Add

Add

0

माले(प्रतिनिधी):-पुणे-कोलाड मार्गावर मुळशी तालुक्यातील माले येथील घाटात वाळु वाहुन नेणा-या ट्रकचा ब्रेक न लागल्‍याने, ट्रक घाटात धडकून पलटी झाला. या अपघातात ट्रकचालक जखमी झाला.हा अपघात शुक्रवार (ता.३) दुपारी दीड वाजताच्‍या दरम्‍यान झाला.ट्रकचालक धनाजी कदम (पुर्ण नाव समजु शकले नाही), वय-४२ वर्षे, रा.ताथवडे, ता.मुळशी हा या अपघातात जखमी झाला. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कदम शुक्रवारी वाळूचा ट्रक घेवून कोकणाच्‍या बाजूने पौड मार्गे पिंपरीकडे निघाला होता. दुपारी दीड वाजताच्‍या सुमारास माले घाटात आल्‍यावर घाटातील तीव्र उतार व वाळूच्‍या वजनामुळे ट्रकचे ब्रेक लागले नाहीत. त्‍यामुळे ट्रक घाटात धडकला. ट्रक धडकून पुर्ण पलटी झाला. ट्रकचालक केबीन व स्‍टेअरींगमध्‍ये अडकला.
अडकल्‍याने त्‍याला बाहेर निघता येईना. अपघात पाहून रस्‍त्‍याने जाणारे वाहनचालक बंडा शेंडे यांनी गावातील स्‍थानिक तरुणांना मदतीसाठी बोलावले.तरुणांनी गावातील जेसीबी बोलावून ट्रकचालकाला बाहेर काढण्‍याचा प्रयत्‍न केला. अडकून राहिल्‍यामुळे जखमी झालेला ट्रकचालक जीवाच्‍या आकांताने ओरडत होता. परंतू ट्रकच्‍या वजनामुळे ट्रकचालकाला बाहेर काढता येईना. शेवटी सुदैवाने रस्‍त्‍याने चाललेल्‍या क्रेनच्‍या मदतीने ट्रकचालकाला बाहेर काढण्‍यात यश आले. दरम्‍यान तरुणांनी १०८ क्रमांकावर फोन करुन रुग्‍णवाहिका बोलावली होती. उपचारांसाठी जखमी ट्रकचालकाला पौड व त्‍यानंतर ससून येथे नेण्‍यात आले. 
माले येथील श्री साई मित्र मंडळाच्‍या  रुपेश जोरी, उमेश जोरी, संतोष शेंडे, नाना पासलकर आदी तरुणांनी ट्रकचालकाला बाहेर काढणे, जेसीबी, रुग्‍णवाहिका, क्रेन बोलावणेसाठी मदत केली. 
माले घाटात विशेष उपाय योजनांची गरज… 
पुणे-कोलाड मार्गे कोकणातून पुण्‍याच्‍या दिशेने जाताना माले घाटात अत्‍यंत तीव्र उतार व 
वळण लागते. मोठी वाहने, मालवाहतूक करणा-या वाहनांचा उतारावर वेग थोडा जरी जास्‍त असला तरी वाहनांच्‍या व मालाच्‍या वजनांमुळे या अनेकदा वाहनांचे ब्रेक निकामी होतात. त्‍यामुळे याठिकाणी मोठया प्रमाणात अपघात होत असतात. येथील अपघातांत अनेकांना जीव गमवावे लागले असल्‍याने येथे घाटाचा उतार कमी करणे,रेडिअमच्‍या सुचना फलकांची संख्‍या वाढवणे, विशेष उपाययोजना करण्‍याची मागणी राष्‍ट्रवादीचे युवा नेते अविनाश कानगुडे,शिवसेनेचे विभागप्रमुख सचिन पळसकर,संभवेचे माजी उपसरपंच अॅड.प्रशांत जोरी यांनी केली. 

Post a Comment

 
Top