Add

Add

0
नाशिक(प्रतिनिधी):- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सर्व समता सैनिकांनी ओबीसींच्या न्याय हक्कासाठी संघटीत व्हावे तसेच संघटनेला मजबुती देण्यासाठी संघटन करावे असे प्रतिपादन समता परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते बापू भुजबळ यांनी केले. ते आज नाशिक येथील काशी माळी मंगल कार्यालयात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या १४२ व्या जयंती निमित्ताने आयोजित अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारीणीच्या बैठकी प्रसंगी बोलत होते.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या प्रारंभी आज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या १४२ व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. दरम्यान समता परिषदेचे राज्यप्रसिद्धी प्रमुख बालमोहनदादा अदलिंगे, खजिनदार बाळासाहेब मेहर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी महात्मा फुले समता परिषदेचे ज्येष्ठ नेते डॉ.कैलास कमोद, जी.जी.चव्हाण, आमदार जयवंतराव जाधव, माजी आमदार पांडुरंग अभंग, लक्ष्मणराव तायडे, रामभाऊ सातव, महिला आघाडीच्या प्रमुख पार्वती शिरसाठ, मंजिरी घाडगे,शालिनी गायकवाड, शिवाजीराव नलावडे, ज्येष्ठ नेते बाजीराव तिडके, नानासाहेब सोनवणे, शिवाजीराव नलावडे, प्रा.श्रावण देवरे, डॉ.डी.एन.महाजन, प्रा.दिवाकर गमे, संजय गव्हाणे,जयवंतराव भंडारे, अॅड.सुभाष राऊत, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, संतोष सोनपसारे, वैशाली दाणी, किशोर कन्हेरे,संजय गव्हाणे आदीसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रमुख समता पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बापू भुजबळ पुढे म्हणाले की, राजश्री शाहू महाराज, महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजासाठी जे विशेष कार्य केले ते पुढे नेण्याचे काम समता परिषदेच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षापासून राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ अविरत पणे करत आहे. ते काम पुढे नेण्यासाठी सर्व समता सैनिकांनी एकसंघ होऊन त्यासाठी संघटन करणे आवश्यक आहे. तसेच बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच आ.छगन भुजबळ यांना सरकार कडून सूड बुद्धीने तुरुगात डामण्यात आले असून त्याचा आवाज दडपण्याचा सरकारचा डाव असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे भुजबळांच्या पाठीशी खंबीर पणे उभे असून पक्ष देखील त्यांच्या पाठीशी उभा आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य कार्यकारिणी बैठकीत विविध ठराव मांडून मार्गदर्शन करतांना ज्येष्ठ नेते कैलास कमोद म्हणाले की, संघटना मजबूत राहण्यासाठी संघटन महत्वाचे असून समता परिषदेला कुठलेही खिंडार पडले नसून संघटना जोमाने काम करत आहे. काही लोकांकडून चुकीच्या बातम्या पसरविल्या जात आहे. त्यात काही तथ्य नसून जे गेले ते समता परिषदेचे पदाधिकारी नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटीत होऊन ओबीसींच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी २७ जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच केंद्रातील मनुष्यबळ विभागाकडून केंद्रीय शिक्षण संस्थांच्या २७ टक्क्याच्या आरक्षणात फेरबदल केले जात असल्याने त्याचा निषेध व्यक्त करून ते आरक्षण कायम राहिले पाहीजे यासाठी संघटना प्रयत्न करेल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार देखील त्यांनी मानले.
आपले मनोगत व्यक्त करतांना आमदार जयवंतराव जाधव म्हणाले, समाजातील वंचित घटकांची मोट बांधून समता परिषदेच्या माध्यमातून समतेची ज्योत छगन भुजबळ यांनी देशभर पसरविली आहे. त्याच्या न्याय हक्कासाठी त्यांनी लढा उभारलेला असून विविध प्रश्नांची सोडवणूक त्यांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रतीगाम्यानी कितीही भ्याड हल्ले केले तरी ते डगमगणार नाही. तसेच भुजबळांना आजही ओबीसींच्या प्रश्नांची चिंता आहे. त्यामुळे संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी न डगमगता जोमाने काम करावे व संघटना मजबूत करावी असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.
राजश्री छत्रपती शाहू महराज यांच्या जयंती निमित्ताने आपल्या व्याख्यानात प्रा.श्रावण देवरे म्हणाले की. महापुरुषांच्या विचारातून संघटना मजबूत करणे आवश्यक आहे. विचारांची लढाई ही विचारांनीच लढली गेली पाहिजे. राजश्री छत्रपती शाहू महराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेच विचार समाजाला तारू शकतील त्यामुळे त्यांनी दिलेली विचारांची ही ताकद संघटनेतील प्रत्येक व्यक्तीने ती अवगत केली तर संघटना मजबूतपणे उभी राहू शकते असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ नेते जी.जी.चव्हाण, माजी आमदार पांडुरंग अभंग, लक्ष्मणराव तायडे, रामभाऊ सातव, महिला आघाडीच्या प्रमुख पार्वती शिरसाठ, कविता कर्डक, उस्मान बागवान, अॅड.मोर्य, प्रा.दिवाकर गमे, आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
अखिल भारतीय समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीतील ठराव... 
-महात्मा जोतीबा फुले यांच्या १२५ व्या स्मृती वर्षानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे.
-ओबीसींची जनगणना झाली पाहिजे.
-ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची उत्पन्न मर्यादा ४.५ लाखावरून ६ लाख रुपये करावी.
-एसी/एसटी प्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण इंजिनिअरींग व मेडिकल मध्ये ५० टक्के  ऐवजी १०० टक्के शिष्यवृत्ती व शुल्क परतावा मुदतीच्या आत मिळावा.

-ओबीसींच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी २७ जुलै २०१६ रोजी महाराष्ट्रातील सर्व शाळा व महविद्यालये बंद करणे.

Post a Comment

 
Top