Add

Add

0


डॉ. आदित्य अभ्यंकर; : एमआयटीमध्ये ‘मेकपीजीकॉन’चे उद्घाटन

पुणे(प्रतिनिधी):- “भारतीय शिक्षणपद्धतीत पहिली १६ वर्षे आपल्यातील नाविन्यता सिद्ध करण्याची संधी मिळत नाही. पदव्यूत्तर पदवीच्या अभ्यासक्रमात मात्र, ही संधी दिली गेली आहे. त्यामुळे या संधीचा पुरेपूर फायदा उठवून आपल्या कल्पनाशक्तीचे रुपांतर देशहितासाठी केले पाहिजे. तसेच कोणतेही संशोधन करताना ‘का’ या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, तर ते संशोधन अधिक प्रगल्भ होते,” असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता आदित्य अभ्यंकर यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे माईर्स एमआयटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या (एमआयटीसीओई) मेकॅनिकल विभागाच्या सहकार्याने एमआयटीच्या प्रांगणात आयोजित ‘मेकपीजीकॉन’च्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आदित्य अभ्यंकर बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे सचिव व कार्यकारी संचालक प्रा. डॉ. मंगेश तु. कराड होते.  या प्रसंगी फोर्ब मार्शलच्या संशोधन व विकास विभागाचे माजी सरव्यवस्थापक दत्ता कुवळेकर, एमआयटीसीओईचे प्राचार्य प्रा. डॉ. एम. एस. नागमोडे, एमआयटीसीओईच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. एस. बी. बर्वे, समन्वयक प्रा. डॉ. पी. जे. अवसरे, प्रा. डॉ. ए. एस. पडळकर, प्रा. डॉ. एम. एम. लेले, आदी उपस्थित होते.
डॉ. आदित्य अभ्यंकर म्हणाले, “आपल्या पूर्वजांनी केलेल्या गोष्टींचा आधार घेत संयमाने आपण करत असलेल्या संशोधनाचा सखोल अभ्यास व्हावा. त्यातून नवनिर्मिती कशी होईल, याचा विचार केला, तर समाजाला उपयुक्त अशा नव्या गोष्टींची निर्मिती त्यातून होऊ शकते. आज गुगल हे महत्त्वाचे बनले असून, प्रत्येक गोष्ट गुगलकडे आहे. त्यामुळे त्याचाही आधार घेऊन आपल्या संशोधनात नाविन्यता कशी येईल, हे आपण तपासून पाहिले पाहिजे.”
दत्ता कुवळेकर म्हणाले, “देशाच्या प्रगतीत भर पडण्याच्या उद्देशाने आपले संशोधन असावे. तसेच शैक्षणिक संस्थांतून होणारे संशोधन औद्योगिक क्षेत्राला कसे उपयुक्त ठरेल, यासाठी प्रयत्न व्हावेत. त्याकरिता उद्योगांतील संशोधन व विकास विभागातील लोकांना अशा प्रकारच्या संशोधन प्रकल्पांच्या निरीक्षणांसाठी बोलवले पाहिजे. त्यातून त्यांच्या काही कल्पना यात उतरल्या, तर हे संशोधन प्रकल्प अधिक समाजाभिमुख होतील व त्यातून देशाला, जनतेला फायदा होईल.”
प्रा. डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले, “एमआयटीने नेहमी उद्योगांची गरज ओळखून तशाप्रकारचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी एमआयटी टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटरची स्थापना करण्यात आली असून, चांगल्या प्रकल्पांचे रुपांतर उद्योगांत करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधन करुन आपल्या समाजाला त्याचे फायदे मिळावेत. तंत्रज्ञानाला मर्यादा नसल्याने झपाट्याने ते विकसित होत आहे.”
या प्रदर्शनात थर्मोडायनॅमिक्स, हिट पॉवर एनर्जी, ॲटोमोटिव्ह आदी संकल्पनेवरील प्रकल्प आहेत. याप्रसंगी प्रकल्पांविषयीचा संक्षिप्त आढावा घेणाऱ्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. डॉ. ए. एस. पडळकर यांनी मेकपीजीकॉनच्या आयोजनामागील भूमिका सांगितली. डॉ. एस. बी. बर्वे यांनी प्रास्ताविक केले. गगनदीप सिंग आणि श्यामल मुलाने यांनी सूत्रसंचालन केले.  प्रा. डॉ. एम. एम. लेले यांनी आभार मानले. 

Post a Comment

 
Top