Add

Add

0
मुंबई, (विशेष प्रतिनिधी):- खरीप हंगाम सुरू होत असतानाच महाबीजच्या बियाणांच्या दरामध्ये 50टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याने आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले. अनेक मंत्र्यांनी या रवाढीस विरोध दर्शविला. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळीपरिस्थिती पाहता या दरवाढीस स्थगिती दिल्याचे जाहीर केले.

तूर, हरबरा, मूग व इतर कडधान्यांच्या बियाण्यांचे भाव दुप्पट झाल्याने खरीपांच्या पेरणीसाठी शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना महाबीज महामंडळाने ही दरवाढ कशी केली, असा सवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाजप व सेना मंत्र्यांनी केला. त्यावर बरीच गरमागरम चर्चा झाली. याबाबत बोलताना वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले की, कडधान्यांचे पेर्याचे भाव वाढले असून सोयाबीन बियाणे फारसे वाढले नाहीत तर बिटी कापसाच्या बियाणांचे दर खाली आले आहेत. याबाबत आज मंत्रिमंडळात चर्चा झाली. शेवटी या दरवाढीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली.
खतांच्या किमती स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला असताना राज्य बियाणे महामंडळ दरवाढ करीत आहे, हे योग्य नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. दुष्काळ व नापिकीच्या पार्श्वभूमीवर महाबीजने बियाणांच्या दरात वाढ करण्यापूर्वी शेतकर्यांच्या आर्थिक स्थितीचे महत्व जाणून घेणे आवश्यक होते. खरीप हंगामाच्या पेरण्या तोंडावर आल्या असताना ही दरवाढ शेतकर्यांना आर्थिक अडचणीत आणण्याचे मत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी व्यक्त केले. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात पूर्वीच्याच दराने बियाणे उपलब्ध करून देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात 29 हजार गावांमध्ये दुष्काळी परिस्थितीचा सामना शेतकरी करीत आहे. यंदा समाधानकारक पाऊस पडेल अशी अपेक्षा करत असताना शेतकर्यांनी उत्साहात पेरणीची तयारी केली आहे. अशातच खासगी बियाण्यांबरोबर राज्य बियाणे महामंडळाने आपल्या बियाण्यांच्या दरात वाढ केली होती. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी होत होती.
पाऊस लांबल्याने खरिपाचे पेरे 20 जूननंतर करावे!
Mahabeej1येत्या 18 ते 20 जूनपासून खर्या अर्थाने पावसाला सुरुवात होणार असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. हे लक्षात घेता राज्यातील शेतकर्यांनी खरीपाच्या पेरण्या 20 जूननंतरच कराव्या. अगोदर केल्यास पेरेलेले बियाणे वाया जाऊ शकते. याबाबत केएलएमटी यांचा पावसाबाबतचा अहवाल चुकीचा ठरला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने दिली. राज्यात लातूर, उस्मानाबाद या ठिकाणी पेरण्या सुरु झाल्या आहेत. तर भाताची 33 हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. खरीपाचे एकूण क्षेत्र 152 लाख हेक्टर असून गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असताना 141 लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. ऊसाचे उत्पादन 60 हजार हेक्टरवरून यावर्षी खाली येऊ शकते. त्याजागी शेतकर्यांनी तूर, हरबरा, मूग इत्यादी कडधान्यांकडे जाण्याचे ठरविले असले तरी बियाणांचे दर वाढल्याने शेतकर्यांमध्ये नाराजी आहे.

Post a Comment

 
Top