Add

Add

0
पिंपरी(प्रतिनडीही):- तीर्थक्षेत्री दारुबंदी करण्याची खासदार अमर साबळे यांनी केलेली मागणी ही समस्त वारकरी संप्रदायाची मागणी असून हा साबळे पॅटर्न फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर राबविला जावा, अशी भावना पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वैष्णवांच्या मेळाव्याला उपस्थित असलेल्या जेष्ठ किर्तनकार व प्रवचनकारांनी यावेळी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील धर्म-संस्कृतीच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या वारकरी संप्रदायातील किर्तनकार-प्रवचन कारांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या वतीने सोमवारी (दि.20) पिंपरीतील आचार्य अत्रे सभागृहात करण्यात आले होते. या मेळाव्यात सर्व वारकरी संप्रदायातील जाणकार किर्तनकार व प्रवचनकारांनी खासदार अमर साबळे यांच्या दारुबंदीच्या भूमिकेला एकमुखाने पाठिंबा जाहिर केला.
आषाढ़ी वारीचे औचित्य साधुन पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या वतीने जेष्ठ किर्तनकार मारोतीराव कु-हेकर महाराज यांचा मानचिन्ह आणि तुकाराम गाथा देऊन जाहिर नागरी सत्कार खासदार अमर साबळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर शहरातील सुमारे 500 ज्येष्ठ किर्तनकार आणि प्रवचनकारांचाही भव्य सत्कार यावेळी करण्यात आला.

या कार्यक्रमाला ह.भ.प चैतन्य महाराज देगलूरकर, ह.भ.प प्रकाश महाराज बोधले, ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, ह.भ.प प्रमोद महाराज जगताप, ह.भ.प रामेश्वर शास्त्री महाराज, ह.भ.प कमल महाराज जगताप, ह.भ.प चंद्रकांत महाराज वांजळे, संत साहित्यिक सदानंद मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी-चिंचवड शहर भाजपाचे अध्यक्ष लक्ष्मण जगताप हे होते. तर कार्यक्रमाचे संयोजन शहर भाजपाचे पदाधिकारी व शहरातील वारकरी संप्रदायाचे किर्तनकार व प्रवचनकार यांनी केले होते. ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
यावेळी खासदार साबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, वैष्णवांच्या या मेळाव्यात उपस्थित असलेल्या संतश्रेष्ठ मंडळीमुळे पिंपरी चिंचवड शहरात आज साक्षात पंढरी अवतरली असल्याचा आभास होत आहे. शहराच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात धर्म आणि संस्कृती रक्षक एकत्र आले आहेत. त्यामुळे निर्माण झालेल्या पुण्याईच्या उर्जेने पिंपरी चिंचवड वासियांना सुख समृध्दी लाभावी हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे ते म्हणाले.
देशात आत्तापर्यन्त अनेक परकीय आक्रमणे झाली मात्र देशातील संत परंपरेमुळे धर्म आणि संस्कृतीची रक्षा झाली व ती आजही अबाधित आहे. राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश आणि मार्गदर्शन असेल तरच शासन योग्य पद्धतीने काम करते. मला मिळालेली खासदारकी धर्म संस्कृती आणि नितीमूल्य रक्षणासाठी अर्पण करणार आहे. त्यासाठीच वारकरी संप्रदायाचा एक प्रतिनिधी म्हणुन मी शासनासमोर वारकऱ्यांचे प्रश्न मांडणार आहे, असेही साबळे म्हणाले.
दारुबंदीबाबत आपली भूमिका मांडताना ते म्हणाले की, तीर्थक्षेत्रांवर दारुबंदी झालीच पाहिजे. देश आणि समाज सदृढ़पणे उभा करायचा असेल तर दारूची बाटली आडवी करायलाच हवी. त्याचबरोबर हिंदू धर्माच्या नीतीमूल्यांची जोपासना करणाऱ्या वारकरी संप्रदायांच्या मठांना शासकीय अनुदान मिळालेच पाहिजे, अशी आग्रही भूमिकाही खासदार अमर साबळे यांनी यावेळी मांडली.
यावेळी किर्तनकार आणि प्रवचनकारांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, वारकरी आणि तीर्थक्षेत्रांच्या समस्येबाबत व प्रश्नांबाबत जागृत झालेले अमर साबळे हे एकमेव नेतृत्व आहे. आतापर्यन्त तीर्थक्षेत्रांमधील दारुबंदीच्या मुद्दयावर वारकरी संप्रदाय एकटा लढत होता. मात्र खासदार साबळे यांच्या रूपाने एक खंबीर राजकीय नेतृत्व आम्हाला लाभल्याने आमच्या लढ्याला यश मिळणार अशी आशा प्रत्येक वारकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. धर्म टिकला तर माणूस टिकेल आणि माणूस टिकला तर देश टिकणार आहे. आज आपला महाराष्ट्र टिकला तो फक्त महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायामुळेच आणि याच वारकरी संप्रदायांच्या अडचणी मांडण्यासाठी आता साबळेंसारख्या योग्य आणि कर्तबगार व्यक्तीच्या हाती धुरा सोपविण्यात आली असल्याची भावना यावेळी ज्येष्ठ किर्तनकारांनी व्यक्त केली.

Post a Comment

 
Top