Add

Add

0

मूळ भारतीय असेलेला ‘योग’ आज जगभरात आपला प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरला आहे आणि केवळ योगच नाही, तर एकूण सगळ्याच भारतीय गोष्टी-मग ते खाद्यपदार्थ असोत, संस्कृती असो किंवा वस्तू – आज जगभरात लोकप्रिय होताना दिसत आहेत. आता अशा या परिस्थितीत साधूच उद्योजक म्हणून पुढे येताना दिसत असल्यास, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. यामध्ये सर्वात प्रमुख नाव घ्यावे लागेल ते बाबा रामदेव यांचे...2011 च्या जन लोकपाल आंदोलन नाट्यानंतर तर हरिद्वार स्थित हे योगगुरु क्वचितच प्रसिद्धीझोतापासून दूर राहिले आहेत. अशा या रामदेव बाबांनी 2014मधील लोकसभा निवडणूकांच्या वेळी नरेंद्र मोदी यांना आपला पाठींबा जाहीर केला होता.

टीव्हीच्या माध्यमातून आपली योगसाधना दाखवून, मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग मिळविणाऱ्या रामदेव यांनी पतंजली या आपल्या आयुर्वेद फर्मची नव्याने सुरुवात केली,जिची स्थापना 2006 मध्ये झाली होती.खरं म्हणजे, कदाचित कोणीही या गोष्टीची अपेक्षाही केली नसताना,पतंजलीची वाटचाल मात्र सुरु आहे ती बिलियन डॉलर विक्रीच्या उलाढालीच्या दिशेने...
सुरुवातीच्या काळापासूनच औषधी लाभ असणाऱ्या उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या पतंजलीने 2014 पासून तर इंस्टंट नूडल्स ते डिटर्जंटस् आणि अगदी वैयक्तिक वापराच्या वस्तूंपर्यंत सर्वच प्रकारच्या उत्पादन निर्मितीला सुरुवात केली. त्यांचा स्वतःचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि पाच हजार फ्रॅंचायझी दुकानांबरो बरच, पतंजलीने आता फ्युचर ग्रुप आणि बिग बझार बरोबरही भागीदारी केली आहे. त्याशिवाय ऑनलाईन किराणा क्षेत्रातील बिग बास्केटसारख्या खेळाडूंच्या माध्यमातूनही त्यांच्या उत्पादनांची विक्री सुरु आहे. मात्र, आतापर्यंत केवळ तीन किंवा चार प्रकारच्या उत्पादनांनीच – ज्यामध्ये तूप, मध आणि टूथपेस्टचा समावेश आहे – आपला ठसा उमटविण्यात यश मिळविले असून, उर्वरित उत्पादनांना मात्र आकड्यांच्या बाबतीत स्वतःला सिद्ध करायचे आहे. टेक्नोपाक या सल्लागार संस्थेचे अध्यक्ष अरविंद सिंघल यांच्या मते, कार्यक्षम पुरवठा साखळी आणि स्थानिकता ही पतंजलीची ताकद आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अगदी उलट पतंजलीचा विपणावरील खर्च हा अगदी कमीतकमी असून, त्यांचे वितरण हे पारंपारीक एफएमसीजीच्या माध्यमातूनच होते.
ऑगस्ट, 2015 च्या सीएलएसए रिसर्च अहवालानुसार, गेल्या चार वर्षात पतंजलीच्या महसूलात चौपट वाढ झाली असून, गेल्या आर्थिक वर्षात त्यांना 2,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला होता. या आर्थिक वर्षाअखेर यामध्ये दुप्पट वाढ होत, तो पाच हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोचण्याची पतंजलीला अपेक्षा आहे. नुकत्याच एका अहवालात तर त्यांनी आत्ताच 4,500 कोटी रुपयांचा आकडा गाठल्याचे सुचविण्यात आले आहे. त्यामुळेच 2016-17या वार्षिक वर्षापर्यंत 7,000 कोटी रुपयांचा आकडा गाठण्याचा त्यांचा दावा असंभाव्य मुळीच नाही.
आज स्पर्धा तर नक्कीच वाढत आहे. मात्र भारतासाठी विशेष योजना आखणे हे बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी गरजेचे झाले आहे आणि इथेच पतंजली त्यांच्यापेक्षा वेगळी ठरत आहे. “ जरी त्यांनी नैसर्गिक उत्पादनांबरोबर स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला, तरी भारतासाठी एका रात्रीत एखादा फॉर्म्युला तयार करणे अशक्य आहे. त्यांना तो भारतीय परिस्थितीनुसार तयार करावा लागेल,” अरविंद सांगतात.
नेस्टले, कोलगेट, आयटीसी या बहुराष्ट्रीय कंपन्या आणि डाबर आणि गोदरेज यांच्यासारखे भारतीय ब्रॅंड, यांना धक्का देणाऱ्या पतंजलीच्या व्यवसायाचा वाढता आलेख हा आजच्या पिढीतील बिझनेस मॉडेल्सशी बरेच साधर्म्य दाखविणारा आहे. जसे की उबर आणि ओला, ज्यांनी अनेक राज्य सरकारांबरोबर विविध कार्यक्रमां साठी भागीदारी केली आहे. त्यांच्याप्रमाणेच पतंजलीनेही महाराष्ट्र सरकारबरोबर भागादारी केली असून, त्या अंतर्गत जंगलात उपलब्ध असलेल्या साहित्यातून मिळालेली अतिरिक्त उत्पादने खरेदी केली जाणार आहेत.
देशात पाच फुड पार्क उभारण्याची आपली योजना असल्याचे रामदेव यांनी सांगितले असून, त्यापैकी मध्यप्रदेशात एक आणि महाराष्ट्रात एक फुड पार्क निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे त्यांचा कच्चा मालही त्यांच्याच शेतातून घेतला जात आहे आणि कंपनी आणि शेतकऱ्यांमधील अडत्यांची फळी दूर करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा फायदा वीस टक्क्यांनी वाढला आहे. तसेच डाबर सारख्या मोठ्या ब्रॅंडस् च्या तुलनेत त्यांच्या किंमती तीस टक्क्यांनी कमी आहेत. किरकोळ विक्रेत्यांना10-20 टक्के नफा मिळत असून, वितरकांना 4.5 टक्के नफा मिळत आहे.

