Add

Add

0

 पुणे (प्रतिनिधी):-मुळशी तालुक्यातीलपिरंगुट येथे छेडछाडीला कंटाळून शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सोनाली फकिरा पोरे (वय-15) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून, ती नववीमध्ये शिकत होती. याबाबत मुलीचे वडील फकिरा पांडुरंग पोरे यांनी पौड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. यातील मुख्य आरोपी सोन्या ऊर्फ मोहन प्रकाश जाधव (वय-19) याला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याची रवानगी येरवडा येथील कारागृहात केली आहे. दरम्यान, आरोपी जाधवच्या अन्य तीन साथीदारांवरही कारवाई करावी, अशी मागणी मुळशी तालुका आरपीआयने केली आहे. पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटावडेफाटा येथील आर्यावर्त हौसिंग सोसायटीसमोर पोरे कुटुंब राहते. महिनाभरापासून आरोपी जाधव व त्याचे तीन साथीदार सोनालीला त्रास देत होते. या त्रासाला वैतागून सोनालीने शुक्रवारी (दि. 17) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेतील मुख्य आरोपी सोन्या ऊर्फ मोहन प्रकाश जाधव याला पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी कारागृहात केली आहे.
दरम्यान, या छेडछाडीत अन्य तीन जणांचाही सहभाग असल्याने या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी व उर्वरित तिन्ही आरोपींना अटक व्हावी, अशी मागणी मुळशी तालुका आरपीआयने केली आहे. उर्वरित तिघांवरही अँट्रॉसिटी अँक्ट दाखल करून गुन्हे दाखल करावेत व अटक करावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा आरपीआयचे जिल्हा सचिव आनंद रोकडे यांनी दिला आहे. उपनिरीक्षक एन. एस. मोरे पुढील तपास करीत आहेत. 

गेल्या महिनाभरापासून सोनाली हिला त्रास होत होता. याबाबत तिने घरच्यांना सांगितले होते. तिच्या घरच्यांनी आरोपीच्या नातेवाइकांमार्फत आरोपीला समज दिली होती. तरीही शाळा सुरू झाल्यानंतर आरोपीने घराजवळ जाऊन परत तिची छेड काढली व शाळेजवळ जाऊनही छेड काढली.

Post a Comment

 
Top