Add

Add

0
ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर; पालखी सोहळ्यानिमित्त लोकशिक्षण कार्यक्रम
पुणे(प्रतिनिधी):- “आपण ज्ञानेश्‍वरीचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. ज्ञानेश्‍वरी हा ग्रंथ सर्वसमावेशक असल्यामुळे आपल्याला आनंद तर मिळतोच, पण त्यापासून आपल्याला ज्ञानही मिळते. जीवनातील सर्व प्रश्‍नांची उकल करण्यासाठी ज्ञानेश्‍वरी ही मार्गदर्शक आहे,” असे प्रतिपादन ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर यांनी केले.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 26 जून 2016 ते मंगळवार, दि. 28 जून 2016 या दरम्यान श्री संत ज्ञानेश्‍वर-तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्‍वरूप दर्शन मंच, श्री क्षेत्र आळंदी रेथे पालखी सोहळ्यानिमित्त युनेस्को अध्यासनाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या लोकशिक्षणपर कार्यक्रमाच्या पहिल्या पुष्पात ते बोलत होते.
 यावेळी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, ह.भ.प. श्री. चंद्रकांत महाराज वांजळे, ह.भ.प. श्री. नारायण महाराज उत्रेश्‍वर पिंप्रीकर, श्री. कुर्‍हाडे पाटील, सौ. उर्मिला विश्‍वनाथ कराड, श्रीमती उषा जोगळेकर, सौ. उषा विश्‍वनाथ कराड व इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर म्हणाले, “आजच्या काळात ज्ञानेश्‍वरीचा अभ्यास महत्त्वाचा आहे. ज्ञानेश्‍वरीच्या अभ्यासामुळे गुन्हेगारी, अत्याचार व काळाबाजार कमी होण्यास मदत होईल. प्रत्येकाने ज्ञानेश्‍वरीच्या किमान पाच तरी ओव्या वाचायला हव्यात. ज्ञानेश्‍वरी व त्याप्रकारच्या ग्रंथांच्या आधारावर वारकरी संप्रदाय उभा आहे. त्यामुळे वारीच्या काळात कुठलेही अनिष्ट प्रकार घडताना दिसत नाहीत, ही संतांची पुण्याई आहे. सदाचरणाचे वातावरण भरुन राहिलेले दिसते. सर्व वारकरी एकमेकाला ‘माऊली’ या नावाने पुकारतात. तेथे जातीधर्म तर सोडाच, पण स्त्रीपुरुष हा भेदसुद्धा नसतो. एकाच कुटुंबातले सर्वजण एकमेकाला माऊली म्हणतात. सर्व मानवजातीची एकात्मता येथे आध्यात्मिक पातळीवरुन अनुभवताना दिसते.”
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “वारी ही जीवनाला आकार देते. काम, क्रोध, मद, मत्सर, विकार आणि विकृती या षडरिपूंवर विजय मिळवायचा असेल, तर वारीत सहभागी झाले पाहिजे. कारण वारी हे चालतेबोलते विद्यापीठ आहे.” 
यानंतर ह.भ.प. श्री. चंद्रकांत महाराज वांजळे यांचे कीर्तन झाले. श्रीमती योजना शिवानंद पाटील व सहकारी मुंबई यांचा ताटी उघडा ज्ञानेश्‍वरा हा अनोखा अभंगवाणीचा कार्यक्रम झाला. या सर्व कार्यक्रमाचा लाभ इंद्रायणीच्या दोन्ही तीरावरील हजारो वारकर्‍यांनी घेतला.

Post a Comment

 
Top