Add

Add

0
पुणे(प्रतिनिधी):- माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग), पुणेतर्फे पहिल्या नॅशनल टीचर्स काँग्रेस या परिषदेचे दि. 23 ते 25 सप्टेंबर 2016 या दरम्यान एमआयटी, कोथरुड येथे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन दि. 23 सप्टेंबर 2016 रोजी, तर या परिषदेचा समारोप दि. 25 सप्टेंबर 2016 रोजी होणार आहे. ‘शिक्षकांना प्रेरित करुन सक्षम पिढी घडविणे’ हा या परिषदेच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.
महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटिज (एआययु), भारतीय छात्र संसद फाउंडेशन, महाराष्ट्र स्टेट प्रिन्सिपल्स फेडरेशन व विश्‍वशांती केंद्र (आळंदी), पुणेचे युनेस्को अध्यासन, हॉर्वर्ड बिझनेस स्कूल क्लब ऑफ इंडिया या संस्थांच्या सहकार्यातून ही पहिल्यांदाच अशी राष्ट्रीय परिषद होत आहे. 
माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून या परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या परिषदेचे मुख्य प्रवर्तक आहेत. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून प्रा. राहुल कराड यांनी आतापर्यंत अनेक युवकांना लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी प्रोत्साहित केले आहे.
या परिषदेचा उद्घाटन समारंभ दि. 23 सप्टेंबर 2016 रोजी दुपारी 12.15 वाजता होणार आहे. या समारंभासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप, अणुशास्त्रज्ञ आणि नॅशनल टीचर्स काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, तेलंगणा राज्याचे माहिती व तंत्रज्ञानमंत्री के. टी. रामा राव, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेचा समारोप समारंभ दि. 25 सप्टेंबर 2016 रोजी दुपारी 12.30 वाजता होणार आहे. राज्याचे उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, संगणकशास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, निर्माता सिद्धार्थ बसू, उद्योजक मिलिंद कांबळे, अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. आशिष नंदा, माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे आदी उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन व समारोप यासह विविध विषयांवरील चर्चेसाठी सात सत्रे ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये पहिले सत्र ‘भारतीय शिक्षण पद्धतीचा इतिहास, सद्यस्थिती आणि भवितव्य’ या विषयावर होणार असून, यामध्ये ज्येष्ठ नेत्रचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने, माजी सनदी अधिकारी डॉ. अविनाश धर्माधिकारी, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. व्ही. एस. सपकाळ, गुजरातचे उच्च शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंग चुडासमा, मध्यप्रदेशचे उच्च शिक्षणमंत्री जयभान सिंह पवैया सहभागी होणार आहेत. योगगुरु स्वामी रामदेवबाबा व्हिडिओ कॉन्फरन्सिं गद्वारे मार्गदर्शन करतील.
दुसरे सत्र ‘सध्याच्या शिक्षण पद्धतीत भारतीय मूल्यांचा समावेश आहे का?’ या विषयावर होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, तालयोगी पंडित सुरेश तळवळकर, मध्यप्रदेशचे उच्च शिक्षणमंत्री जयभानसिंग पवैया, कोलकाता विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आशुतोष घोष आदी सहभागी होणार आहेत.
‘कॉर्पोरेटसाठी सीएसआर तसे शिक्षणासाठी टीएसआर’ या विषयावरील तिसर्‍या सत्रात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, कर्नाटकचे शिक्षणमंत्री बसवराज रायारेड्डी, फोर्ब्स मार्शलचे सहअध्यक्ष डॉ. नौशाद फोर्ब्स, राज्यसभा खासदार डॉ. नरेंद्र जाधव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे मार्गदर्शन करणार आहेत.
चौथे सत्र ‘आपण शिकवितो; ते शिकतात का?’ या विषयावर होणार आहे. पश्‍चिम बंगालचे उच्च शिक्षणमंत्री पार्था चटर्जी, ज्येष्ठ विचारवंत मौलाना सय्यद कल्बे रिझवी, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर, गोवा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वरुण साहनी हे या सत्रात विचार मांडणार आहेत. आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.
पाचवे सत्र ‘शिक्षणस्तर सुधारण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडतेय का?’ या विषयावर होणार आहे. यामध्ये आंध्रप्रदेशचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री गंता श्रीनिवासा राव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे केंद्र सचिव निलोत्पाल बसू, माजी सनदी अधिकारी डॉ. जयप्रकाश नारायण, चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा, महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोद्याचे कुलगुरु डॉ. परिमल व्यास मार्गदर्शन करणार आहेत.
सहावे सत्र ‘शिक्षक : मार्गदर्शक, प्रेरक, प्रोत्साहक आपण अवलोकन करतो का?’ या विषयावर होणार आहे. पुदुच्चेरीचे शिक्षणमंत्री आर. कमलकन्नन, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, उद्योजक रामजी राघवन, जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. तलत अहमद हे या सत्रात मार्गदर्शन करणार आहेत.
सातवे सत्र ‘शिक्षणावरील खर्च अल्प नाही का?’ या विषयावर होणार आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, तेलंगणाचे उच्च शिक्षणमंत्री कडियाम श्रीहरी, कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर, मुंबई येथील एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. शशिकला वंजारी या सत्रात विचार मांडणार आहेत. 
या सात विषयांवरील सत्रांसह ‘टीचर टू टीचर कनेक्ट’ ही दोन विशेष सत्रेही आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये शिक्षकांना आपल्या विचारांचे आदान-प्रदान करता येणार आहे.
आपल्या देशाला अनेक चांगल्या शिक्षकांची परंपरा आहे, ज्यांनी आपल्या शिकविण्यातून प्रेम आणि आदर मिळविला. ध्येय, आदर्शवाद आणि निस्वार्थी सेवा हेच त्यांची ओळख आहे. त्यातील अनेकांनी केवळ ज्ञान दिले नाही, तर मूल्ये आणि आदर्शाच्या सहाय्याने समाजाला एक दिशा दिली. अशाच राष्ट्रउभारणीच्या भावनेने भारलेल्या आणि केवळ शिक्षक म्हणून नाही, तर उत्तम संशोधक, संवेदनशील, समाजाभिमुख, प्रगतीशील, दिशादर्शक, प्रेरणादायी आणि तत्त्वनिष्ठ शिक्षकांची फळी निर्माण करण्याचे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.
या राष्ट्रीय परिषदेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, चेअरमनपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, कार्याध्यक्षपदी प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, कार्यकारी चेअरमनपदी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, सदस्यपदी मिलिंद कांबळे हे आहेत. माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड हे या परिषदेचे मुख्य समन्वयक आहेत.

अशी माहिती महाराष्ट्र स्टेट प्रिन्सिपल्स फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. नंदकुमार निकम, मिटसॉम कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. एम. चिटणीस, एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर, एमआयटी स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. सायली गणकर व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या सहयोगी संचालिका प्रा. एस. हरिदास यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Post a Comment

 
Top