Add

Add

0
मराठा समाजाने कोपर्डी बलात्कार प्रकरण एक निमित्त शोधून अत्यंत उत्स्फूर्तपणे औरंगाबाद,उस्मानाबाद, जळगाव, बीड, परभणी इत्यादी शहरांत लाखोंचे मोर्चे काढले, तर अनेक ठिकाणी ही मालिका सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात येते. या सर्व मोर्चांचे वैशिष्ट्य म्हणजे, सर्व मोर्चे उत्स्फूर्तपणे निघाले. ग्रामीण, डोंगरी, शहरी, श्रमकरी, शेतकरी, कष्टकरी, बुद्धिजीवी, नोकरदार, वकील, प्राध्यापक, राजकारणी असे सर्वच आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक स्तरांवरील तरुण-तरुणी, स्त्रिया, पुरुष यात सामील झाले. हे सर्व मूक मोर्चे होते, शिस्तबद्ध होते. कुठेही बेशिस्त नव्हती. मोर्चाचे नेतृत्व युवा पिढीतील व सार्वजनिक होते. प्रत्येक मोर्चेकरी नेतृत्व करीत होता. प्रसिद्धीची हाव नव्हती. मागण्यांचे फलक, भगवा झेंडा निषेधाची प्रतीके होती. कोणत्याही प्रस्थापित नेतृत्वाचे वर्चस्व वा पुढाकार नव्हता; पण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सर्वांनीच हे सामाजिक कर्तव्य पार पाडल्याचे दिसते. गेल्या 50-60वर्षांत मराठा राजकारण्यांसह अनेक मराठा समाजकारणांनी मराठा समाजाचा गैरवापरच केला. गृहीत धरून स्वार्थ साधला. सामान्य मराठा युवकांमध्ये क्षमता असतानाही त्यांना डावलले. नीच पातळीवरचे राजकीय स्वार्थ साधण्यासाठी मराठा युवकांचे डोके भडकावून समाजा-समाजांत विशेषत: मराठवाडा, खान्देश, विदर्भासारख्या परिसरात जातिद्वेष पेरला, पोसला, पसरवला व त्यातून दंगलीही घडवून आणल्या. मराठा विरुद्ध मुसलमान व मराठा विरुद्ध मागास समाज (विशेषत: बौद्ध) असे वातावरण निर्माण केले. मराठा सेवा संघाने गेल्या 25वर्षांत मराठा, मुसलमान, महार, मातंग, मेहतर, माळी, मारवाडी अशा सर्वच समाजांत बंधुभाव होण्यासाठी प्रबोधनासह कृती कार्यक्रम राबविले. त्यातून समाजा-समाजांत विश्‍वास निर्माण झाला आहे. परिणामी, अनेकांची दुकाने बंद होऊ लागली. एम फॉर्मुला मान्य झाला.
मराठी क्रांती मोर्चे हे मराठा समाजावर वर्षानुवर्षे झालेल्या सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, साहित्यिक, इतिहासलेखन, आर्थिक, कलाक्षेत्र, कथा, कादंबर्‍या, नाटके, आरक्षण, नकार, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांतील अन्यायाविरुद्धचा आक्रोश मूक मार्गाने प्रकट करण्यासाठी आयोजित केल्याचे माहितीवरून जाणवते. हे मोर्चे कोणत्याही समाजाविरोधात नसून, आत्मपरीक्षण करण्यासाठी आहेत.
