Add

Add

0
पौड (प्रतिनिधी):- मुळशी धरण परिसरात ढगाळ व पावसाचे वातावरण आहे. वर्षा विहारासाठी मोठया संख्‍येने पर्यटक या परिसरात येतात. पाऊस सुरू झाल्‍यावर कणीस, फणस, चहा विक्री हा पावसाळयातील चांगला रोजगार मिळवून देणारा व्‍यवसाय असल्‍यानेत्‍यासाठी मुळशी जलाशयाच्‍या कडेने, धबधब्‍यांशेजारी, घाटांमध्‍ये खोपट, मांडव उभारण्‍याची तयारी सुरू झाली आहे. दुकाने पर्यटकांच्‍या स्‍वागतासाठी सज्‍ज झाली आहेत.
जुनच्‍या पहिल्‍या आठवडयात पाऊस सुरू होतो व मुळशी धरणाच्‍या निसर्गरम्‍य परिसरात पावसाचा आनंद लुटण्‍यासाठी मोठया संख्‍येने येण्‍यास सुरवात होते. पावसाळयात भात पेरणी, लावणीनंतर शेतातील कामे कमी होतात. पावसाळयातील या फावल्‍या वेळात खोपट, मांडव बांधून पर्यटकांना कणीस, फणस, चहा, वडापाव विक्री करणे स्‍थानिकांना चांगले उत्‍पन्‍न मिळवून देते.
बांबु, लाकडाच्‍या मदतीने खोपट, मांडव तयार करण्‍यात येतो. गवताचे छत, सपरी तयार करून पावसाचे पाणी आत येणार नाही अशी बांधणी करतात. भिजलेल्‍या पर्यटकांना पावसापासून निवारा मिळतो, कणीस खाण्‍याचा आनंद लुटता येतो व चहाने थंडीही घालवता येते. पर्यटकांना पावसाचा आनंद घेता येतो  व स्‍थानिकांना रोजगारही मिळतो. त्‍यामुळे पर्यटकांना आकर्षित करेल अशा मोक्‍याच्‍या ठिकाणी जागा धरून मांडव उभार ण्‍यासाठी स्‍थानिकांची लगबग सुरू आहे. 
मुळशी-कोलाड रस्‍त्‍यावर माले घाट, मुळशी खुर्द, गोनवडी,पळसे, ढोकळवाडी, निवे, ताम्हिणी, पिंपरी, आदरवाडी अशा अनेक गावांमध्‍ये कणसाची, चहाची तात्‍पुरती दूकाने पाहण्‍यास मिळतात. जलाशयाच्‍या कडेने, पळसे धबधब्‍याच्‍या शेजारी, पिंपरी, डोंगरवाडी दरीच्‍या बाजुला, घाटांमध्‍ये ही दुकाने पर्यटकांना चांगली सोयीची ठरतात.

Post a Comment

 
Top