Add

Add

0
जलसंपदा व जलसंवर्धन राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे प्रतिपादन;
प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण
 पुणे(प्रतिनिधी):-“महाराष्ट्रात आज अनेक शिक्षणसंस्था आहेत. परंतु, एमआयटीसारख्या संस्थेत संस्कार आणि मूल्यांची जपणूक केलेली पहायला मिळते. पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड यांच्या संस्कारात वाढलेल्या कराड कुटुंबाने नेहमीच समर्पित कार्य करणार्‍या व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे. अशा समर्पित आणि आदर्श व्यक्तीमत्त्वांच्या सात्विक संस्कारातूनच उद्याची पिढी घडेल,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व जलसंवर्धन राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.

विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे ‘पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड यांच्या तृतीय पुण्यस्मरणाचे औचित्य साधून, शैक्षणिक, सामाजिक आणि अध्यात्माच्या समन्वयातून आयुष्यभर समाजप्रबोधन व सांप्रदायिक सद्भावनेचे कार्य, समर्पित भावनेने करून, समाजासमोर आदर्श निर्माण करणार्‍या व्यक्तीमत्त्वांचा विजय शिवतारे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे होते. 

लातूर येथील माईर्स एमआयटीच्या एमआयएमएसआर मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यात श्रीमती मंजुश्री श्रीकांत खाडिलकर (पुणे), श्रीमती प्रभाताई शंकरराव झाडबुके (बार्शी, जि. सोलापूर), प्रा. डॉ. अनघा वसंत पाटील (औरंगाबाद), सौ. साधना विजय फळणीकर (पुणे), लक्ष्मीबाई शिवाजीराव निंबाळकर (बार्शी, जि. सोलापूर) व सद्गुरु अनुराधाताई अमरसिंह देशमुख (मोहोळ, सोलापूर) यांना ‘‘पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार’, तर नांदेड येथील ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. शिवाजीराव शिंदे यांना ‘विशेष समर्पित जीवनगौरव पुरस्कार’  देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, सुवर्णपदक व रोख रु. 11,000/- (रुपरे अकरा हजार) असे रा पुरस्काराचे स्वरुप होते. 

या प्रसंगी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस. एन. पठाण, माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, विश्वशांती संघाचे कार्यकारी संचालक डॉ. संजय उपाध्ये, माईर्स एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक रमेशअप्पा कराड, माईर्स एमआयटीच्या संचालिका प्रा. स्वाती कराड-चाटे, माईर्स एमआयटीच्या संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे, तुळशीराम कराड, काशीराम कराड, प्रा. सुधीर राणे आदी उपस्थित होते.

विजय शिवतारे म्हणाले, “समर्पित भावनेने कार्य करणार्‍या व्यक्तींची संख्या नगण्य आहे. त्यातील प्रयागअक्कांचे स्थान आपल्या सर्वांसाठी आदर्शवत आहे. त्यांच्याच संस्कारातून प्रा. डॉ. कराड यांनी एमआयटीची गरुडझेप घेतली आहे. येणारा प्रत्येक माणूस काहीतरी ध्येय घेऊन जीवनात येत असतो. आपल्या वाटेला आलेले आयुष्य कसे जगावे, हे सांगणारे कोणीतरी असावे लागते. प्रयागअक्कांच्याप्रमाणेच वसंतदादा पाटील यांचाही पाठिंबा राज्यातील अनेकांना मिळाला आहे. त्यांच्या दूरदृष्टीतूनच खासगी शिक्षणाचा पाया रोवला गेला आणि आज राज्यात लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध झाली. वसंतदादाचे हे ऋण फेडण्यासाठी, तसेच त्यांचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी  शिक्षणसंस्थांनी पुढाकार घेऊन भव्य दालन उभारावे. 

“आजच्या या समर्पित व्यक्तीमत्त्वांचा सन्मान करताना आमचीही जबाबदारी वाढली आहे. आज राज्याचे जलसंपदा खाते बदनाम झालेले आहे. त्या खात्यामार्फत चांगले व पुढील शंभर वर्षे टिकेल असे काम करुन शेतकर्‍यांची दु:खे दूर करण्याची शक्ती मला मिळावी, असा आशीर्वाद प्रयागअक्कांच्या चरणी मागितला आहे,” असेही शिवतारे यांनी नमूद केले. 

दिलीप कांबळे म्हणाले, “शैक्षणिक संस्थांबरोबर कराड कुटुंबीयांनी आळंदी-पंढरपूर या तीर्थक्षेत्रांचा विकास केला आहे. वारकरी संप्रदायात वाढलेल्या कराड कुटुंबीयांवर प्रयागअक्कांनी चांगले संस्कार करुन समाजाप्रती देण्याची भावना रुजविली. आजच्या या समर्पित व्यक्तीमत्त्वांकडून प्रत्येकाने शिकायला हवे. स्वकर्तृत्त्वाबरोबरच कोणाच्यातरी पाठबळाची गरज असते. प्रा. कराड यांना प्रयागअक्का आणि वसंतदादा पाटील या दोघांचेही भक्कम पाठबळ मिळाले. त्यांनी रामेश्वर येथे उभारलेला राम-रहिम सेतू सामाजिक एकतेचे सूत्र घालून देणारे उदाहरण आहे.”

प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड  म्हणाले, “भारतीय संस्कृती, परंपरा व तत्त्वद्न्यानाचे मूर्तीमंत प्रतीक असलेल्या प्रयागअक्कांच्या नावे पुरस्कार देऊन समाजातील आदर्श व्यक्तींचा गौरव करावा, त्यांचे कार्य भावी पिढीसमोर मांडावेत, या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो. अक्कांचे आमच्या जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यांनी केलेला त्याग, समर्पण आयुष्यभर विसरता येणार नाही.”


मंजुश्री खाडिलकर, प्रभाताई झाडबुके, प्रा. डॉ. अनघा पाटील, साधना फळणीकर, अनुराधाताई देशमुख, डॉ. शिवाजीराव शिंदे यांनी सत्काराला उत्तर देत आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. संजय उपाध्ये यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. प्रा. सुधीर राणे व प्रा. सुरेंद्र हरकळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी आभार मानले.

Post a Comment

 
Top