Add

Add

0
"लोकमान्यांची सिंहगर्जना' या पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रकाशन

           
            पुणे  (वि.मा.का.):- नवीन पिढीला प्रेरणा व माहिती मिळण्यासाठी देशभक्तांच्या चरित्रांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा असे प्रतिपादन केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज येथे व्यक्त केले. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच' या गर्जनेच्या शताब्दी वर्षानिमित्त  लोकमान्यांची सिंहगर्जनाया पुस्तकाचे प्रकाशन नायडू यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय ऊर्जा मंत्री पीयुष गोयल, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा.रावसाहेब दाणवे, पालकमंत्री गिरीष बापट, ‘केसरी’चे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक, सौ. मुक्ता शैलेश टिळक आदी यावेळी उपस्थित होते.
            केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले, लोकमान्य टिळक, विनायक दामोदर सावरकर, मदन मोहन मालवीय, सरदार वल्लभभाई पटेल आदी देशभक्तांमुळे स्वातंत्र्य मिळाले. त्यांच्या देशभक्तीच्या ऊर्जेची प्रेरणा आजच्या पिढीला मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे देशभक्तांच्या चरित्राचा अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री समृती इराणी यांच्याशी याबाबत चर्चा केली असल्याचेही नायडू यांनी नमुद केले. देशाच्या विकासासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा असतो. प्रत्येकांनी देशप्रेम बाळगायला हवे. स्वराज्य मिळाले सुराज्याचे काय अशी भावना जनतेच्या मनात आहे. मात्र सुराज्याच्या वाटचालीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. शहरे स्मार्ट होण्यासाठी लोकांनीही स्मार्ट झाले पाहिजे, असेही नायडू यांनी सांगितले.
            1857 चा स्वातंत्र्य लढा इंग्रजांनी चिरडून काढल्यानंतर क्रांतीकारक आणि देशभक्तात निराशा पसरली होती. त्या सर्वांना देशभक्तीची ऊर्जा देण्याचे काम लोकमान्यांच्या "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणार' या घोषणेनी केले. त्यातून देशात पुन्हा एकदा इंग्रज राजवटीविरोधात लढा उभा राहिला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच हा लढा थांबला. त्यामुळे खऱ्या अर्थाने निराश झालेल्या देशभक्तांना बळ देऊन स्वातंत्र्यांची दुसरी लढाई लोकमान्यांनी सुरु केली. त्यामुळेच लोकमान्यांच्या "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणार' या सिंहगर्जनेला इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे यांचीही यावेळी समायोचित भाषणे झाली. "लोकमान्यांची सिंहगर्जना' पुस्तकांचे संपादकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सौ. मुक्ता शैलेश टिळक यांनी प्रास्ताविक केले तर पालकमंत्री गिरीष बापट यांनी आभार मानले.  

Post a Comment

 
Top