Add

Add

0

बारोमास ही डॉ. सदानंद देशमुख यांनी लिहिलेली मराठी कादंबरी. 2004 साली या कादंबरीला प्रतिष्ठित असा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. लेखक स्वत: बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातून आल्याने लेखन वास्तवदर्शी आहे. कादंबरीवर हिंदी चित्रपट करताना हे सारं वास्तव जसंच्या तसं सादर करण्यात लेखक-दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत.

Baromas 1बारोमास या कादंबरीचा अवाका मोठा आहे. कादंबरीवरून चित्रपट बनवायचा म्हणजे निर्माता-दिग्दर्शक दोघांसाठी आव्हानात्मक असतं. कादंबरीची पृष्ठसंख्या जास्त असते. सगळ्या गोष्टी तपशिलात असतात. चित्रपटाला वेळेची मर्यादा असल्याने नेमकेपणा अपेक्षित असतो. फिल्मचं प्रोडक्शन आणि निर्माता धीरज मेश्राम यांनी ‘बारोमास’ या हिंदी चित्रपटाद्वारे कादंबरीतलं नेमकं वास्तव अतिशय उत्तमपणे सादर केलं आहे.
कादंबरी २००४ सालातली असली तरी त्यातलं वास्तव ग्रामीण भागातील जीवन इतकी र्वष उलटून सत्तांतर होऊनही तीळभरही बदललं नाही म्हणून आजही ‘बारोमास’ मनाला भिडतो. अस्वस्थ करतो.
दुष्काळी गावात एकनाथ ऊर्फ एकू आणि मधू दोन मुलं आणि काही एकर शेतीसह सुभानराव आणि शेवंता राहत असतात. सर्वस्वी पाऊस-पाण्यावर जगणं अवलंबून असलेल्या या गावात दुष्काळ पडला आहे. त्यामुळे उत्पन्न नाही. साहजिकच खाण्यापिण्याचे हाल सुरू आहेत. सुभानराव आणि शेवंता सरळमार्गी, कष्टकरी जोडपं आहे. त्यांची दोन्ही मुलं एकनाथ आणि मधू सुशिक्षित आहेत. तरीही त्यांना कुठेही नोकरी मिळत नाही.
एकनाथ हे वास्तव स्वीकारून शेतीत लक्ष देतो. पण मधू मुळातच महत्त्वाकांक्षी, आडदांड आणि अँग्री यंग मॅन आहे. एक ना एक दिवस आपल्याला नोकरी लागेल, आपण शहरी बाबू बनू अशी त्याला खात्री आहे. शेती करणं त्याला कमीपणाचं वाटतं. इतकं शिकून परत मातीतच राबायचं तर शिकायचं कशाला, अशी त्याची मानसिकता आहे. एकनाथची शेती आणि शिक्षण बघून त्याला शेजारच्या गावातील मुलगी दिली आहे. पण सततचा दुष्काळ आणि बेरोजगारीमुळे घरी असलेल्या दारिद्रयाने तीही कंटाळली आहे.
एका बाजूला आतोनात दारिद्रय़ तर दुसरीकडे आधी सावकार आणि मग सरपंच झालेल्याकडे अफाट संपत्ती इतकी आर्थिक विषमता या गावात आहे. अशातच मधूला त्याचा शहरातील मित्र सुरेश भेटतो. पैसे दिले की सरकारी नोकरी लागते. पगार, वरकमाई आणि नोकरी करणारी बायको मिळून सुबत्ता येते, असं गोड स्वप्न तो मधूला दाखवतो. मधू आई-वडिलांना जबरदस्तीने पटवून शेती सरपंचाकडे गहाण टाकून पैसे आणतो. एकनाथला हे रुचत नाही. पण मोठा भाऊ असूनसुद्धा मधूच्या दादागिरीपुढे त्याला काही बोलता येत नाही.
एकनाथचा एक कोळी मित्र कधी कधी त्याला आर्थिक मदत करत असतो. गावातील एक समाजसेवक, जो शहरातील नोकरी सोडून गावी आलेला असतो. तो सतत शेतक-यांना त्यांच्या हक्काबद्दल, त्यांच्या शोषणाबद्दल जागरूक करत असतो. मधूने शेत गहाण ठेवून नोकरी लागावी म्हणून पैसे घेऊन ज्याला दिले असतात, तो माणूस सर्वाना फसवून पैसे घेऊन पळून जातो.
शेतही जातं, पैसेही जातात. वरून अवर्षणाचं संकट, यामुळे सुभानराव आत्महत्येचा प्रयत्न करतात. वैद्याने केलेल्या गावठी उपचाराने त्यांचे प्राण वाचतात. या सगळ्या फसवणुकीने आणि घरावर कोसळलेल्या संकटाने मधू झटपट पैसे मिळवण्यासाठी हमरस्त्यावरील गाडया अडवून पैसे आणि दागिने लुटायला सुरुवात करून दरोडेखोर बनतो. तर एकुलता समाजसेवक शेतक-यांच्या वतीने सरपंचाविरोधात निवडणुकीसाठी उभं करतो.
