Add

Add

0


माले(प्रतिनिधी):- पुणे-कोलाड रस्‍त्‍यावर अपघातांचे प्रमाण वाढते आहे. पावसाळयात त्‍यांचे प्रमाण आणखी वाढण्‍याची शक्‍यता असल्‍याने, अपघातांचे प्रमाण कमी करण्‍यासाठी ठिकठिकाणी रेडीयम युक्‍त सुचना फलक बसविण्‍याची, रस्‍त्‍यावर पटटे रंगविण्‍याची मागणी होत आहे.
प्रमुख राज्‍य मार्ग पुणे-कोलाड रस्‍त्‍यावर माले ते आदरवाडी दरम्‍यान गेल्‍या काही महिन्‍यांतअपघातांचे प्रमाण वाढले आहे. चांगला व मोकळा रस्‍ता असल्‍याने अनेकदा वाहनचालक वाहन वेगाने चालवित असतात. बरेच अपघात हे रात्रीच्‍या वेळी झालेले आहेत. त्‍यात अनेक युवकांचा बळी गेला आहे.
मुळशी जलाशयाच्‍या कडेने जाणा-या या रस्‍त्‍यावर मोठया प्रमाणात तीव्र वळणे आहेत. अनेक ठिकाणी रस्‍त्‍यावर वळण, घाटरस्‍ता, वेग मर्यादा, अपघाती ठिकाण आदींची सुचना देणारे फलक झाडे, झुडपे यामुळे झाकले गेले आहेत. तर काही ठिकाणी त्‍यावर माती साचली असल्‍याने ते पटकन दिसून येत नाहीत. काही ठिकाणी त्‍यावर खाजगी फलक लावले आहेत.

माले घाटात मोठया प्रमाणात जडवाहनांचे अपघात होत आहेत. त्‍यातील अनेक अपघात रात्रीच्‍या वेळी झाले. येथील घाटातील मध्‍यावर अपघाती ठिकाणी तीव्र वळणाची सुचना देणारा फलक मातीने मळला आहे. तसेच तो वाकला आहे. येथील अपघातांचे प्रमाण पाहता. अपघात टाळण्‍यासाठी रेडीअम युक्‍त फलक मोठया संख्‍येने लावण्‍याची गरज आहे. 
सारोळे येथील मंदिराजवळच्‍या वळणावर रस्‍त्‍याच्‍या कडेच्‍या डोंगरातून मोठया प्रमाणात मुरूम काढण्‍यात आला. त्‍यामुळे येथे रस्‍त्‍याच्‍या कडेने मोठया प्रमाणात जागा मोकळी व सरळ झाली. येथे रस्‍ता सरळ असावा असा वाहनचालकांचा रात्री भ्रम होतो. प्रत्‍यक्षात तेथे वळण आहे. 
ताम्हिणीजवळील ओढयात पडून अपघातांत युवकांचे बळी गेल्‍यानंतर तेथे रेडीअमयुक्‍त फलक बसविण्‍यात आले. त्‍यानंतर तेथे अद्याप अपघात झाले नाहीत. हा या फलकांचा फायदा म्‍हणावा लागेल. 
याबाबत जिल्‍हा परिषद सदस्‍या शिल्‍पा ठोंबरे म्‍हणाल्‍या,''दिवसा तसेच रात्रीच्‍या वेळी होणारे अपघात टाळण्‍यासाठी रेडीयम युक्‍त फलकांची संख्‍या वाढविण्‍याची गरज आहे. दिवसा सुर्यप्रकाशात रस्‍ता दिसून येतो. रात्री मात्र या रेडीयम युक्‍त फलकांचा आधार असतो. तसेच रस्‍त्‍याचा मध्‍य, दोन्‍ही बाजु दाखविणारे ठिकठिकाणी रंगविले पाहिजेत. काही ठिकाणी असले तरी त्‍यांची संख्‍या मोठया प्रमाणात वाढवणे गरजेचे आहे.''

Post a Comment

 
Top