Add

Add

0
माले(प्रतिनिधी):- मुळशी धरण भागातील ढोकळवाडी (ता.मुळशी) येथे बगडे कुटूंबाने 'स्‍वीट कॉर्न' मक्‍याचा प्रयोग यशस्‍वी केला. उन्‍हाळयात पाण्‍याच्‍या उपलब्‍धतेचा योग्‍य वापर केल्‍याने पीक चांगले आले असून चांगले उत्‍पन्‍न मिळण्‍याची आशा आहे.
मुळशी धरण परिसरात मक्‍याचे पीक अपवादानेच दिसून येते. मात्र ढोकळवाडी येथील बाळु नथु बगडे, विठठल बगडे या बगडे कुटूंबीयांनी 'स्‍वीट कॉर्न' मक्‍याचे पीक यशस्‍वीरीत्‍या घेवून इतर शेतक-यांपुढे आदर्श ठेवला आहे. 
मुळशी धरणालगतची टाटा कंपनीची जमिन गेल्‍या तीन पिढयांपासून बगडे कुटूंबीय कसत आहे. पावसाळयात भात त्‍यानंतर गहु, काकडी आदी पीके ते घेत. धरणालगत जमीन असल्‍याने पाणी जवळच उपलब्‍ध आहे. पाईपलाईनद्वारे ते शेतासाठी उपलब्‍ध करून पाण्‍याचा योग्‍य उपयोग करतात. मागील दोन वर्षे कमी क्षेत्रावर त्‍यांनी 'स्‍वीट कॉर्नचा' लागवड करून सुरवात केली.
खर्च, उत्‍पादन, उत्‍पन्‍न याचा अंदाज घेतला. यावर्षी एप्रिल महिन्‍यात दोन एकर क्षेत्रावर त्‍यांनी 'स्‍वीटकॉर्न'ची पेरणी केली. धरणातून पाणी उचलुन पीकाला दिले. योग्‍य मशागत, पाणीयामुळे यंदा दोन टन मक्‍याचे उत्‍पादन अपेक्षीत आहे. मका काढणीला सुरवात झाली असून 'स्‍वीट कॉर्न' मार्केटला नेऊन विकण्‍यात येत आहे. स्‍थानिक कणीस विक्रेते शेतावर येऊन 'स्‍वीट कॉर्न' घेऊन जातात. यात वाहतुक, हमाली आदी वाचत असल्‍याने बाजारापेक्षा कमी दरानेविक्री करतात. तसेच यामुळे जनावरांना चाराही उपलब्‍ध झाला आहे. जास्‍तीच्‍या चा-याचीही विक्री करण्‍यात येत आहे. बियाणे, मशागत, पाणी यासाठी झालेला खर्च वगळुन सुमारे पन्‍नास हजार रुपये नफा मिळण्‍याचा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे.
याबाबत बाळु बगडे म्‍हणाले,'गेली दोन वर्षे अंदाज घेतला. यंदा दोन एकरावर 'स्‍वीटकॉर्न'चे लावले. पीक चांगले आले. सगळे खर्च वगळुन पन्‍नास हजार नफा अपेक्षीत आहे. कमी कालावधीत चांगले उत्‍पन्‍न मिळत आहे.'
मुळशी धरणातील पाण्‍याचा उपयोग... 
अनेक शेतक-यांच्‍या जमिनी मुळशी धरणाच्‍या पाण्‍याजवळ आहेत. परंतू पाईप लाईन, मोटार इ. द्वारे पाणी घेण्‍याचा खर्च सोसवत नाही. तसेच हा खर्च करूनही पीक चांगले येते की नाही ही धास्‍ती असते. परंतू बगडे कुटूंबीयांनी हा खर्च केला. धरणातून पाणी उचलून पीक घेतले. त्‍याचा फायदा त्‍यांना चांगले उत्‍पन्‍न मिळण्‍यात झाला. 

Post a Comment

 
Top