Add

Add

0
शशिकांत गणपत मिरकुटे ज्या संस्थेत कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करीत होते तेथेचकायम सेवक म्हणून संधी मिळून आज वैज्ञानिक सहायक या पदावर ते बढती होत होत पोचले आहेत.मुळशी तालुक्यातील संभवे या छोट्याशा गावातले शशिकांत मिरकुटे आता जेव्हा गावी जातात तेव्हा वडिलांचं स्वप्न पूर्ण केल्याचं समाधान त्यांना वाटत असतं. गावातल्या जेमतेम दोन एकर जमिनीच्या तुकड्यात भातशेती करणाऱ्या शशिकांतच्या वडिलांना आठ मुलांना नीट खायला घालण्याइतपतही उत्पन्न त्या जमिनीतून मिळत नसे.त्यामुळे उन्हाळ्यात शेतीचं फारसं काम नसताना ते मुंबईला आंबे विकायला जात. तेव्हा सातवी-आठवीत शिकत असलेला शशिकांतही सोबत असायचा. स्वतः उपाशी राहून शशिकांतला प्रेमानं वडापाव खायला घालणारे वडील त्याला आजही आठवतात.वडिलांना आनंद द्यायचा तर आपण शिकून मोठं व्हायला हवं, हे शशिकांतच्या मनानं ठरवलं. घरी सहा बहिणी, शिवाय एक भाऊ. शेतात सदा राबणारी आई. शिक्षणाची ओढ असलेल्या शशिकांतनं खूप शिकावं यासाठी घरी सर्वांचं प्रोत्साहन. खास करून बाबांचं. नेमकी परीक्षेच्या दिवसांतच लग्नसराई असल्यानं गावात तेव्हा ध्वनिक्षेपकांचा आवाज हैराण क
रायचा.शशिकांत मग वेळ मिळेल तेव्हा रानात जाऊन तासन्‌ तास अभ्यास करीत बसायचा. पूर्णपणे एकाग्रतेनं झपाटून केलेल्या अभ्यासाचं फलित म्हणजे दहावीला शशिकांत 63 टक्के गुण मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. अकरावीपासूनचा अभ्यासक्रम त्यानं बहिःस्थ पद्धतीनंच पूर्ण केला. मिळेल ते काम करून पैसे मिळवायचे. स्वतःचा शहरातला खर्च स्वतःच करायचा हा हेतू. यासाठी किराणा दुकानात नोकर, टूथपेस्टच्या होलसेलच्या दुकानातील माल किरकोळविक्रेत्यांपर्यंत पोचवणारा, "आयुका‘ या पुणे विद्यापीठ परिसरातील जागतिक पातळीवरील संस्थेतकंत्राटी सफाई कामगार वगैरे काम करीत शशिकांतनंमराठी विषयात बी.ए. केलं. दरम्यान "आयुका‘त सेवक म्हणून जागा निघाल्या तेव्हा त्याला संधी मिळाली. बढती होत आधी झेरॉक्स ऑपरेटर आणि नंतर तो प्रशासकीय सहायक झाला. नंतरच्या बढतीमुळे तो वैज्ञानिक सहायक पदावर आला. आणखी वर्षभरानं बढती होऊन शशिकांत अधिकारी या पदावर दिसण्याची शक्यता मित्रमंडळी बोलून दाखवतात.ग्रंथालयात काम करीत असताना जयकर ग्रंथालयातील पानगेसरांच्या मार्गदर्शनामुळे शशिकांतनं महाराष्ट्र शासन संचलित ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी ग्रंथालय व माहितीशास्त्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमही पूर्ण केला. राष्ट्रीय पातळीवरील "विद्यापीठ अनुदान आयोगा‘कडून घेतली जाणारी सहायक प्राध्यापक पात्रता परीक्षाही दिली. त्यातही यश मिळवलं. आयुकात ज्येष्ठ वैज्ञानिक जयंत नारळीकरांना वेळेत संदर्भ साहित्य उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांनी केलेलं कौतुक ही शशिकांतसाठी मोठीच प्रेरणा ठरली. "तत्पर सेवा‘ हा छंदच जडला. आयुकातल्या सर्व वैज्ञानिक प्राध्यापक, अध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांसाठी तत्पर सेवा देणं हे शशिकांत यांना हवंहवंसं वाटतं.

Post a Comment

 
Top