एकीकडे बहुतेक बहुराष्ट्रीय कंपन्या एचआर वर कोट्यावधी रुपये खर्च करत असताना, पतंजलीकडे मात्र लो-कॉस्ट व्यवस्थापन टीम असून, त्यामध्ये कोणत्याही प्रसिद्ध नावांचा समावेश नाही,तर आयुर्वेद आणि दयाळूप णाच्या माध्यमातून सामाजिक प्रभाव साधण्यावर विश्वास असणाऱ्या गुणवंत अशा तरुणांची टीम आहे. या कंपनीत आपला कोणताही हिस्सा नसल्याचा जरी रामदेव यांचा दावा असला, तरी योग आणि आयुर्वेदाच्या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेले त्यांचे सहसंस्थापक आचार्य बाळक्रृष्ण हेच या फर्मचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. आयआयटी-आयआयएमए चे माजी विद्यार्थी असलेले माजी मुख्य कार्यकारी अधिकारी एसके पात्रा यांनी 2014 मध्ये कंपनी सोडली. ज्या पद्धतीने कंपनीचे कामकाज सुरु होते, त्यावरुन उद्भविलेल्या मतभेदांतून त्यांनी कंपनी सोडल्याचे सांगण्यात येते.
एमीबीएची पदवी मिळविणे हेच या व्यवसायासाठी महत्वाचे असू शकत नाही. बिल गेटस् आणि मार्क झुकरबर्ग यांनी तर महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून दिले होते. चलाखी असणे हे खरे महत्वाचे... पतांजलीच्या वाढीचा आलेख (गेल्या एक-दोन वर्षांतील) न भूतो असाच म्हणावा लागेल – अपवाद फक्त1980च्या दशकातील गार्डन वरेली साड्यांचा...
कदाचित कोणाला असेही वाटेल की रामदेव यांची प्रसिद्धी आणि चाहता वर्गाचेच या वाढीत योगदान आहे, पण प्रत्यक्षात असे नाही. “ ते काही श्रीमंत लोकांचे गुरु नाहीत, पण तरी श्रीमंत लोकही त्यांची उत्पादने विकत घेत आहेत. पण आता अपेक्षा खूपच उंचावल्या आहेत – मॅगी सारखा फज्जा होणे त्यांना परवडण्यासारखे नाही,” अरविंद सांगतात.
खरं तर, आर्ट ऑफ लिव्हिंग गुरु श्री श्री रविशंकर यांच्या व्यवसायाची तुलना कधी कधी पतंजलीशी  केली जाते. दहा वर्षे जुनी श्री श्री आयुर्वेदा प्रॉडक्टस् ही कंपनी धान्ये, हेल्थ ड्रींक्स आणि वैयक्तिक वापराच्या वस्तूंची 600 फ्रॅंचायझी दुकानांच्या आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विक्री करते. मात्र पतंजलीचा विक्रम कोणी मोडू शकतो का, ते अजून पहायचे आहे. जर पतंजलीची कोणाशी तुलना करायचीच असेल, तर ती ई-कॉमर्स बाजारपेठेतील युनिकॉर्न फ्लिपकार्टशी होऊ शकते, जी पतंजलीच्या स्थापनेनंतर वर्षभराने सुरु झाली आणि दोन वर्षांपूर्वीच त्याने 1 बिलियन डॉलर्स जीएमव्ही (ग्रॉस मर्कंडाईज व्हॅल्यू) गाठली.
आता लाख मोलाचा सवाल आहे तो म्हणजे, लवकरच रामदेव हे एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा विषय बनणार का? एक अशी व्यक्ती जी आपल्या अध्यात्मिकतेसाठी प्रसिद्ध होती, मात्र पुढे जात तिने एक बिलियन-डॉलरचा व्यवसाय उभारला...

लेखक – अथिरा ए नायर
अनुवाद – सुप्रिया पटवर्धन 

Post a Comment

 
Top