी खडसेंवर कारवाई व्हावी यासाठी आमरण उपोषण आंदोलन सुरु केले. याशिवाय प्रसारमाध्यमांमधून खडसेंच्या उद्योगांची चर्चा सुरु झाल्यानंतर दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी आरोपांची गांभीर्याने दखल घेतली.
अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाचारण करून त्यांच्याकडून खडसेंच्या बाबतीत वस्तुस्थितीदर्शक अहवाल घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही परदेश दौर्यावर रवाना होण्यापूर्वी फडणवीस यांना बोलावून चर्चा केली. मोदी आणि शहा यांच्या भेटीनंतर खडसेंबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असे सांगून फडणवीस यांनी त्यांच्या गच्छंतीचे संकेत दिले. मात्र विधानपरिषद निवडणुकीच्या तेंडावर असल्याने खडसेंचा राजीनामा लांबणीवर पडला होता. राजीनामा मागितला जाणार हे स्पष्ट झाल्यानंतर एकनाथ खडसे अज्ञातवासात गेले. या दरम्यान खडसे यांनी नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र भागवत यांनी खडसे यांना भेट नाकारली.
खडसे यांनी घायकुतीला येऊन स्वतःहूनच पदत्याग करावा, अशी परिस्थिती निर्माण केली गेली. खडसेंना शुक्रवारी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट मिळाली नाही. गेले आठवडाभर प्रयत्न करूनही भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी खडसे यांना भेट देणे तर सोडाच; पण त्यांच्याशी दूरध्वनीवर बोलण्याचेही टाळले. त्यामुळे आपल्यास पक्षात एकाकी पाडले जात आहे, याची जाणीव खडसेंना झाली. गडकरींशी बोलणे झाल्यावर खडसे `वर्षा’वर गेले. यावेळी खडसे यांच्या गाडीचा लाल दिवा झाकण्यात आला होता. या भेटीवेळी खडसे यांच्यासोबत पक्षाचे संघटनप्रमुख व्ही. सतीश हेही उपस्थित होते.
सुधीर मुनगंटीवार नवे महसूल मंत्री?
एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर नवे महसूल मंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. भाजपमध्ये एकनाथ खडसे यांच्याप्रमाणे मुनगंटीवार हे बहुजन चेहरा असलेले नेते आहेत.
मुख्यमंत्र्यांचे ट्विट
दरम्यान, खडसे यांचा राजीनामा मंजूर केला असून तो माननीय राज्यपाल सी. विद्यासागर यांच्याकडे पाठवला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
बहुजन असल्यानेच खडसेंवर अन्याय – राणे
एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांचे प्रकरण भाजपने व्यवस्थित हाताळले नसून, भाजपकडून बहुजन समाजातील नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केला आहे. खडसेंच्या राजीनाम्याबाबत बोलताना राणे यांनी खडसेंची पाठराखण केली. राणे म्हणाले की, एकनाथ खडसेंवरील आरोप गंभीर असले तरी भाजपने ते व्यवस्थितरित्या हाताळले नाही. भाजपकडून बहुजन समाजाला सतत लक्ष्य करण्यात येते. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी खडसेंना बाजूला केले आहे. मात्र, हा आरोप करणार्या राणे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीचा फॉर्म भरायला जाताना, खडसे यांची दाऊद कॉलप्रकरणी तातडीने हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी केली होती, याचा त्यांना आज सोयीस्कररित्या विसर पडलेला दिसला.
खडसे हे जातीय राजकारणाचा बळी नाहीत – पृथ्वीराज चव्हाण
खडसेंविरोधात अनेक पुरावे होते, त्यामुळे जातीच्या राजकारणातून खडसेंचा बळी घेतला असे मी म्हणणार नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. केवळ एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याने भागणार नाही, तर त्यांची दाऊद कॉलप्रकरणात त्यांची चौकशी होणे आवश्यक आहे, असे चव्हाण म्हणाले. दाऊद कॉलप्रकरण गंभीर आहे. हा मुद्दा देशाच्या सुरक्षेचा आहे याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.

Post a Comment

 
Top