Add

Add

0

               दोन हजार आंब्यांच्या झाडांना कलम करण्याचा उपक्रम; जोडधंद्यांतून उत्पन्नाचे स्रोत 


पौड (प्रतिनिधी):-"शेतीला जोडधंद्यांच्या माध्यमातून हक्काचे उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी माले (ता. मुळशी) येथील माले विविध कार्यकारी सोसायटी आणि कै. सोपानराव शेंडे पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून "कल्पवृक्ष' हा उपक्रम हाती घेतला आहे. त्या अंतर्गत गावातील सुमारे दोन हजार आंब्यांच्या झाडांना हापूस, पायरी आणि केशर या वाणांचे फांदी कलम मोफत करून देण्यात येणार आहे. तसेच, पुढील टप्प्यात येथील शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि शेळीपालनासाठी प्रोत्साहन देणार आहे. 
माले परिसरातील हवामान तांदूळ आणि आंब्याच्या पिकासाठी पोषक आहे. येथील इंद्रायणी आणि आंबेमोहोर या जातीच्या तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. तसेच, या परिसरातील बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावर रायवळ आंब्याची झाडे आहेत. परंतु; या आंब्यांना तुलनेने मागणी कमी आहे. तसेच, त्याला दरही चांगला मिळत नाही. रायवळ आंब्यांना वाढवण्यासाठी कोणताही खर्च करावा लागत नाही. परंतु; त्याची तोडणी आणि पुणे किंवा इतर बाजारात विक्री करण्यासाठी येणारा वाहतूक व इतर खर्चही त्याला मिळणाऱ्या भावातून वसूल होत नाही. त्यामुळे बहुतेक शेतकरी झाडाचे आंबे तोडतच नाही. परंतु; या परिसरातील हवामान आंब्यांसाठी पोषक असल्यामुळे परिसरातील काही शेतकऱ्यांनी पायरी आणि हापूस आंब्याचे कलम केले आहे. त्यापासून उत्पादनही चांगले मिळत आहे. त्यामुळे "कल्पवृक्ष' हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार, येथील सुमारे दोन आंब्यांच्या झाडांना हापूस, पायरी आणि केशर या वाणांचे फांदी कलम करण्यात येणार आहे. येथील बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावर रायवळ आंब्याची झाडे आहेत. त्यामुळे या झाडांनाच कलम केले जाणार आहे. त्यापासून येत्या तीन ते चार वर्षांत उत्पादन सुरू होईल, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष रामचंद्र पासलकर व प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद शेंडे पाटील यांनी दिली. 
या उपक्रमाचा प्रारंभ नुकताच पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य रवींद्र कंधारे यांच्या हस्ते करण्यात आला.या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सुरेश जोरी, माजी सरपंच वसंतराव काळोखे, मोहन दातीर, मनसेचे युवा नेते सुभाष काळोखे, सोसायटीचे संचालक नामदेव शेंडे, बाळकृष्ण साखरे,दत्तात्रय दातीर, मधुकर थोरवे,रामचंद्र गोपालघरे, शिवाजी पोकळे,चंद्रकांत मरे,संतोष गोरे, वसंतराव शेंडे, नारायण शेंडे, बाळासाहेब दातीर, सेवानिवृत्त मंडलाधिकारी श्रीधर सातपुते, बाळासाहेब जाधव,दत्तात्रेय काळोखे, साहेबराव आखाडे, राहुल जोरी आदी उपस्थित होते. 
सुहास शेंडे, नाना पासलकर, भरत काळोखे,सचिन जाधव, कैलास काळोखे यांनी या उपक्रमाचे संयोजन; तर चेतन आधवडे यांनी सूत्रसंचालन केले. दीपक शेंडे यांनी आभार मानले. 
""या उपक्रमात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी जर कलम केलेली झाडे 100 टक्के जगविली; तर त्यांना प्रोत्साहन म्हणून नारळाची रोपे बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत,'' अशी माहिती शरद शेंडे यांनी दिली.
अनुकरणीय उपक्रम :-कंधारे
माजी सभापती रवींद्र कंधारे म्हणाले, ""कलमी आंब्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निश्‍चितपणाने उत्पन्न मिळते. कलमी आंब्यांच्या एका झाडापासून सरासरी हजार ते दहा हजार रुपये मिळते. तालुक्‍याचे माजी सभापती कै. अप्पासाहेब ढमाले यांनी असाच प्रयोग बेलावडे खोऱ्यात यशस्वी केला आहे. तालुक्‍यातील इतर सोसायट्यांसाठी हा अनुकरणीय उपक्रम आहे. या उपक्रमासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पंचायत समितीच्या कृषी विभागाचे सहकार्य केले जाईल.''

Post a Comment

 
Top