Add

Add

0
 पुणेकरांनी लुटली सांस्कृतिक मेजवानी, तरूणाईचा उत्स्फुर्त प्रतिसाद ...
पुणे (प्रतिनिधी) - जादुचे प्रयोग, महिलांसाठी लावणी शो, आयपीएस अधिकारी विश्‍वास नांगरे पाटील यांची प्रकट मुलाखत, ज्येष्ठ साहित्यिक विश्‍वास पाटील यांच्याशी मुक्त संवाद, कॉमेडी एक्‍सप्रेस पुणे फास्ट आणि ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या दिलखुलास मुलाखतीने बालगंधर्व रंगमंदिराचा 49 वा वर्धापन अविस्मरणीय ठरला. 
बालगंधर्व परिवाराच्या वतीने दरवर्षी बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. वर्धापन दिनाचे अवचित्य साधून विविध कला क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले. तसेच या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार श्री. राघवेंद्र (आण्णा) कडकोळ यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्रदान करताना व्यासपिठावर माजी खासदार रणजित सिंह मोहिते पाटील, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, अभिनेता सुशांत शेलार, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. चे अतुल शहा, सुरेश देशमुख, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, उल्हासदादा पवार  व इतर मान्यवर उपस्थित होते. 
पुरस्कार वितरण समारंभाच्या आधी नांदी व नाट्यसंगीत, तसेच तबला, पखवाज, सरोद यांची जुगलबंदी व  बालगंधर्वांचे शिल्प साकारण्यात आले. त्यावेळी व्यासपिठावर महापौर प्रशांत जगताप व मेघराज राजेभोसले उपस्थित होते. पुरस्कार वितरण समारंभानंतर 
"रंग एकपात्रीचे" हा एकपात्री कलाकारांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यानंतर पुण्यातील कलाकारांनी कॉमेडी एक्‍सप्रेस पुणे फास्ट नावाचा कॉमेडी शो सादर केला. अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि राहुल रानडे यांच्या रंगलेल्या दिलखुलास गप्पांमध्ये सिने - नाटयसृष्टीच्या समस्या, आव्हाने यावर देखील चर्चा करण्यात आली. यावेळी मेधा मांजरेकर देखील आवर्जून उपस्थित होत्या. सायंकाळी प्रा. नितीन बालगुडे पाटील यांचे व्याख्यान झाले आणि रात्री संगीत रजनी (हिंदी गाण्यांचा) हा कार्यक्रम संपन्न झाला. 
दुसऱ्या दिवसाच्या (26 जुन) कार्यक्रमाची सुरुवात जादूच्या प्रयोगापासुन झाली, त्यानंतर रफी 80 हा गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. बालगंधर्व परिवार दरवर्षी महिलांसाठी लावणी महोत्सवाचे खास आयोजन करतो, या वर्षी हा कार्यक्रम हाऊसफुल होता. या कार्यक्रमात अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी स्वतः लावणी गायली त्याला रसिकांनी उत्स्फुर्त प्रति साद दिला. उसगांवकर यांनी महिलांसोबत लावणीचा ठेकाही धरला. 
दुपारच्या सत्रात आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची प्रकट मुलखत राजेश दामले यांनी घेतली या मुलाखतीसाठी तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. विश्वास नांगरे पाटील यांचा सोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. "ध्येय गाढण्यासाठी मेहनत,चिकाटी, आत्मविश्वास असायला हवा" हा कानमंत्र नांगरे पाटील यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला. या नंतर पानिपतकार विश्वास पाटील यांच्याशी राज काझी यांनी"मुक्त संवाद"साधला. वर्धापनदिनाची सांगता "महाराष्ट्राची लोकधारा" या कार्यक्रमाने झाली. 
या दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक चंदुकाका सराफ अँड सन्स होते. या सर्व कार्यक्रमाच्या वेळी बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजभोसले , उपाध्यक्ष नितीन मोरे व वरुणकुमार कांबळे , सचिव संदीप पळीवाले, सहसचिव विनोद धोकटे व धनंजय गायकवाड, खजिनदार कौस्तुभ कुलकर्णी, व इतर पदाधिकारी व मान्यवर आवर्जुन उपस्थित होते. 

Post a Comment

 
Top