Add

Add

0

राज्यातील प्रत्येक खासदारापासून कार्यकर्त्यांपर्यंत केंद्राच्या योजना सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचवण्याची गरज असून; पक्षात येणा-या प्रत्येकाला सामावून घ्या.

पुणे(प्रतिनिधी):-राज्यातील प्रत्येक खासदारापासून कार्यकर्त्यांपर्यंत केंद्राच्या योजना सर्वसामान्य नागरिका पर्यंत पोहोचवण्याची गरज असून; पक्षात येणा-या प्रत्येकाला सामावून घ्या. तसेच भाजप महाराष्ट्रव्यापी झाला पाहिजे, अशा शब्दांत केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
भाजपाच्या वतीने आयोजित प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप केंद्रीय वाहतूक दळवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणाने झाला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री हंसराज आहिर, केंद्रीय पर्यावरण वनमंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि पुणे शहर भाजप अध्यक्ष योगेश गोगावले आदी उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले की, राज्यात आणि केंद्रात सरकारचे चांगले काम चालले आहे. कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे सत्तेच्या शिखरावर जाण्याची संधी मिळाली आहे. मागील काही वर्षात पक्षाला मोठय़ा कठीण परिस्थितीत सामना करावा लागला. हे पक्षातील कोणत्याही कार्यकर्त्यांने विसरता कामा नये. या पुढील काळातदेखील पक्षासमोर अनेक आवाहने असणार आहे. या कोणत्याही आवाहनाला कार्यकर्त्यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. त्याला सामोरे जाऊन लढा, असा सल्लादेखील त्यांनी दिला.
केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री सिंचन योजना राबवण्यात येणार असून; या माध्यमातू
न दोन लाख हेक्टर शेती पाण्याखाली याद्वारे येणार आहे. भविष्यात सरकारच्या माध्यमातून रोजगार निर्माण करणे आणि देश भ्रष्टाचारमुक्त करणे, हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. तसेच राज्यातील आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता; प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून, संवाद साधून बूथ संघटन वाढवण्याची गरज आहे. तसेच त्यांनी राज्यातील आणि केंद्राच्या राजकीय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला.
सिंचन क्षमता वाढवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, अशी सूचना गडकरी यांनी केली. किमान ५० टक्के क्षमता झाली तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. केंद्र व राज्य सरकार यावर काम करत असून; ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच मंत्रीपद, सरकारी गाडी, पोलीस बंदोबस्त हे सगळे कसे फालतू आहे, हे गडकरी व्यासपीठावरील मंत्र्याकडे पाहून बोलत होते.
तर त्यांनी थेट ‘काय, बरोबर आहे ना’ असे थेट खडसे यांनाच विचारले. सत्ता नसली की सगळे व्यवस्थित असते, असे बोलताच सभागृहात हशा पिकला. त्याचबरोबर मंत्र्यांच्या स्वीय साहाय्यकाबाबत ते म्हणाले की, चहापेक्षा किटली गरम, असा हा प्रकार आहे.
आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या स्वीय साहाय्यकाचे प्रकरण सध्या गाजत असल्याने त्यांचा संदर्भ घेत लगेचच गडकरी यांनी मी महाराष्ट्रातील पीएबाबत बोलत नाही, असे स्पष्टीकरण दिले.
आगामी निवडणुकांना आत्मविश्वासाने सामोरे जा ! – मुख्यमंत्री
आगामी कालावधीत होणा-या राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना सर्वानी आत्मविश्वासाने आणि ताकदीने सामोरे जावे. या सर्व ठिकाणी भाजप विजयी होणार असल्याचा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला. त्याच बरोबर या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे बूथ संघटन आणि रचना करण्याची आवश्यकता आहे.

त्याच बरोबर बूथ संघटन किंवा त्याची रचना घरी बसून करता कामा नये. तसेच प्रत्येक जिल्हाध्यक्ष काही कामानिमित्त आठवडय़ातून किमान पाच दिवस मुंबईत असतात, असे होता कामा नये. त्यांनी आपल्या भागात काम करावे. जर यापुढे असे कोणी आढळल्यास त्याचा वेगळा विचार करावा लागेल, अशा शब्दांत त्यांनी जिल्हाध्यक्षांना सुनावले. तसेच येत्या सात दिवसांत जिल्हाध्यक्षांची बैठक घेतली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Post a Comment

 
Top