Add

Add

0
मुंबई, (वृत्तसंस्था) – ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे वृद्धापकाळाने त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी धन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या. सुलभा देशपांडे यांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येदेखील आपल्या अभिनयाने छाप उमटवली होती. त्यांच्या जाण्याने त्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.रविवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
सुलभा देशपांडे यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने अनेकांना भुरळ घातली. `शांतता कोर्ट चालू आहे’, `दुर्गा झाली गौरी’,`बाबा हरवले आहेत’, `सखाराम बाईंडर’ ही त्यांची मराठी नाटके विशेष गाजली.`शांतता! कोर्ट चालू आहे’,`चौकट राजा’या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष लक्षात राहतात.`चौकट राजा’मध्ये दिलीप प्रभावळकर यांच्या आईची भूमिका त्यांनी उत्तमरित्या निभावली होती. `विहीर’,`जैत रे जैत’,`हापूस’ या सिनेमांतही त्यांनी काम केले होते. सुलभा देशपांडे यांनी मराठीसोबत 73 हिंदी चित्रपटांमध्ये ही काम केले आहे.यामध्ये `आदमी खिलौना है’,`गुलाम-ए-मुस्तफा’,`विरासत’ या चित्रपटांचा समावेश आहे.`देखो मगर प्यार से’या 90च्या दशकातील हिंदी धारावाहिकमधील त्यांची भूमिकाही संस्मरणीय ठरली होती.
1937 साली मुंबईत जन्मलेल्या सुलभा देशपांडे यांनी छबीलदास हायस्कूलमध्ये शिक्षिकेच्या रुपात आपल्या करिअरला सुरुवात केली. येथे काम करत असताना विजय तेंडुलकर यांनी सुलभाताईंना नाटक लिहायला सांगितले. याच काळात त्या `रंगायन’द्वारे रंगभूमीशी जुळल्या. येथे त्यांची भेट विजया मेहता, अरविंद देशपांडे, श्रीराम लागू, विजय तेंडुलकर यांच्याशी झाली.
उतारवयात त्यांनी आई, सासू, काकू, शेजारीण, आजीबाई अशा विविधांगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या. मराठी धारावाहिक `अस्मिता’मधील अस्मिताच्या सासूची भूमिका ही त्यांची अलिकडच्या काळातील लक्षात राहणारी भूमिका मानली जाते.त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार,नानासाहेब फाटक पुरस्कार, गणपतराव जोशी पुरस्कार, वसंतराव कानेटकर पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार आणि सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ख्यातनाम अभिनेते अरविंद देशपांडे हे त्यांचे पती. अरविंद देशपांडे यांचे 1987 साली निधन झाले.

Post a Comment

 
Top