Add

Add

0
पुणे(प्रतिनिधी):- “माणसाचे मन हे वार्‍याहूनही चंचल आहे. त्याला एका ठिकाणी बांधून ठेवावयाचे असेल, तर भगवंताचे नामस्मरण हे कलीयुगातील सर्वात चांगले साधन आहे. त्यातूनच मोक्षप्राप्ती होते.” असे उद्गार बासवाडा, राजस्थान येथील ध्यानयोगी महर्षी श्री श्री उत्तमस्वामी महाराज यांनी काढले.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 26 जून 2016 ते मंगळवार, दि.28 जून 2016 यादरम्यान श्री संत ज्ञानेश्‍वर-तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्‍वरूप दर्शन मंच, श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी सोहळ्यानिमित्त युनेस्को अध्यासनांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या लोकशिक्षणपर कार्यक्रमाच्या दुसर्‍या पुष्पात ते बोलत होते. 
यावेळी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे प्रमुख प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, सौ. उर्मिला विश्‍वनाथ कराड, सौ. उषा विश्‍वनाथ कराड, ह.भ.प. श्री.सुदाम महाराज पानेगांवकर, प्रा.सौ. स्वाती कराड-चाटे व डॉ. संजय उपाध्ये हे उपस्थित होते. 
श्री श्री उत्तमस्वामी महाराज म्हणाले, “संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम,एकनाथ,संत कबीर,तुलसीदास, मीराबाई या सर्वांनी सर्वसामान्य माणसाची उन्नती होण्यासाठी त्याला परोपरीने उपदेश केला आहे. भौतिक संपत्ती कितीही मिळाली, तरी अखेर मृत्यूप्रसंगी तिचा त्याग करून, एवढेच काय, पण हे शरीरसुध्दा सोडून आपल्याला जावे लागणार आहे. याची जाणीव ठेवून आपण जन्मभर वागले पाहिजे.”
“संतांच्या वास्तव्याने ती जागा पवित्र होत असते. ते तेथून गेले, की ते पावित्र्य नाहीसे होते. सर्व राजेशाही थाट सोडून देऊन मीराबाईने भक्तीचा रस्ता धरला. जोपर्यंत मीराबाई होती, तोपर्यंत चितोडगड अजिंक्य होता. जेव्हा तिने चितोडगड सोडला, तेव्हा तो परकीयांच्या ताब्यात गेला. म्हणून संतसंग ही उध्दाराची पहिली पायरी आहे. मनाचे बारा प्रकार शास्त्रात सांगितले आहेत. संत, पंथ, मंत्र व ग्रंथ ही साधनेची चतुःसूत्री आहे. संतांच्या संगतीने मन परमेश्‍वराच्या दिशेने एकाग्र करता येते व त्यातून मोक्षाचा दरवाजा उघडतो,” असेही उत्तमस्वामी महाराज म्हणाले.
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “श्री श्री चे एकत्रिकरण केल्यास ह.भ.प. तयार होते. निष्ठा, श्रध्दा व भक्तीमधून ईश्‍वराचे दर्शन घडते. आज समाजात अंधविश्‍वास आणि अंधश्रध्दा यावरती बरेच मतभेद निर्माण झालेले आहेत. खरे म्हणजे श्रध्देमुळेच आपल्याला ज्ञान मिळते. त्यामुळे देवावरती श्रध्दा ठेवल्यास आपल्या जीवनात आमूलाग्र बदल होतो.”
श्री. शालिकराम खंदारे रांनी सूत्रसंचालन केले. यावेळी लक्ष्मण सूर्यभान घुगे यांनी लिहिलेल्या संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या  ‘सुवर्ण पिंपळ’ या चरित्राच्या सातव्या आवृत्तीचे प्रकाशन श्री श्री उत्तमस्वामी महाराज व प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांच्या हस्ते झाले.
यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प.श्री.बाबामहाराज सातारकर यांची सुकन्या ह.भ.प. श्रीमती भगवतीताई दांडेकर(सातारकर) रांचे कीर्तन झाले. तसेच, सौ. मिना पातरपेकर यांचा स्वरगंगा हा भक्तिसंगीताच्या कार्रक्रम झाला.  वरील सर्व कार्यक्रमांचा आनंद इंद्रारणी नदीच्या दोन्ही तीरावरील  हजारो  वारकर्‍यांनी घेतला. 

Post a Comment

 
Top