Add

Add

0
देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन; पहिल्या नॅशनल टीचर्स काँग्रेसचे उद्घाटन
प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड व डॉ. शां. ब. मुजुमदार यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

पुणे(प्रतिनिधी):-“देशाच्या, समाजाच्या व व्यक्तीच्या घडणीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे.परंतु, शिक्ष णाच्या संधी सीमित राहिल्याने मोजक्या लोकांनाच त्याचा लाभ झाला. शिक्षणाची ही गंगा सर्वांसाठी खुली करून गुणवत्तापूर्ण शिक्षण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावे. त्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेऊन ज्ञान, तंत्रज्ञान व कौशल्यांच्या समन्वयातून प्रगल्भ विद्यार्थी घडवावा. असे विद्यार्थी घडले, तर 2020 नंतर भारत विश्‍वगुरु म्हणून जगाला मार्गदर्शन करु शकतो,” असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग),पुणेतर्फे आयोजित पहिल्या नॅशनल टीचर्स काँग्रेसचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटिज (एआययु), भारतीय छात्र संसद फाउंडेशन, महाराष्ट्र स्टेट प्रिन्सिपल्स फेडरेशन व विश्‍वशांती केंद्र (आळंदी), पुणेचे युनेस्को अध्यासन, हॉर्वर्ड बिझनेस स्कूल क्लब ऑफ इंडिया या संस्थांचे सहकार्य मिळाले आहे.
उद्घाटनप्रसंगी पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, अणुशास्त्रज्ञ आणि नॅशनल टीचर्स काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, नॅशनल टीचर्स काँग्रेस संकल्पक, मुख्य निमंत्रक व माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समुहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, एमआयटीचे संस्थापक विश्‍वस्त प्रा. प्रकाश जोशी, माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे विश्‍वस्त व कार्यकारी संचालक प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, डॉ. गणेश नटराजन,  महाराष्ट्र स्टेट प्रिन्सिपल्स फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. नंदकुमार निकम, सरचिटणीस डॉ. सुधाकरराव जाधवर, नॅशनल टीचर्स काँग्रेसचे सहनिमंत्रक (ग्रुप कॅप्टन) दीपक आपटे, मिटसॉम कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. एम. चिटणीस, एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल सिम्बायोसिस या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार आणि खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या उभारणीतील शिक्षणतज्ज्ञ व विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्यात विद्यापीठांची, महाविद्यालयांची संख्या वाढत आहे. अशावेळी नियंत्रण करणार्‍या संस्थांची संख्या कमी करुन महाविद्यालयांना स्वायत्ता द्यायला हवी. त्यातून महाविद्यालयांतून गुणवत्तेचा स्तर वाढेल व संशोधक वृत्ती जोपासली जाईल. मात्र, स्वायत्ता मिळाल्यानंतर शिक्षणसंस्थांची दुकाने होता कामा नयेत. कौशल्याधारित, मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या बळावरच आजच्या युवापिढीला दिशा मिळू शकते. गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही, तोपर्यंत नोकरी, व्यवसायाची संधी मिळणार नाही. परिणामी, यामध्ये सरकारही काही करू शकत नाही. आज देशात युवकांची संख्या मोठी आहे. जगात आपल्या देशाकडे नेतृत्त्व करण्याची क्षमता आगामी काळात आहे. संस्कारक्षम शिक्षण देण्याची आपली संस्कृती आजच्या काळातही टिकवली पाहिजे.”
“शिक्षण क्षेत्रात अनेक आव्हाने आहेत. मात्र, या आव्हानांना संधींमध्ये परिवर्तीत करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. त्यासाठी शिक्षकांना सक्षम करायला हवे. त्यादृष्टिने शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयेही स्मार्ट व्हावीत, यासाठी डिजिटल इंडिया उपक्रमाचा उपयोग होत असून, या शाळांचा स्तरही उंचावत आहे. शिक्षकाने कधीही पैशासाठी काम केले नाही, तर फक्त शिक्षणाच्या दर्जावरच ते या उंचीवर पोहचले आहेत. तरुणांना एकत्र आणल्यास आणि योग्य संघटन केल्यास भारत विश्‍वगुरु होणे शक्य आहे. त्यासाठी प्रत्येकाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आपल्याकडील ज्ञान शेवटच्या घटकापर्यंत पोहचवले पाहिजे,” असेही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
डॉ. अनिल काकोडकर म्हणाले, “शिक्षणव्यवस्थेतील गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि वैश्‍विक मूल्यांचा अभाव ही दोन मुख्य आव्हाने आपल्यासमोर आहेत. प्राचीन भारतीय शिक्षणात वैश्‍विक मूल्यांचा ठेवा आहे. त्यातील मूल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञान याची सांगड घालून शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रेरित केले, तर भावी पिढी चांगली निर्माण होईल. तीन दिवसांच्या या विचारमंथनातून शिक्षणपद्धतील अनेक गुणदोष समोर येतील. त्या अनुषंगाने काही नवे बदल करणे शक्य होईल.”
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, “भारताकडे अफाट बुद्धिमता आहे. मात्र, त्याला योग्य ती दिशा मिळायला हवी. दिशा देण्याचे हे कार्य शिक्षक करु शकतात. केवळ पदवी धारण करणे म्हणजे शिक्षण घेणे नव्हे, तर ज्ञानार्जन आणि आकलन होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना घडविणार्‍या शिक्षकांना सक्षम करण्यासाठी, त्यांच्या गुणवत्तेचा स्तर उंचावण्यासाठी अशा प्रकारच्या शिक्षकांच्या एकत्रीकरणाची आवश्यकता होती. ती या नॅशनल टीचर्स काँग्रेसने पूर्ण केली आहे. यातून अनेक मुद्यांवर विचार करणे शक्य होणार आहे.”
डॉ. गणेश नटराजन म्हणाले, “उद्योग क्षेत्राला कौशल्याधारित मनुष्यबळाची गरज आहे. मात्र, आज उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी अनेकांकडे कौशल्यांचा अभाव आहे. परिणामी, नोकर्‍या असूनही बेरोजगारांची संख्या मोठी आहे. शालेय स्तरापासून शिक्षणाला कौशल्याची जोड मिळाल्यास कुशल मनुष्यबळाची निर्मिती होईल. महाविद्यालय स्तरावर शिक्षणाला संशोधनाची जोड मिळावी.”
प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड म्हणाले, “शिक्षक, शिक्षणव्यवस्था यातील अडचणी समजून घेऊन त्यावर राज्य, केंद्र पातळीवर उपाय शोधण्यासाठी या परिषदेचे आयोजन केले आहे. भारताच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात बहुशाखीय शिक्षक देशाच्या विविध भागातून आले आहेत. प्रत्येक राज्याच्या शिक्षणातील पद्धती, त्यातील अडचणी यावर चर्चा होणार आहे. खासगी शिक्षणसंस्था चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे शासनाकडून अनुदान मिळण्याबाबतही विचार व्हावा. तसेच व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशाची परवानगी मिळावी.”
डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी सत्काराला उत्तर देताना शिक्षकांनी आपला विद्यार्थी चांगली कामगिरी कशी करेल, यावर भर द्यायला हवा, असे सांगितले. विद्यार्थ्याचे यश हीच आदर्श शिक्षकाची पावती असते, अशी भावनाही या दोन्ही आदर्श शिक्षकांनी व्यक्त केली. राजीव खांडेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. नीलम शर्मा, गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत जगताप यांनी स्वागत केले. डॉ. आर. एम. चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. दीपक आपटे यांनी आभार मानले.

Post a Comment

 
Top