Add

Add

0
सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही; आळंदीतील इंद्रायणी घाटांची पाहणी

पुणे(प्रतिनिधी ) :- “समस्त महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या पांडुरंगाचरणी लाखो भाविक वारीनिमित्त पंढर पूरात येतात. त्यांच्या सोयीसाठी चंद्रभागा नदी स्वच्छ,सुंदर आणि निर्मल बनविण्यासाठी ‘नमामि चंद्रभागा’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला असून, त्याच्या पूर्णत्त्वासाठी शासन तत्पर आहे. चंद्रभागेच्या स्वच्छता आणि संवर्धनासाठी आवश्यक सर्वतोपरी मदत शासनस्तरावर केली जाईल,” अशी ग्वाही राज्याचे अर्थ, नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आळंदीत आल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी विश्‍वशांती केंद्र (आळंदी),माईर्स एमआयटी, पुणे व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीतर्फे इंद्रायणीच्या तीरावर बांधण्यात आलेल्या घाटांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आमदार बाळासाहेब भेगडे, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा.कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि विश्‍वशांती केंद्राचे सल्लागार डॉ.एस.एन.पठाण आदी उपस्थित होते.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड यांच्या संकल्पनेतून इंद्रायणीकाठी बांधण्यात आलेले सुंदर घाट ही साक्षात माऊलींचीच इच्छा असावी. तसेच घाट पंढरपूरातही व्हावेत, ‘नमामि चंद्रभागा’ जगातील सुंदर असा प्रकल्प व्हावा,यासाठी प्रयत्न सुरु आहेत.समर्थ रामदासांनी आपल्या मनाच्या श्‍लोकात म्हटल्या प्रमाणे ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे’ या प्रश्‍नाचे उत्तर शोधले तर वारकरी हा जगातील सर्वात सुखी माणूस असल्याचा प्रत्यय येईल. त्यामुळे वारकरी बनून ईश्‍वरभक्ती केली पाहिजे.”
प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा.कराड म्हणाले, “पंढरपूर येथे साकारात असलेल्या ‘नमामि चंद्रभागा’ या प्रकल्पात वारकरीही आपले योगदान देण्यास उत्सुक आहेत. अशा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पूर्णपणे दारुबंदी व्हायला हवी.”
बबनराव लोणीकर यांनीही आपल्या शुभेच्छा दिल्या. सुधीर मुनगंटीवार व बबनराव लोणीकर या दोघांचेही विश्‍वरुप दर्शनमंचावर प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी तुळशीहार घालून सत्कार केले. डॉ. एस. एन. पठाण यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले व आभार मानले.

Post a Comment

 
Top