Add

Add

0

माले(प्रतिनिधी):-मुळशी तालुक्यातील  माले येथे विविध विकास कामांचे भुमिपूजन व उद्घाटन नुकतेच झाले.या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे पदाधिकारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. त्‍यामुळे शिवसेनेने श्रेयवादासाठी उदघाटनांचा कार्यक्रम केल्‍याचा आरोप राष्‍ट्रवादीने केला. तर शिवसेनेने हा राष्‍ट्रवादीचा खोडसाळपणा असल्‍याचे सांगितले. 

माले येथे पुणे जिल्‍हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व मुळशी प्रादेशिक पाणी पुरवठा देखभाल दुरुस्‍ती अंतर्गत बांधण्‍यात आलेल्‍या साडेबारा लाखांच्‍या पाण्‍याच्‍या टाकीचे उदघाटन वमधलीवाडी गणेशमंदिर येथील सभामंडप सुशोभिकरण करण्‍याचे दोन लाखाच्‍या कामाचे भुमिपूजन शिवसेना सहसंपर्कप्रमुख व मुळशी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य बाळासाहेब चांदेरेयांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपसंघटक राम गायकवाड, तालुका प्रमुख प्रकाश भेगडे, युवा सेना तालुका प्रमुख संदेश हरगणे, उपतालुका प्रमुख अनिल आधवडे, दिलीप गुरव, दिपक करजांवणे, विभाग प्रमुख सचिन पळसकर, महिला आघाडीच्या विभाग संघटिका कविता दातीर, माले सोसायटीचे चेअरमन राजेंद्र आधवडे, सरपंच मंजुश्री ढमाले, उपसरपंच आनंता वाघमारे, ग्रामसेवक प्रशांत सुर्यवंशी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्‍यान राष्‍ट्रवादीचे धरण विभाग अध्‍यक्ष विजय कानगुडे, सुहास शेंडे यांनी पाण्‍याच्‍या टाकीच्‍या उद्घाटनाबददल सर्व पक्षांना न कळवल्‍याचा आक्षेप घेतला. ते म्‍हणाले,''पाण्‍याच्‍या टाकीचे काम राष्‍ट्रवादीच्‍या पदाधिका-यांच्‍या प्रयत्‍नातुन मार्गी लागले. मात्र राष्‍ट्रवादीच्‍या पदाधिका-यांना कळविण्‍यात आले नाही. शिवसेनेने केवळ श्रेय लाटण्‍यासाठी हे उदघाटन केले. तसेच अपुर्ण कमानीचे उदघाटन केले.'' 


राष्‍ट्रवादीचे जिल्‍हा परिषदेतील गटनेते शांताराम इंगवले म्‍हणाले,''जिल्‍हा परिषदेत टाकीचे काम अडकले होते, तेंव्‍हा मी प्रयत्‍न करून मार्गी लावले. उद्घाटनाबाबत फोन आला तेंव्‍हा खासदार सुप्रिया सुळे यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त कार्यक्रम असल्‍याने उद्घाटन पुढे ढकलण्‍याची सुचना केली होती. तरीही त्‍यांनी उदघाटन उरकून घेतले.''
'मी सरपंच असताना याबाबतचा प्रस्‍ताव तयार करुन पाठवला. ग्रामपंचायतीत उदघाटनांबाबत कोणताही विषय कागदावर आला नाही. फोनवरुन कळविण्‍यात आले.' अशी नाराजी माल्‍याचे माजी सरपंच व विद्यमान सदस्‍य विजय दळवी यांनी व्‍यक्‍त केली.' 
शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अनिल आधवडे यांनी खुलासा केला की,''कामाचा पाठपुरावा आम्‍ही केला. राष्‍ट्रवादी, शिवसेना, भाजप सर्व पक्षांच्‍या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांना कळविले होते. वाट पाहुनही ते आले नाहीत. आले असते तर त्‍यांच्‍या हस्‍ते उदघाटन केले असते. 
शिवसेनेचे पदाधिकारी आले म्‍हणून त्‍यांच्‍या हस्‍ते उदघाटन केले. कमानीबाबतचे राष्‍ट्रवादीचे आरोप खोडसाळ पणाचे आहेत. कमानीसाठी आम्‍ही प्रयत्‍न केले. कमानीचे उदघाटन झाले नसुन कमानीच्‍या बांधकामासाठी पहाड बांधला होता. तो सोडल्‍यानंतर जुना रस्‍ता मोकळा झाला. त्‍याच्‍या वापराची सुरवात करण्‍यात आली.''
मालेच्‍या सरपंच ढमाले म्‍हणाल्‍या,''राष्‍ट्रवादीने बंधा-यांची भुमिपूजने, उदघाटने, डस्‍टबीन वाटप यावेळी आम्‍हाला डावलले. कोणतेही निमंत्रण न देता दुरध्‍वनीवरून कळवले. माल्‍यासाठी आलेले डस्‍टबीन राष्‍ट्रवादीच्‍या कार्यकर्त्‍यांनी नेले. खासगी जागेत कार्यक्रम घेतले. विकासकामातील अडथळे दुर करण्‍याऐवजी पक्षीय राजकारण होत आहे.''

Post a Comment

 
Top