गावातील निवडणुकीच्या राजकारणात कोणत्याही थराला जाण्याची, अगदी खून करण्याची सत्ताधा-यांची प्रवृत्ती, गावचे पोलीस मॅनेज करून निरपराध माणसांना अडकवणं, स्वत:च्या स्वार्थासाठी एखादं कुटुंबच उद्ध्वस्त करणं असे अनेक पदर या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसरीकडे गावचे स्थानिक भूमिपुत्र असलेल्या कोळयांना विस्थापित करून बाहेरून मासेमारी करणा-या मच्छीमारांना मागवून नदीवरही स्वत:चा हक्क सांगू पाहणा-या कॉन्ट्रॅक्टर कंपनीचंही राजकारण चित्रपटात दिसतं.
शेवटी ‘बारोमास’ ज्यांचं आयुष्य निसर्गावर अवलंबून असतं त्या गरीब शेतकरी कुटुंबाची कशी वाताहत होते. त्याचं अत्यंत वास्तव चित्र आपल्याला चित्रपटात दिसतं. जे आपल्याला अंतर्मुख करतं.
चित्रपटाची पटकथा आणि संवाद धीरज मेश्राम आणि सदानंद देशमुख यांनी लिहिले आहेत. अतिशय साधे सोप्पे असे संवाद अलंकारीकरीत्या आणि कृत्रिमता टाळून त्यांनी रचले आहेत. धीरज मेश्राम यांच्या दिग्दर्श नाला तर दाद दिली पाहिजे. एका संयत पातळीवर त्यांनी हा चित्रपट उभा केला आहे. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही की ऊर बडवणं नाही.
शेतक-यांनी निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेलं आपलं आयुष्य निमुटपणे स्वीकारलं आहे हे संवादातून आणि दिग्दर्शनातूनही जाणवतं. आई-मुलाचे, वडील- मुलाचे, पती-पत्नीचे नातेसंबंध, त्यातील ताणतणाव अतिशय चांगल्या पद्धतीने चित्रित झाले आहेत.
चित्रपटातला साधेपणा, अस्सलपणा दिग्दर्शक म्हणून त्यांनी जपला आहे.एकही प्रसंग रेंगाळत न ठेवता पटापट पुढे सरकणारं कथानक प्रेक्षकांना गुंतवून ठेवतं. नवनीता सेन दत्ता यांच्या संकल्पना हे त्याचं श्रेय आहे.
तंत्रज्ञ आणि कलावंतांचं उत्तम टीमवर्क म्हणून ‘बारोमास’ चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. सुभानरावच्या भूमिकेत बेंजामिन गिलानी यांनी संयत अभिनयाचा उत्कट आविष्कार केला आहे. एकदाही त्यांनी आवाजाची पट्टी उंचावली नाही. सरळ साध्या माणसाचा नम्र आवाज राखणं, नॉन ग्लॅमरस असणं सोप्पं नाही.खूप दिवसांनी या गुणी कलावंताचा जिवंत अभिनय पाहायला मिळाला.
सीमा विश्वास तर नैसर्गिक आणि सहज अभिनयाची चालती-बोलती शाळा आहे. नवरा- मुलांच्या आणि परिस्थितीच्या कचाटयात सापडलेली तरीही सहज जीवन जगणारी शेवंता म्हणजे मूर्तिमंत आशावादाचं प्रतीक आहे. साधा सरळ माणूस त्याने सर्व बारकव्यानिशी उभा केला. रोहित पाठक याने एकनाथचा मच्छीमार मित्राची भूमिका जीव लावून केली आहे. त्यांचा चेहरा विलक्षण भावपूर्ण आहे.
मधूच्या आडदांड आणि रागीट भूमिकेत जतीन गोस्वामी शोभून दिसला आहे.राकट देहात असलेलं वडिलां विषयीचं हळवं मन त्यांनी खूप छान दाखवलं. इतर भूमिकेत सुधीर पांडे, देविका दफ्तरदार, हबीब आझमी, बचन पचेरा, आलोक चतुर्वेदी, शशी भूषण, गजानन बिंड यांनी चांगली साथ दिली आहे.
रवींद्र जैन याचं संगीत उत्तम आहे. खास उल्लेख करावा लागेल तो साऊंड डिझायनर अनमोल भावे यांचा. कमी संगीत देऊन दृश्य जास्तीत जास्त परिणामकारक करण्यात त्यांचा वाटा फार मोठा आहे.

पल्लीपूरम साजीथ आणि प्रियंका सूद यांनी आजच्या धांगट- धिंगा, मस्ती, लाऊडनेस म्हणजेच सिनेमा अशा समीकरण्याच्या वेळेस अत्यंत सुंदर, भावस्पर्शी चित्रपट आणून ख-या सिनेरसिकांना उत्तम भेट दिली आहे.

Post a Comment

 
Top