Add

Add

0
मनासारखं काम मिळणं आणि ते पडद्यावर त्या नजाकतीने पेश करावं या करिता प्रयोगशील कलावंत अचाट मेहनत घेत असतो, कितीही केली तरी त्याचे समाधान होत नसते, त्याच पठडीत एक सुंदर तितकीच गोड अभिनेत्री मोडते आणि ती म्हणजे तेजस्विनी लोणारी. तिच्या आगामी नीलिमा लोणारी दिग्दर्शित बर्नी या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा सुरु आहे.  17 जूनला प्रदर्शित झालेल्या  बर्नीत तिने शीर्षक भूमिका केली आहे. त्या निमित्ताने तिच्यासोबतच्या या गप्पा. 
तू खूप कमी भूमिका करतेस असं बोललं जातं ते खरं आहे का?
त्यापेक्षा मी निवडक भूमिका करते असे म्हणेल. मला सुटेबल आणि ज्यात माझ्यासाठी आव्हानात्मक असेल अश्या भूमिकांना पसंती देते, उगाच संख्या वाढविण्यापेक्षा समाधान देणाऱ्या भूमिकांकडे माझा जास्त कल आहे. पण तसं असलं तरी आत्तापर्यंत मी "गुलदस्ता", "दोघात तिसरा", "नो प्रॉब्लेम", "बाप रे बाप, डोक्याला ताप, वांटेड बायको नं.1, अश्या व्यावसायिक चित्रपटांमध्ये तर "चिनू" वेगळ्या जातकुळीच्या चित्रपटातून काम केले आहे. शिवाय काही चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे खूप संख्या नसली तरी एका कलाकारासाठी आवश्यक तेव्हढे चित्रपट नक्कीच आहेत. 
पण गेल्या दोन वर्षात तुझे विशेष दर्शन झाले नाही?
हो ते खर आहे. पण त्याला कारण आहे माझे शिक्षण. मी सध्या पीएचडी करते आहे, त्यामुळे  स्टडीज कडे गेली दोन वर्षे लक्ष देत होते. ह्या दरम्यान जास्त चित्रपट न करता मोजकेच काही वेगळे चित्रपट केले आहेत, त्यातलाच शिवम लोणारी निर्मित, 'शिवलीला फिल्म्स'चा 'बर्नी' हा एक आहे. 
तू भूमिकेसाठी खूप एक्स्ट्रा मेहनत घेते असे ऐकलय… ?
हो. मला भूमिका करण्यापूर्वी तिच्या अंतरंगात मिसळायला आवडते, असा अनुभव कलाकाराला मिळावा म्हणून तो जीवाचं रान करतो, नशिबाने मला 'चिनू'च्या वेळी भंडारदर्यासारख्या अविकसित क्षेत्रात राहून तेथील आदिवासी जीवनशैली आत्मसात संधी मिळाली आणि आता 'बर्नी' करतानाही काहीसा असाच वेगळा अनुभव जगता आला. ही व्यक्तिरेखा ख्रिस्ती असल्याने ख्रिस्ती संस्कृतीच्या जवळ जाता आले. पुस्तकी ज्ञान मिळवून 'बर्नी'च्या व्यक्तिरेखेत वरवरचे रंग भरणं मला मान्य नसल्याने मी गोव्यातील एका ख्रिस्ती कुटुंबात जाऊन राहिले. त्यांचं राहणीमान, वागणं, बोलणं, खाद्यपरंपरा, संस्क़ृती यांचा अभ्यास केला. त्यामुळे कॅमेऱ्यासमोर 'बर्नी' साकारणं सोपं गेलं.
मग तुला विनोदी भूमिकांचा कंटाळा आला आहे असे म्हणायचे का?
अजिबात नाही. मी एक कलाकार आहे. मला सगळ्या प्रकारच्या भूमिका करायला आवडतात, मग ती विनोदी असो वा गंभीर. तिच्यात काहीतरी वेगळा मसाला हवा म्हणजे ती करताना  एक थ्रिल येते. 'बर्नी' अगोदर नुकताच मकरंद, सयाजी सरांसोबत विनोदी चित्रपट केला होता.  
'बर्नी'च्या एकूण प्रवासाबाबत काय सांगशील?
हा चित्रपट माझी नवी ओळख तयार करेल. 'बर्नी' माझ्यासाठी एक आव्हान होतं, आणि ते मी कसं पेललंय का ते तुम्ही चित्रपटगृहात जाऊनच पहा.
बर्नीचा हा प्रवास अधिक सुखकारक करण्यासाठी माझ्यासोबत दिग्दर्शिका नीलिमा लोणारी, डीओपी समीर आठल्ये, संवादकार सचिन दरेकर, अमृता मोरे, चैत्राली डोंगरे, कुंदन दिवेकर कोरिओग्राफर उमेश जाधव इत्यादी पडद्यामागील कलावंतासोबातच सोबत नीलकांती पाटेकर मावशी,राजन ताम्हाणेसर, सविताताई मालपेकर, भूषण पाटील, किरण खोजे, गिरीश परदेशी, सुमुखी पेंडसे, मौसमी तोंडवळकर आणि इतर सहकालावंत तंत्रज्ञांची तितकीच महत्वपूर्ण साथ आहे.

Post a Comment

 
Top