Add

Add

0
 संगमनेर येथे घडलेल्या प्रकाराबद्दल खा.अ‍ॅड.वंदना चव्हाण यांचा पत्रकाद्वारे निषेध

पुणे (प्रतिनिधी):-क्रौमार्य चाचणी घेऊन एका युवतीच्या आयुष्याचा खेळ करण्याचा संगमनेर तालुक्यातील प्रयत्न सजग कार्यकर्त्यांनी उधळून लावला, या बद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. परंतु, हा प्रश्‍न इथेच संपत नाही, तर खर्‍या अर्थाने सुरू होतो. स्त्री- पुरुष समानतेसाठी गेली अनेक दशके लढा सुरू आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यापासून अनेक समाजसुधारकांनी, लोकप्रतिनिधींनी त्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. तरीही हा लढा अजूनही संपलेला नाही. निर्भयावरील बलात्कार असो अथवा क्रौमार्य चाचणीचा प्रकार, या घटनांमुळे समाजातील वास्तव समोर येते आणि शाश्‍वत विकासाच्या उद्दिष्टांमध्येही केवळ महिला नव्हे तर, युवतींसाठीही ठोस कार्य करण्याची गरज अधोरेखित होते. याबाबत संगमनेर येथे घडलेल्या या प्रकाराबद्दल पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी पत्रकाद्वारे निषेध व्यक्त केला आहे.

पोलिस कर्मचारी झालेल्या युवतीला क्रौमार्य चाचणीची अघोरी परीक्षा द्यावी लागते, या घटनेबद्दल आंदोलनाचा एल्गार झाला पाहिजे. कारण संबंधित युवती समाजात आत्मविश्‍वासाने उभी राहण्यासाठी संघर्ष करीत असताना, बुरसटलेली मानसिकता तिचे पाय खेचत आहे. समाज, त्यांच्या प्रथा, रुढी, परंपरा या बद्दल आदर ठेवून महिला, युवती आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी समाजात मानसिकता निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने प्रयत्न करीत असून या पुढील काळातही ते अधिक जोमाने करण्यात येतील. त्यासाठी आता समाजातील महिला, युवतींनीही या लढ्यात सामील होण्याची गरज आहे.

Post a Comment

 
Top