Add

Add

0
                 
 पुणे(प्रतिनिधी):- 1857चा स्वातंत्र्य लढा इंग्रजांनी चिरडून काढल्यानंतर स्वराज्य चळवळीत पसरलेली मरगळ लोकमान्यांच्या स्वराज्य हा माझा जन्म सिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच या सिंहगर्जनेमुळे दूर झाली. त्यामुळे लोकमान्यांच्या या सिंहगर्जनेला अनन्यसाधारण महत्व आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आज केले.
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच' या सिंहगर्जनेच्या शताब्दी वर्षानिमित्त "लोकमान्यांची सिंहगर्जना' या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय नगर विकासमंत्री व्यंकय्या नायडू, केंद्रीय ऊर्जा मंत्री पीयुष गोयल, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, "केसरी'चे विशवस्त संपादक डॉ. दीपक टिळक उपस्थित होते.
मुख्यमंत्री  म्हणाले, 1857 चा स्वातंत्र्य लढा इंग्रजांनी चिरडून काढल्यानंतर क्रांतीकारक आणि देशभक्तात निराशा पसरली होती. त्या सर्वांना देशभक्तीची ऊर्जा देण्याचे काम लोकमान्यांच्या "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणार' या घोषणेनी केले. त्यातून देशात पुन्हा एकदा इंग्रज राजवटीविरोधात लढा उभा राहिला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच हा लढा थांबला. त्यामुळे खऱ्या अर्थाने निराश झालेल्या देशभक्तांना बळ देऊन स्वातंत्र्यांची दुसरी लढाई लोकमान्यांनी सुरु केली. त्यामुळेच लोकमान्यांच्या "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणार' या सिंहगर्जनेला इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
श्री. व्यंकय्या नायडू म्हणाले, लोकमान्य टिळक, विनायक दामोदर सावरकर, मदन मोहन मालवीय, सरदार वल्लभभाई पटेल आदी देशभक्तांमुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यांच्या देशभक्तीच्या ऊर्जेची प्रेरणा आजच्या पिढीला मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे देशभक्तांच्या चरित्राचा अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याशी चर्चा केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक मुक्ता टिळक यांनी केले. तर आभार गिरिश बापट यांनी मानले.  

Post a Comment

 
Top