Add

Add

0
माले(प्रतिनिधी):- मुळशी  तालुक्यातील माले येथील मुळशी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्‍या पाईप लाईनमधून पाण्‍याची मोठी गळती होत आहे.त्‍यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ऐन दुष्‍काळात होणारी पाणी गळती थांबविण्‍याची मागणी होत आहे. 
माले येथील साठवण टाकीसमोरच्‍या पाईप लाईनच्‍या व्‍हॉल्‍व्‍हमधून पाण्‍याची ही गळती होत आहे. पाण्‍याचा मोठया दाबाने बाहेर पडणारा फवारा सुमारे आठ-दहा फुट लांब जात आहे. यावरून गळतीचा अंदाज येतो. गेल्‍या अनेक महिन्‍यांपासून रात्रंदिवस ही गळती सुरू असल्‍याने परिसरात पाणी साठून चिखल झाला आहे. या काळात गळतीमुळे हजारो लिटर पाण्‍याची नासाडी झाली. 
महाराष्‍ट्रात सर्वत्र पाण्‍याचा भीषण दुष्‍काळ आहे. अनेक ठिकाणी महिलांना पाण्‍यासाठी खोल विहीर, डबक्‍यात उतरून मैलमैल डोक्‍यावर वाहून पाणी आणावे लागत असल्‍याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. येथे मात्र पाणी उपलब्‍ध असल्‍याने अधिका-यांचे पाणी गळतीकडे दुर्लक्ष होतंय.
गेले अनेक महिने सुरु असलेली ही गळती अधिका-यांना दिसत नाही का, असा सवाल ग्रामस्‍थ विचारत आहेत. पाणी गळतीबाबत नागरिकांमध्‍ये तीव्र नाराजी असून पाणी गळती तातडीने थांबविण्‍याची मागणी होत आहे.
याबाबत नादुरुस्‍त व्‍हॉल्‍व्‍ह तातडीने दुरुस्‍त करावा. पाण्‍याचा अपव्‍यय टाळावा अशी मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख सचिन पळसकर यांनी केली आहे. पळसकर म्‍हणाले,'एकीकडे दुष्‍काळात नागरिकांना पाण्‍यासाठी दाही दिशा फिराव्‍या लागताहेत. तर येथे मोठया प्रमाणात पाण्‍याची नासाडी होत आहे. ती थांबवावी.'

Post a Comment

 
Top