Add

Add

0
रामजी राघवन यांचे मत; नॅशनल टीचर्स कॉंग्रेसमध्ये मार्गदर्शन

पुणे(प्रतिनिधी ):- "तुम्ही तुमच्या कामाबद्दल कसा दृष्टिकोन ठेवता, ते महत्त्वाचे ठरते. कारण त्याचाच  तुमच्या कामावर परिणाम होत असतो", असे प्रतिपादन अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशनचे चेअरमन रामजी राघवन यांनी केले.
माईर्स एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग), पुणेतर्फे आयोजित पहिल्या नॅशनल टिचर्स काँग्रेसमध्ये 'कॉर्पोरेटसाठी सीएसआर : शिक्षणासाठी टीएसआर' या विषयावर ते बोलत होते. यावेळी माईर्स एमआयटीचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल वि. कराड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू एस. एन. पठाण, प्रा. नंदकुमार निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
रामजी राघवन म्हणाले, ''आपली शिक्षण व्यवस्था ही सर्वात चांगले उत्तर शोधणे  यावर आधारित आहे  आणि त्यासाठी चांगले प्रश्न विचारणे महत्त्वाचे असते. कारण सामान्य प्रश्नांपेक्षा वेगळे प्रश्न विचारणारेच  व्यक्ती थोर होतात. तसेच एक शिक्षक म्हणून फक्त ज्ञानाचा प्रसार करणे हे कार्य आहे कि त्याही पेक्षा जास्त महत्वाचं कार्य आपण करू शकतो हा विचार शिक्षकांनी  करणे गरजेचं आहे", असेही रामजी राघवन म्हणाले.
शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले, "शिक्षकांचा  वैयक्तिक दृष्टिकोन विद्यार्थ्याच्या माध्यमातून सर्व देशावर प्रभाव पाडत असतो. पारंपरिक शिक्षणपद्धती  सोडून आधुनिक, सक्रिय आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धती स्वीकारण्याची वेळ आली आहे".
डॉ. वासुदेव गाडे म्हणाले, "कोणता क्रमांक ते जास्त महत्त्वाचं ठरत नाही तर गुणवत्तापूर्ण शिक्षण जास्त महत्वाचे आहे. संशोधन आणि ज्ञानार्जन हे एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत. तसे करण्याचा प्रयत्न केल्यास  शिक्षण पद्धतीची विनाशाकडे वाटचाल होईल. त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षकांनी संशोधनात प्राविण्य मिळवण्याचा प्रयत्न करावा. पैशांबरोबरच आंतरिक समाधान आणि स्वतःहून समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असणे महत्त्वाचे ठरते."
ऍमस्टरडॅम विद्यापीठाच्या प्राध्यापिका जोक्स बंडर्स यांनीही यावेळी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, "भारतीय संस्कृतीतील मूल्ये आणि पारंपरिक गुरुकुल शिक्षणपद्धती हे भारतीय शिक्षणाचे आधारस्तंभ आहेत आणि त्याच्याच बळावर भारत महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे." यावेळी डॉ. गाडे आणि प्रा. राघवन यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. नीलम शर्मा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

                                                                               

Post a Comment

 
Top