Add

Add

0
पुणे: -‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’च्या वतीने पक्षाच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. नेहरू मेमोरियल हॉल, घोले रोड येथे सोमवारी सकाळी ही बैठक पार पडली.
या बैठकीला पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण,महापौर प्रशांत जगताप, आमदार अनिल भोसले,स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडू केमसे, माजी महापौर, आमदार, पदाधिकारी, नगरसेवक, सर्व सेलचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘आपल्या पक्षाने जो पर्यावरण दिनाचा कार्यक्रम घेतला तो खूप स्तुत्य आहे. राष्ट्रवादी पक्षा इतके इतर कोणत्याच पक्षात पर्यावरण जागृती विषयक कार्यक्रम होताना दिसत नाही. पर्यावरण विषयक जागरूकता ही झालीच पाहिजे. आगामी निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांनी एकत्रितरित्या काम करायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या वर्षांत पुणे शहरात जी कामे केली आहेत. ती पुणेकरांसमोर मांडली गेली पाहिजेत. त्यांच्यापर्यंत ती पोहोचली पाहिजेत. 2017 ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पक्षाने विविध कार्यशाळा व शिबिरांचे आयोजन केले आहे.’
‘भाजप पक्षावर निशाणा साधत ते म्हणाले, पुण्यातील आठ आमदार भाजपचे आहेत. त्यांनी शहरातील कोणते प्रश्‍न त्यांनी मार्गी लावले. नुसती जाहिरातबाजी करून मते मिळविली आहेत. पण काम कोठेच दिसत नाही. कोट्यवधी रुपये जाहिरातींवर भाजपाने खर्च केले. नवीन पिढीला ‘मेक इन इंडिया’, ‘मेक इन महाराष्ट्र’ या नावाखाली भूलथापा दिल्या आहेत, असा टोला अजित पवार यांनी लगावला. 
मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले, ‘आगामी काळात विविध प्रकारच्या आठ कार्यशाळा कायकर्ते व नगरसेवकांसाठी घेण्यात येणार आहेत त्यापैकी किमान सहा कार्यशाळांमध्ये त्यांनी सहभाग घेतलाच पाहिजे, तर त्यांना महानगरपालिकेचे कामकाज कश्याप्रकारे चालते हे कळेल. आपल्या पक्षाचे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करायचे असे सूत्र आहे.’
‘आजचा युवक विकासाच्या कामांना अधिक प्राधान्य देतो. जिथे विकास असेल त्याच पक्षाच्या पाठिशी युवा पिढी उभी राहते. तरुण मतदार जास्त आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांना सोशल मीडियाचा वापर अधिकाधिक करता येणे गरजेचं आहे. त्याचेही प्रशिक्षण आपण कार्यशाळांमध्ये देणार आहोत.इथून पुढील काळात अधिक जोमाने आणि युद्धपातळीवर,राजकीय इच्छा शक्ती मनात ठेवून काम करणे गरजेचे आहे. व्यक्तिमत्त्व विकास व संभाषण कौशल्य खूप आवश्यक आहे. त्यासाठी आपण कार्यशाळांचे आयोजन करणार आहोत. या कार्यशाळेला सर्वांनी आलेच पाहिजे.आपली संघटना मजबूत झाली, तर पक्ष मजबूत होतो. मजबूत संघटना कधीच वाया जात नाही. त्यामुळे आपण सर्वांनी चांगल्या विचारांनी चांगले काम करून पुढे जाऊ या.’ 
खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सर्व प्रभागात कोणते कृती कार्यक्रम आखले आहेत याबद्दल माहिती दिली. ‘विद्यार्थी, युवक, महिला, युवती आणि सर्व सेलनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. कार्यकर्ते व नगरसेवक सर्वांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाची आठ मॉडेल तयार केली आहेत. त्यामध्ये त्यांनी सहभाग घेणे आवश्यक आहे. 2017 च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सर्वांनी कामाला लागलं पाहिजे.’
‘आपल्या पक्षाचे ब्रँडिंग होणे गरजेचे आहे. आपल्याकडे आपण केलेल्या कामाची माहिती भरपूर आहे, पण ती लोकांपर्यंत पोहोचवण्याची अत्यंत गरज आहे. म्हणूनच आपण सर्वांनी टीम म्हणून एक कुटुंब म्हणून काम केले पाहिजे.’असेही खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण म्हणाल्या.

Post a Comment

 
Top