Add

Add

0
   पुणे (प्रतिनिधी):-प्रतिनिधी-खासगी मोबाईल कंपन्यांच्या स्पर्धेत रास्त दरात मोबाईल सेवा देणार्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ही कंपनी भारतीय बाजारपेठेत खालावलेला स्तर उंचावण्यासाठी सज्ज झाली आहे. बाजारपेठेतील स्थान अधिक बळकट करण्यासाठी कंपनीने देशाच्या ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले असून, आगामी दोन वर्षार्ंत राज्यातील सर्व ग्रामपंचायती वाय-फाय करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनुप श्रीवास्तव यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली. 
बीएसएनएलने हिताची आणि येस बँकेच्या सहकार्याने
एटीएमद्वारे ग्राहकांना चोवीस तास बिल भरण्याची सुविधा सुरू केली आहे. या सेवेच्या पहिल्या एटीएम मशिनचे उद्घाटन  श्रीवास्तव यांच्या हस्ते करण्यात आले. देशाच्या विविध भागात भविष्यात गरजेनुसार 300 ते 400 मशिन्स बसविण्यात येणार आहेत. सर्वाधिक उलाढाल असलेल्या बिल भरणा केंद्रांवर ही एटीएम मशिन लावण्यात येणार आहेत, असे श्रीवास्तव यांनी सांगितले.
ग्राहकांना अधिक स्पष्ट आवाज आणि वेगवान इंटरनेट सुविधा देण्यासाठी नेटवर्कचे जाळे अधिक बळकट करण्यावर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे. त्याचबरोबर बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक कंपनीने केली असून गेल्या दोन वर्षांत 24 हजार नवीन टॉवर उभारण्यात आले, वर्षभरात आणखी 21 हजार टॉवर उभारण्याचे नियोजन आहे.    
शेतकर्यांना हवामान, परदेशी बाजारपेठांची माहिती व्हावी, यासाठी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यांतील राज्य सरकारांच्या मदतीने बीएसएनएलने एक अॅप तयार केले आहे. महाराष्ट्रातही तसे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top