Add

Add

0
पुणे(प्रतिनिधी):- जगभर 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन नुकताच साजरा झाला. या योगदिनाच्या निमित्ताने विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे राज्यभर खेड्यापाड्यात योगसाधना शिबिरे घेण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी केली. एका वृत्तवाहिनीवर ‘योगसाधना आणि भारतीय संस्कृती’ या विषयावर झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी ही घोषणा केली. राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाचे उपसंचालक नरेंद्र सोपल यांनीही या उपक्रमाला पाठिंबा दर्शविला असून, या शिबिरांसाठी ठिकाणे उपलब्ध करुन देण्याचे आश्‍वासन दिले आहे.
इंडिया इंटरनॅशनल मल्टिवर्सिटीचे अध्यक्ष व जगविख्यात संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या संकल्पनेनुसार व परमपूर्ण योग पीठाचे संस्थापक योगाचार्य मारुती पाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही योगसाधना शिबिरे होणार आहेत. जिल्हा, तालुका व गावपातळीवर ही शिबिरे होणार असून, ही शिबिरे सर्वांसाठी विनामूल्य असणार आहेत. यामध्ये योगसाधनेचे महत्त्व, प्रात्यक्षिके आणि योगविषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. लवकरच या शिबिरांची आखणी व कृतीआराखडा तयार करण्यात येणार असून, येत्या काही दिवसांत त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या शिबिरांसाठी लागणारी जागा क्रीडा संकुलांत दिली जाणार आहे, असे आश्‍वासन नरेंद्र सोपल यांनी दिले आहे.
माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूह ही संस्था शैक्षणिक, आध्यात्मिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करीत आहे. महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालयांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कानाकोपर्‍यात योगाचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. आज मधुमेह, हृदयविकार यांसारखे आजार तरुणवयात होऊ लागले आहेत. या पिढीतील अनेक तरुण व्यसनाधीन बनले आहेत. अशा स्थितीत शरीर आणि मनाचे संतुलन राखण्यासाठी तसेच अशा प्रकारच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी योगसाधना अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.
योगसाधनेचे महत्त्व विशद करताना प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “भारतामध्ये योगशास्त्र प्राचीन काळापासून प्रचलित आहे. पाश्‍चिमात्य देशांनीही त्याचे अनुकरण करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, आपल्याच योगशास्त्रात आपण काहीसे मागे पडलो असून, त्याचा योग्य वापर होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनोच्या निर्णयानंतर योगदिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास सुरुवात केली आहे. योगशास्त्राला आपल्या देशात धार्मिकतेची चौकट दिली गेली. मात्र, योगशास्त्र हे कोणत्याही धर्मापुरते मर्यादित नसून, संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी अतिशय उपयुक्त आहे. मन, बुद्धी आणि शरीर या तिन्ही गोष्टीचा विकास या एका योगसाधनेमुळे होतो. हीच बाब ओळखून आमच्या संस्थेतर्फे महिन्यातून किंवा आठवड्यातून एक दिवस प्रत्येक ठिकाणी योगशिबिराचे आयोजन केले जाणार आहे. योगाचार्य मारुती पाडेकर हे या शिबिरांत मार्गदर्शन करणार आहेत.”

Post a Comment

 
Top