Add

Add

0

नवी दिल्ली (प्रतिनिधी):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार जुलैच्या पहिल्या आठवडय़ात होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे. केंद्रीय मंत्री उद्या गुरूवारी नरेंद्र मोदी यांच्यापुढे परफॉर्मन्स अहवाल सादर करणार आहेत. यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार केला जाऊ शकतो असे सूत्रांचे म्हणणे आहे.

उत्तर प्रदेशातील खासदारांची शाळा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या, गुरूवारी केंद्रीय मंत्र्यांची शाळा घेणार आहेत. सरकारच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी मोदी यांनी खासदारांवर सोपविली होती. हे कार्य कुणी-कुणी नीटपणे पार पाडले याची माहिती मोदी यांनी नुकतीच खासदारांकडून घेतली होती. आता उद्या केंद्रीय मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. परफॉर्मन्सच्या आधारावर कुणाला डच्चू द्यायचा आणि कुणाला मंत्रिमंडळात सामील करायचे हा निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्राने सांगितले.
यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार जुलैच्या पहिल्या आठवडय़ात होण्याची शक्यता आहे. वादग्रस्त विधाने करून सरकार आणि पक्षाला अडचणीत आणणारे गिरीराज सिंग, निहालचंद आणि साध्वी निरंजन ज्योती यांना डच्चू दिला जाणार असल्याचे समजते तर, राजस्थानचे नेते ओम माथूर आणि अर्जुन मेघवाल यांना लाल दिव्याची गाडी मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून विनय सहस्रबुध्दे आणि दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे. यूपीची निवडणूक लक्षात घेता मनोज सिन्हा आणि संजीव बालियान यांना पदोन्नती दिली जावू शकते. ऊर्जा मंत्रालयाचा स्वतंत्रपणे गाडा हाकरणारे पियूष गोयल यांनाही पक्ष प्रमोट करू शकतो.

क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल हे आसामचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे त्यांची जागा खाली आहे. दरम्यान, काही विभागांचे काम समाधानकारक नसल्याने मोदी खांदेपालट करू शकतात, अशीही चर्चा आहे. अरुण जेटली, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज आणि नितीन गडकरी यांचे विभाग कायम ठेवले जाणार आहेत. अलाहाबादचे खासदार श्याम चरण गुप्ता आणि आसामचे रमेन डेका यांचीही नावे चर्चेत आहेत.

Post a Comment

 
Top