Add

Add

0

जामगाव(प्रतिनिधी):-प्रमुख राज्‍य मार्ग पुणे-ताम्हिणी-कोलाड रस्‍त्‍यावर मुळशी खुर्द (ता.मुळशी) येथे शेतीला पाणी नेण्‍यासाठी खासगी व्‍यक्‍तीने खोदला. नवीन उत्‍तम स्थितीतील रस्‍ता खोदल्‍याने नागरीकांमध्‍ये नाराजी पसरली आहे.
पुणे-कोलाड रस्‍त्‍याची काही वर्षांपुर्वी खडडयांमुळे अत्‍यंत दयनीय अवस्‍था झाली होती. सुमारे एक-दीड वर्षांपुर्वी मुळशी खुर्द येथील रस्‍त्‍याचे नुतनीकरण करण्‍यात आले. त्‍यामुळे रस्‍ता अजुन अत्‍यंत चांगल्‍या स्थितीत आहे. अनेक वर्षांच्‍या प्रतिक्षेनंतर चांगला रस्‍ता झाल्‍याने ग्रामस्‍थ रस्‍त्‍याबाबत जागरुक आहेत. पाईप लाईन टाकण्‍यासाठी रस्‍त्‍याचे खोदकाम करण्‍याऐवजी सोयीस्‍कर मोरीतून घेण्‍याबाबत आग्रही असतात.
पुणे-ताम्हिणी-कोलाड रस्‍ता मुळशी खुर्द गावातून जातो. मुळशी जलायशाच्‍या कडेने गाव वसलेले असून परिसर निसर्गरम्‍य आहे. त्‍यामुळे अनेकांनी येथे जमिनी घेऊन शेती, फळबागा, फार्महाऊस बांधले आहेत.शेतीसाठी मुळशी धरणातून पाणी उचलले आहे. गावाच्‍या वरच्‍या बाजुला जमिन असणा-यांना रस्‍ता ओलांडून पाण्‍याची लाईन न्‍यावी लागते. अशीच गावाच्‍या वरच्‍या बाजुस जमिन असणा-याने उंबरणेच्‍या धसीजवळ रस्‍ता शेतीच्‍या पाण्‍याच्‍या पाईप लाईनसाठी खोदला. काम झाल्‍यानंतर रस्‍ताचे खोदकाम कॉंक्रिटने बुजवले. 
चांगला रस्‍ता खोदल्‍यामुळे तेथे आता रस्‍ता तुटण्‍यास सुरुवात होणार. दबणार, खाली-वर होणार.कॉंक्रिटऐवजी डांबराने पॅच वर्क केल्‍यास रस्‍ता एकजीव झाला असता, असे ग्रामस्‍थांनी नाराजी व्‍यक्‍त करताना सांगितले. 
संबंधितांशी संपर्क साधला असता, त्‍यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रक्‍कम भरुन खोदकामाची परवानगी घेतली असून केलेले खोदकाम लगेच सिमेंटने बुजवले असल्‍याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या अधिका-यांशी संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला असता तो होऊ शकला नाही.
याबाबत मुळशी खुर्दचे सरपंच धनंजय गोरे म्‍हणाले,''पाईप लाईनसाठी नवीन रस्‍त्‍यावर खोदकाम योग्‍य नाही.केलेले खोदकाम सिमेंट ऐवजी डांबराने बुजवायला हवे होते. त्‍यामुळे भविष्‍यात याठिकाणी रस्‍त्‍याची दुरवस्‍था होऊन रस्‍ता खराब होईल. रस्‍ता डांबराने एकजीव करण्‍यात यावा.'' 

Post a Comment

 
Top