Add

Add

0

२०१६ वेल्स ट्रेड मिशन टू मुंबई या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई (प्रतिनिधी):- शेतीपूरक आणि कृषी माल प्रक्रिया व्यवसायांची राज्यात गुंतवणूक व्हावी आणि त्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा ही राज्य शासनाची भूमिका आहे. राज्यात परकीय गुंतवणूकदारांना गुंतवणूक करायची असल्यास त्यांनी शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. त्यासाठी शासनाकडून सहकार्य मिळेल, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांनी केले.

इंग्लंडमधील वेल्स प्रांतातील नऊ कंपन्यांचे प्रतिनिधी महाराष्ट्रात पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. या पार्श्वभूमीवर ‘वेल्स ट्रेड मिशन टू मुंबई’ या कार्यक्रमाचे आयोजन हॉटेल ताज लँडस एन्ड येथे करण्यात आले होते. त्यावेळी श्री. जानकर बोलत होते. यावेळी इंग्लंडचे मुंबई येथील उपउच्चायुक्त कॉलिन वेल्स, मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त मधुकर गायकवाड, दुग्धव्यवसाय विकास विभागाचे आयुक्त रामचंद्र कुलकर्णी यांच्यासह वेल्स येथील नऊ कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच भारतीय कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जानकर म्हणाले, आजवर सहकारी क्षेत्राचा दूध उत्पादनात महत्वाचा वाटा राहिला आहे. मात्र गेल्या पंधरा वर्षांत खाजगी क्षेत्रातील कंपन्यांनीही दूध उत्पादन आणि दुग्धजन्य उत्पादनात लक्षणीय प्रगती केली आहे. राज्य सरकारही दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्नरत असून, कामधेनू दत्तक ग्राम योजना, आरकेव्हीवाय अशा अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. समाजातील दुर्बल घटकांसाठीही पदुम विभागाच्या अनेक योजना आहेत. २०२० पर्यंत ३ दशलक्ष टन प्रतिवर्ष दूध उत्पादनाचे देश पातळीवर लक्ष्य निश्चित केले असून हे उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी वेल्स येथील बायोनिया आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला.

Post a Comment

 
Top