Add

Add

0
पुणे (प्रतिनिधी):-''पुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पुणे शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे शास्त्रशुध्द नियोजन यापूर्वी सर्वांना बरोबर घेऊन केले आहे. पुणेकरांना वाढीव पाणी कपातीची आवश्यकता नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.
     जिल्हयातील प्रमुख धरणातील पाणीसाठा व श्री संत ज्ञानेश्वर माऊली व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळयाकरिता पिण्याच्या पाण्याच्या करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती यावेळी पालकमंत्री बापट यांनी पत्रकारांना दिली. पालखी सोहळयादरम्यान वारकऱ्यांची सोय व्हावी याकरिता 29, 30 जून व 1 जुलै या काळात एक दिवसाआडऐवजी दररोज पाणी पुरवठा करण्यात येणार आहे असे सांगून, यासाठी खडकवासला प्रणालीत पाणी उपलब्ध आहे असे त्यांनी सांगितले. देहू व आळंदी पालखी प्रस्थान सोहळयाकरिता आंध्र धरणातून 0.29 टीएमसी पाणी इंद्रायणी नदीत सोडण्यात आल्यामुळे मावळ व खेड तालुक्यातील नदीवरील पाणी योजना, 25 ग्रामपंचायती व 3 नगरपालिका यांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली असल्याचेही पालकमंत्रयांनी यावेळी सांगितले.
     पुण्यातील मुक्कामानंतर पालखी पुरंदर, बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस या तालुक्यातून मार्गक्रमण करते. तेथील मार्गावरील ग्रामपंचायत व नगरपालिकांना व वारकऱ्यांना पाण्याची सोय व्हावी याकरिता नीरा प्रणालीतून 2 जुलैपासून पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगून याकरिता लागणारे 1.5 टीएमसी पाणी नियोजन करताना राखीव ठेवण्यात आल्याचे ते म्हणाले.
     पुणे शहर पाणी पुरवठा प्रणालीत आज रोजी 1.54 टीएमसी एवढा जीवंत पाणीसाठा असून 31 जुलैपर्यत एक दिवसाआड पाणी पुरवठयासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहर पाणी पुरवठा प्रणालीत पवना प्रकल्पात आजरोजी 0.96 टीएमसी जीवंत पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. या पार्श्वभूमीवर वाढीव पाणी कपातीची आवश्यकता नाही अशीही माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
जिल्हयातील प्रमुख धरणातील पाणीसाठयाची सध्यस्थिती पुढीलप्रमाणे
     खडकवासला प्रणाली 1.54 टीएमसी ( 5.29 टक्के), पवना प्रकल्प 0.96 (11.24 टक्के), चासकमान प्रकल्प 0.47  (6.25 टक्के), भामा आसखेड 1.43  (18.63 टकके), आंध्र प्रकल्प 1.09 टीएमसी (37.21 टकके), वडीवळे प्रकल्प 0.21 टीएमसी (19.87 टक्के), कुकडी प्रकल्प 0.13 टीएमसी (0.37 टक्के) आणि नीरा प्रणाली 2.16 टीएमसी (4.76 टक्के)

000

Post a Comment

 
Top