Add

Add

0


दि. 23 ते 25 सप्टेंबर 2016 दरम्यान एमआयटी, पुणे येथे आयोजन 

पुणे(प्रतिनिधी):-माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग), पुणेतर्फे  दि. 23 ते 25 सप्टेंबर या कालावधीत पहिल्या ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’ (एनटीसी) या तीन दिवसीय परिषदेचे कोथरुड येथील माईर्स एमआयटीच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे. ‘शिक्षकांना प्रेरित करुन सक्षम पिढी घडविणे’ हा या परिषदेच्या आयोजनामागील उद्देश आहे.
महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), मनुष्यबळ विकास मंत्रालय, भारत सरकार, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटिज (एआययु), भारतीय छात्र संसद फाउंडेशन, महाराष्ट्र स्टेट प्रिन्सिपल्स फेडरेशन व विश्‍वशांती केंद्र (आळंदी), पुणेचे युनेस्को अध्यासन, हॉर्वर्ड बिझनेस स्कूल क्लब ऑफ इंडिया या संस्थांच्या सहकार्यातून ही पहिल्यांदाच अशा प्रकारची राष्ट्रीय परिषद होत आहे. देशभरातून पदवी व पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमाचे 7000 शिक्षक उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी होणार आहेत.
माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून या परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून प्रा. राहुल कराड यांनी आतापर्यंत अनेक युवकांना लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी प्रोत्साहित केले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या परिषदेचे मुख्य प्रवर्तक आहेत.
या तीन दिवसांच्या परिषदेचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि. 23 सप्टेंबर 2016 रोजी, तर समारोप रविवार, दि. 25 सप्टेंबर 2016 रोजी होणार आहे. तीन दिवसीय परिषदेत एकूण सात सत्रे ठेवण्यात आली असून,
 विषय खालीप्रमाणे : 
1. भारतीय शिक्षण पद्धतीचा इतिहास, सद्यस्थिती आणि भवितव्य
2. सध्याच्या शिक्षण पद्धतीत भारतीय मूल्यांचा समावेश आहे का?
3. कॉर्पोरेटसाठी सीएसआर तसे शिक्षणासाठी टीएसआर
4. आपण शिकवितो; ते शिकतात का?
5. शिक्षणस्तर सुधारण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडतेय का?
6. शिक्षक : मार्गदर्शक, प्रेरक, प्रोत्साहक आपण अवलोकन करतो का?
7. शिक्षणावरील खर्च अल्प नाही का?
या सात विषयांवरील चर्चेसह ‘टीचर टू टीचर कनेक्ट’ विशेष सत्र होणार आहे. या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी शैक्षणिक, अध्यात्मिक, राजकीय, सामाजिक, कला, पत्रकारिता आदी क्षेत्रातील मान्यवर आमंत्रित आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, माजी केंद्रीय शिक्षणमंत्री कपिल सिब्बल, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, प्रसिद्ध अभिनेता अमिर खान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, ज्येष्ठ पत्रकार अर्णव गोस्वामी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. एन. आर. राव, अभिनेता अतुल कुलकर्णी, प्रा. हरी नरके, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु व खासदार डॉ. नरेंद्र जाधव, हॉर्वर्ड बिझनेस स्कूलचे प्रा. व्ही. जी. नारायणन, प्रा. आशिष नंदा, इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती, क्रिकेट समालोचक हर्षा भोगले, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आदी मान्यवर प्रस्तावित आहेत.
आपल्या देशाला अनेक चांगल्या शिक्षकांची परंपरा आहे, ज्यांनी आपल्या शिकविण्यातून प्रेम आणि आदर मिळविला. ध्येय, आदर्शवाद आणि निस्वार्थी सेवा हेच त्यांची ओळख आहे. त्यातील अनेकांनी केवळ ज्ञान दिले नाही, तर मूल्ये आणि आदर्शाच्या सहाय्याने समाजाला एक दिशा दिली. अशाच राष्ट्रउभारणीच्या भावनेने भारलेल्या आणि केवळ शिक्षक म्हणून नाही, तर उत्तम संशोधक, संवेदनशील, समाजाभिमुख, प्रगतीशील, दिशादर्शक, प्रेरणादायी आणि तत्त्वनिष्ठ शिक्षकांची फळी निर्माण करण्याचे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.
या राष्ट्रीय परिषदेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, चेअरमनपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, कार्याध्यक्षपदी प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, कार्यकारी चेअरमनपदी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, सदस्यपदी मिलिंद कांबळे हे आहेत. माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड हे या परिषदेचे मुख्य समन्वयक आहेत.
अशी माहिती येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु व खासदार डॉ. नरेंद्र जाधव, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. अरुण निगवेकर, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ‘डिक्की’चे चेअरमन मिलिंद कांबळे, माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, महाराष्ट्र स्टेट प्रिन्सिपल्स फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. नंदकुमार निकम, तसेच पुण्यातील नामवंत शिक्षणसंस्थातील प्राचार्य (ग्रुप कॅप्टन) दिपक आपटे, डॉ. एल. के. क्षिरसागर, डॉ. टी. एन. मोरे, डॉ. सायली गणकर, डॉ. आर. एम. चिटणीस व प्रा. शैलश्री हरिदास यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Post a Comment

 
Top