Add

Add

0
50 टक्केपेक्षा अधिक लोकसंख्येला चक्राकार पद्धत गट-गणांची फेर रचना
 पुणे (प्रतिनिधी ):-जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट-गणांची प्रारूप रचना अंतिम करण्याचे काम सध्या प्रशासनाच्या पातळीवर जोमाने सुरू आहे. प्रारूप रचना जाहीर झाल्यानंतर, आरक्षण टाकण्यात येणार आहे. यामध्ये हवेली आणि शिरूर तालुक्यात नव्याने निर्माण झालेल्या गटांचे आरक्षणदेखील नव्याने टाकण्यात येणार आहे, तर लोकसंख्येच्या निकषामुळे अनेक गट-गणांच्या नावांमध्येदेखील फेरबदल झाला असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट-गणांची फेररचना व आरक्षणाचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यामध्ये या निवडणुकीसाठी सन 2011ची जनगणना गृहीत धरण्यात येणार असल्याने गट-गणांच्या रचनेत मोठय़ा प्रमाणात बदल झाले आहेत. यात पुणे जिल्ह्यात एकूण 75 गट कायम राहणार असले, तरी लोकसंख्या वाढीमुळे हवेली, शिरूर तालुक्यात गटांच्या संख्येत वाढ झाली आहे, तर लोकसंख्येमध्ये घट झाल्याने जुन्नर, दौंड,भोर आणि बारामती तालुक्यातील प्रत्येकी एका गटाची संख्या कमी झाली आहे. यानुसार जिल्हा प्रशासनाने नुकतीच गट-गणांची फेररचना केली असून, यामध्ये मोठय़ा प्रमाणात बदल झाले आहेत. 
जिल्हा परिषदेच्या गट-गणांच्या आरक्षणाबाबत राज्य निवडणूक आयोगाने चक्राकार पद्धतीने आरक्षण टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, नव्याने निर्माण झालेल्या गटावर पूर्वीच आरक्षण गृहीत धरून आरक्षण कसे टाकणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.  
 गट 75 कायम राहणार असले, तरी हवेली, शिरूर तालुक्यात गटांच्या संख्येत वाढ झाली जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सन 2011ची जनगणना गृहीत धरण्यात येणार असल्याने गट-गणांच्या रचनेत मोठय़ा प्रमाणात बदल झाले आहेत. यामध्ये नव्याने निर्माण होणार्‍या गट-गणांमध्ये पूर्वीच्या गटातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या असेल,तरच चक्राकार पद्धतीने आरक्षण टाकण्यात येणार आहे. परंतु, नव्याने निर्माण झालेल्या बहुतेक सर्व गटांमध्ये जुन्या गटातील संख्या खूपच कमी आहे. यामुळे या गटांवर नव्याने आरक्षण टाकण्यात येणार आहे.
 ■ गट-गणाचे नाव निश्‍चित करताना, त्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गावाचे नाव त्या गट-गणाला दिले जाते. सन 2011 च्या जनगणनेमध्ये काही गावांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली, तर काहीची संख्या कमी झाली. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या गट-गणांच्या नावांमध्येदेखील फेररचनेत मोठय़ा प्रमाणात बदल झाले आहेत.

Post a Comment

 
Top