Add

Add

0

पुणे(प्रतिनिधी):- नेपाळमधील गरीब व गरजू भूकंपग्रस्तांच्या पुनवर्सनासाठी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे या संस्थेच्या वतीने 120 भूकंपरोधक घरांच्या उभारणीबद्दल नेपाळ सरकार, तारकेश्‍वर महापालिका आणि नेपाळवासीयांच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांचा विशेष ताम्रपट देऊन सन्मान करण्यात आला.

भूकंपरोधक घर निर्माण समितीच्या पुढाकारातून हा सन्मान करण्यात आला असून, यामध्ये प्रा. डॉ. कराड यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. 2015 च्या महाप्रलयंकारी भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या नेपाळवासीयांना मायेचा आधार देण्याचे कार्य प्रा. डॉ. कराड यांनी केले आहे. या भूकंपपीडितांसाठी ते एक विश्‍वशांतीचे देवदूत बनून आल्याचे या मानपत्रात म्हटले आहे. समितीचे अध्यक्ष नबिन पुतुवार, सचिव मिरा (काकी) महर्जन आणि संयोजक बाबुराव (कमल) लामा यांनी हे मानपत्र प्रदान केले आहे.

‘वसुधैव कुटुंबकम’ या उक्तीप्रमाणे मित्रराष्ट्राच्या मदतीस धावून आलेल्या भारतीयांचे आणि प्रा. डॉ. कराड यांचे नेपाळवासीयांनी आभार मानले आहेत. तसेच त्यांचे हे योगदान अतुलनीय असल्याचा उल्लेख करीत भविष्यातील प्रगतीसाठी या मानपत्रात सुयश चिंतिले आहे.

विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे तारकेश्‍वर महापालिका हद्दीत  संतश्री  ज्ञानेश्‍वर विश्‍वशांतीनगर संत श्री  तुकाराम विश्‍वशांतीनगर, आणि भगवान गौतमबुद्ध विश्‍वशांतीनगर अशी तीन नगरे वसविण्यात आली असून, तेथे 120 घरे उभारली आहेत. गेल्या महिन्यात 21 मे 2016 रोजी नेपाळमध्ये या घरांचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण झाले. नेपाळचे माजी परराष्ट्रमंत्री उपेंद्र यांच्यासह नेपाळमधील अनेक मान्यवर उपस्थित होते. एमआयटीच्या वतीने प्रा. डॉ. कराड यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी आणि भजनी मंडळ सहभागी झाले होते.

Post a Comment

 
Top