Add

Add

0
अभिजित लाहिरी यांचे प्रतिपादन; ‘ई-पीजी प्रोजेक्ट’चे उद्घाटन... 


पुणे(प्रतिनिधी):- “तंत्रज्ञानातील झपाट्याने होत असलेल्या बदलांचा आढावा घेऊन, त्याची दिशा ठरवली आणि वेळेत संशोधन पूर्ण झाले, तर त्याच्यातील नाविन्यता टिकून राहते. त्यामुळे केवळ पेटंट किंवा रिसर्च पेपरपुरते संशोधन मर्यादित न ठेवता ते अधिकाधिक ग्राहकाभिमुख कसे होईल, याकडे लक्ष द्यायला हवे. आपण केलेल्या संशोधनाने अथवा विकसित तंत्रज्ञानाने सर्वसामान्यांच्या जीवनात काही बदल घडताहेत का, याचा विचार केला पाहिजे,’’ असे प्रतिपादन टेक महिंद्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष अभिजित लाहिरी यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी अभ्यास मंडळ आणि माईर्स एमआयटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या (एमआयटीसीओई) वतीने एमआयटीच्या प्रांगणातील स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित ‘ई-पीजी प्रोजेक्ट एक्झिबिशन २०१६’च्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून अभिजित लाहिरी बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे सचिव व कार्यकारी संचालक प्रा. डॉ. मंगेश तु. कराड होते.  या प्रसंगी मिलमन थिन फिल्म सिस्टीमचे कार्यकारी संचालक डॉ. मिलिंद आचार्य, एमआयटीसीओईचे संचालक डॉ. आर. व्ही. पुजेरी, प्राचार्य प्रा. डॉ. एम. एस. नागमोडे, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे (एमआयटी) प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर, ई-पीजीचे निमंत्रक आणि विद्यापीठातील अभ्यास मंडळाचे  समन्वयक डॉ. डी. एस. बोरमाने, एमआयटीसीओईचे प्रा. डॉ. वीरेंद्र शेटे आदी उपस्थित होते.
अभिजित लाहिरी म्हणाले, “आपण जे शिकतो अथवा जो प्रकल्प करतो, त्याची फलनिष्पती काय, याचा विचार केला पाहिजे. आपल्या मनात अनेक कल्पना असतात. मात्र, त्या प्रत्यक्षात येईपर्यंत तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल झालेले असतात. त्यामुळे त्यांना वेळीच पूर्ण करणे महत्त्वाचे ठरते. विद्यापीठाकडून अशा प्रकारचे प्रदर्शन राबवून विद्यार्थ्यांतील नवकल्पनांना वाव दिला आहे, ही आनंदाची बाब आहे. आपल्या संशोधनाचे रुपांतर उत्पादनात कसे होईल व त्यातून फायदा कसा मिळेल, याचा विचार आपण केला पाहिजे. त्याच दृष्टिकोनातून टेक महिंद्राने एमआयटीसोबत सामंजस्य करार केला आहे. त्यातून निश्चितपणे सकारात्मक कार्य घडेल.”
डॉ. मिलिंद आचार्य म्हणाले, “ग्राहकांच्या गरजा ओळखून त्या दृष्टीने आपल्या संशोधनाची दिशा ठरवली पाहिजे. सर्वसामान्यांचे जीवन अधिक सुकर कसे होईल, यासाठी कुठलेही संशोधन का करायचे आणि त्याची दिशा कशी असेल, हे दोन प्रश्न आपण सतत विचारायला हवेत. त्यातून आपल्या संशोधनाचे उद्योगात यशस्वी रुपांतर होऊ शकते. आपल्याकडे पेटंट मिळविण्याच्या उद्देशानेच संशोधन केले जाते. परिणामी, कालांतराने असे संशोधन कालबाह्य होते व त्याचा काहीच उपयोग होत नाही.”
प्रा. डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले, “एमआयटीने नेहमी उद्योगांची गरज ओळखून तशाप्रकारचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी एमआयटी टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटरची स्थापना करण्यात आली असून, चांगल्या प्रकल्पांचे रुपांतर उद्योगांत करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. आंत्रप्रेन्युअर्सला चालना दिली जात आहे. विद्यापीठाने अशा नाविन्यपूर्ण प्रकल्पांची एक रिपॉझिटरी प्रणाली बनवायला हवी. जेणेकरुन त्याचा संदर्भ म्हणून अनेकांना वापर करता येईल.”
या प्रदर्शनात एक हजारापेक्षा अधिक प्रकल्प सादर केले असून, त्यामध्ये एम्बडेड सिस्टीम, कम्युनिकेशन सिस्टीम, सिग्नल प्रोसेसिंग या संकल्पनेवरील प्रकल्प आहेत. याप्रसंगी प्रकल्पांविषयीचा संक्षिप्त आढावा घेणाऱ्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. डॉ. डी. एस. बोरमाने यांनी प्रदर्शनाच्य आयोजनामागील भूमिका सांगितली. डॉ. एल. के. क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. आर. व्ही. पुजेरी यांनी स्वागत केले. प्रा. आर. व्ही. कुलकर्णी आणि प्रा. मृणाल अन्नदाते यांनी सूत्रसंचालन केले.  प्रा. डॉ. एम. एस. नागमोडे यांनी आभार मानले. 

Post a Comment

 
Top