अँट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी नसून, गैरवापर थांबविण्याच्या तसेच काही दुरुस्त्या व्हाव्यात. गैरवापराचे दोन प्रकार आहेत- 1) खोट्या तक्रारी व 2) मराठा प्रस्थापितांनीच मागास जातीतील व्यक्तींना हाताशी धरून खोट्या तक्रारी करणे. यामुळे मुळातच खर्‍या अन्याय-अत्याचाराचे प्रमाण अल्प वा नगण्य असते व त्याचाही आधार भावनिक, अज्ञान, राग, भांडणे असा असतो. कायद्यात यासाठी तडजोड, क्षमापन, क्षमायाचना अशी तरतूद असावी; तसेच तक्रार दाखल होताच अटक टाळून तक्रारीच्या खरेपणाची खातरजमा योग्य पातळीवर करून घ्यावी. हा कायदा सन 2015मध्ये नव्याने दुरुस्त होऊन भारत सरकारने मंजूर केला, त्या वेळी लोकसभा, राज्यसभा येथे एकही मराठा खासदाराने हरकत नोंदवली नाही वा दुरुस्ती सुचविलेली नाही. 18 फेब्रुवारी 2016 रोजी नवा कायदा अस्तित्वात आला आहे. 
मराठा आरक्षण हा सोशियो-इकॉनॉमिक विषय म्हणून मराठा सेवा संघाने 1991पासून पुढे आणला होता. त्यात मराठा समाजाचा सरसकट समावेश ओबीसीत करणे व सध्या लागू असलेल्या ओबीसी कोट्यातच मराठा समाज ठेवणे, ही मागणी आहे. तमिळनाडूसारख्या राज्यात 52टक्क्यांपर्यंत आरक्षण वाढविले गेले, त्याप्रमाणे हे आरक्षण वाढविता येईल. एक वेगळीच वर्गवारी करून मराठय़ांना आरक्षण देणे शासनाला शक्य आहे. त्यामुळे युवकांच्या मनात आरक्षणव्यवस्थेबाबतचे आरोप, अज्ञान, रोष दूर होऊन सामाजिक पातळीवर ते एकाच वर्गात येणे अपेक्षित आहे. यामुळे जातीचे कंगोरे गोल होतील, जाती निर्मूलन सोपे होईल.
आज मराठा आरक्षणासाठी आक्रोश करणारे सर्वपक्षीय नेतेच सन -2014पर्यंत मराठा आरक्षणविरोधी होते व आजही आहेतच. वरिष्ठ मराठा नेत्यांवर याबाबत सातत्याने आरोप होत असतात. ते साहजिकच असले, तरी त्यांनी सर्वसमावेशक प्रयत्न केले. जातीचा विचार न करता राज्याचा विचार केला, हे नाकारता येणार नाही.
मराठा आरक्षणाचा मुद्दा घटनेबाहेर हाताळण्याचा प्रकार झाला. पन्नास टक्क्यांची र्मयादा ओलांडून वेगळे १६ टक्के आरक्षण मिळण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपा-सेना वा कोणत्याही पक्षाच्या खासदारांनी केंद्राकडे लोकसभा-राज्यसभा येथे घटनादुरुस्तीचा आग्रह धरला नाही. मराठा समाजाची दिशाभूल होत आहे.या मार्गाने मराठा आरक्षण मिळणार की नाही? परंतु, मोर्चाचे स्वरूप पाहताच, नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. त्या मोर्चांचे बाप होण्यासाठी व मराठा समाजात पुन्हा फूट पाडण्यासाठी अनेक जण आतुर झाले आहेत.त्यामुळे सावधगिरी बाळगली पाहिजे.
या मोर्चाचे कुणी नेतृत्व करीत नाही.सगळीकडे मुली,महिला,तरुण व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत. यातून मूक मोर्चाच्या माध्यमातून संयमाचे दर्शन घडत आहे. शांतता व संयमाचा आदर्श, गौतम बुद्धांचे व गांधीजींचे तत्त्वज्ञान अंगीकारलेले दिसते. लढवय्या पराक्रम रक्तात असणारा, आक्रमक असणारा समाज संयम व शांततेच्या मार्गाने चालत आहे, हे कमी नाही. या सार्‍या शक्तीला सलाम.
                                                                                    विकास  पासलकर- प्रदेश उपाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड

Post a Comment

 
Top